दुसऱ्या कसोटीत पावसाचा खेळ? ; अवकाळी पावसामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियम जलमय

बुधवारी मुंबईत जवळपास संपूर्ण दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द करण्यात आले.

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाच मुंबईतील अवकाळी पावसाचा वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

बुधवारी मुंबईत जवळपास संपूर्ण दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द करण्यात आले. वानखेडेची खेळपट्टीसुद्धा पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली असून काही ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाल्याचेही निदर्शनास आले. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपापर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. शुक्रवारपासून उभय संघांतील दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होणार असून त्या दिवशीही पावसामुळे काही षटकांचा खेळ वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारपासून आकाश निरभ्र असेल, अशी आशा आहे.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने या कसोटीसाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी फक्त २५ टक्के चाहत्यांनाच प्रवेशाची मुभा दिली आहे. त्यामुळे फक्त १,५०० तिकिटे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना मिळणार असताना पाच वर्षांनी वानखेडेवर होणाऱ्या कसोटीत पावसाने खेळखंडोबा केल्यास सर्वाचाच हिरमोड होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unseasonal rains in mumbai hamper pitch preparation at wankhede stadium zws

Next Story
IPL 2022 : केएल राहुलने पंजाबपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला?; प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी केला खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी