‘‘कबड्डी प्रीमियर लीगचा (केपीएल) आराखडा तयार असून, ती स्पर्धा आता लवकरच घेण्यात येईल. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमधून या स्पध्रेची जोरदार मागणी होत आहे. केपीएल प्रत्यक्षात अवतरल्यास खेळाच्या विकासाला त्याचा फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना चांगला पैसा मिळेल,’’ असे मत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे महत्त्वाकांक्षी ‘केपीएल’ला लवकरच मुहूर्त मिळणार आहे.
‘‘राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेवर रेल्वेचे वर्चस्व चालत आले आहे ते नोकऱ्यांमुळे, पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे विश्वविजेत्या खेळाडूंसाठी प्रथम श्रेणीच्या नोकऱ्या आणि एक कोटी रुपयांचे इनाम मिळाले. हे सारे चित्र महाराष्ट्रासाठी अनुकूल ठरत आहे,’’ असे पाटील यांनी पुढे सांगितले.
‘‘मराठवाडय़ातील जिल्हे कबड्डीमध्ये पिछाडीवर आहेत. या ठिकाणी जास्तीत जास्त स्पर्धा घेऊन या जिल्ह्यांना प्रगत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,’’ असे पाटील या वेळी म्हणाले.
‘‘प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजनासुद्धा आम्ही आखत असून, कर्तबगार पंच आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीच्या काळात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची कार्यकारिणी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहील. याचप्रमाणे एकदिलाने कबड्डीची ज्योत अखंड भारतात तेवत ठेवू,’’ असे पाटील यांनी सांगितले.
कबड्डी स्पध्रेसाठी पाहुणे म्हणून राजकीय नेत्यांना आवर्जून आमंत्रित केले जाते, पण या नेतेमंडळींखातर स्पध्रेला अत्यंत उशीर होतो आणि खेळाडूंना तिष्ठत राहावे लागते. यावर भाष्य करताना किशोर पाटील यांनी सांगितले की, ‘‘यापुढे राजकीय नेत्यांसाठी सामन्याला उशीर करू नये. आधी सामने वेळेत सुरू करावेत. मग पाहुणे आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करावे.’’