भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. २२ एप्रिलला दहशतवाद्यांकडून पहलगाममध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात निष्पाप भारतीयांनी आपले प्राण गमावले. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलंच प्रत्युत्तर दिलं.

दोन्ही देशांमध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणाव सुरूच आहे. अखेर शनिवारी युद्धविराम जाहीर करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली. मात्र, पाकिस्तानने काही तासातच शस्त्रविरामचं उल्लंघन करून ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानने केलेल्या या कृत्यानंतर माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर, पुन्हा एकदा संतापाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने देखील संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

यापूर्वीही अनेकदा त्याने पोस्ट शेअर करून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्याने एक्स अकाऊंवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कुठलंही कॅप्शन दिलेलं नाही. त्याने केवळ फोटो शेअर केला आहे. या फोटोवर, “कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच” असं लिहिलं आहे. सेहवागने हा फोटो कोणाला उद्देशून पोस्ट केला आहे, हे लिहिलेलं नाही. मात्र, सद्यस्थिती पाहता हा फोटो त्याने पाकिस्तानसाठी शेअर केला असल्याचं म्हटलं जात आहे.

भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानने केलेले प्रत्येक हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. भारताने पाकिस्तानातील कुठल्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही. मात्र, पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्या. पाकिस्तानने सीमलगत असलेल्या गावांवर ड्रोन हल्ले केले. मात्र, भारतीय सैन्याने हे सर्व ड्रोन खाली पाडले.

शिखर धवनची संतप्त प्रतिक्रिया

वीरेंद्र सेहवागने नाव न घेता पाकिस्तानवर संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे भारताचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने देखील एक्स अकाऊंवरून पोस्ट शेअर करून पाकिस्तानवर lटीका केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले,”फालतू देशाने पुन्हा एकदा आपला फालतूपणा जगाला दाखवून दिला..”