Washington Sundar Harry Brook Wicket Video: भारत आणि इंग्लंड मँचेस्टर कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी कमालीची फटकेबाजी करत भारताच्या गोलंदाजांची शाळा घेतली. इंग्लंडच्या टॉप-४ फलंदाजांनी अर्धशतकं झळकावत भारताला विकेट घेण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. दरम्यान वॉशिंग्टन सुंदरने कमालीची गोलंदाजी करत दोन फलंदाजांना झटपट बाद केलं. ज्यामध्ये हॅरी ब्रूकला चकवत त्याने विकेट मिळवली.

इंग्लंडने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात कमालीची फलंदाजी करत भारताला एकही विकेट दिली नाही. ऑली पोप आणि जो रूट यांनी १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या धावांमध्ये मोठी भर घातली. पण दुसरं सत्र सुरू होताच वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट मिळवून दिले. आधी त्याने ऑली पोपला केएल राहुलकडून स्लिपमध्ये बाद केलं. तर नंतर सुंदरने ब्रूकला आपल्या जाळ्यात अडकवलं.

ऑली पोप आणि जो रूटने कमालीची फटकेबाजी करत संघाचा डाव उचलून धरला होता. पोप बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूक फलंदाजीला आला. ब्रूकला जडेजा आणि सुंदरच्या जोडीने धावा करण्याची फारशी संधी दिली नाही आणि त्याच्यावर दबाव कायम ठेवला. यानंतर सुंदरच्या ८१व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ब्रूक मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात बाद झाला.

हॅरी ब्रूक सुंदरच्या पहिल्याच चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज झाला होता. सुंदरने हे पाहताच चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने टाकला आणि तितक्यात ब्रूक फटका खेळण्यासाठी पुढे सरसावला. ब्रूक चेंडू खेळायला चुकला आणि चेंडू थेट ध्रुव जुरेलच्या हातात गेला. जुरेलने क्षणभरही वेळ न दवडता बेल्स विखुरल्या. ब्रूकला काही कळण्याच्या आधीच तो स्टम्पिंग होत बाद झाला होता. यासह सुंदरने संघाला दुसरी विकेट मिळवून दिली.

८० षटकं पूर्ण झाल्यानंतर भारताला नवीन चेंडू घेण्याची संधी होती. मात्र, वॉशिंग्टन सुंदरला जुन्या चेंडूवर चांगला ड्रिफ्ट मिळत होता, त्यामुळे संघाने जुन्याच चेंडूने गोलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सुंदरने लगेचच विकेट घेत हा निर्णय योग्य ठरवला. दरम्यान इंग्लंड आणि भारताची पहिल्या डावातील धावसंख्या आता बरोबरीत आली असून यजमान संघाने आघाडीही घेतली आहे. जो रूट आणि बेन स्टोक्सची जोडी मैदानावर आहे.