वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आहे. आजपासून दोन संघांमधली पहिली कसोटी अहमदाबादला सुरू झाली. प्रथेनुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. भौगोलिकदृष्ट्या वेस्ट इंडिज हा देश नाहीये. तो अनेकविध देशरुपी बेटांचा समूह आहे. मग त्यांचं राष्ट्रगीत काय आहे? अन्य खेळांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ नसतो. क्रिकेटमध्येच ते वेस्ट इंडिज म्हणून का खेळतात याचा घेतलेला आढावा.

वेस्ट इंडिजचं राष्ट्रगीत म्हणून काय वाजतं?

कॅरेबियन बेटांवरील प्रसिद्ध गीतकार डेव्हिड रुडर यांचं ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गीत वाजवलं जातं. हे गीत रुडर यांनीच लिहिलं आणि त्याला संगीतबद्ध केलं आहे. कॅरेबियन बेटांपैकी त्रिनिदादचे ते रहिवासी आहेत. या गाण्यात वेस्ट इंडिज क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाचं वर्णन आहे. मायकेल होल्डिंग हे वेस्ट इंडिज क्रिकेटमधलं आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्याबद्दल या गीतात वर्णन आहे. वेस्ट इंडिज हा अनेक विविधांगी बेटांचा समूह आहे. प्रत्येक बेटाचं गुणवैशिष्ट्य वेगवेगळं आहे. विभिन्नता असली तरी बेटांची एकत्र येण्याच्या वृत्तीला गीतकाराने सलाम केला आहे.

सुरुवातीच्या काळात वेस्ट इंडिजचा कॅप्टन ज्या बेटाचा रहिवासी असेल त्या बेटाचं राष्ट्रगीत वाजवलं जायचं. मात्र कालौघात ही पद्धत बंद झाली आणि वेस्ट इंडिजचं राष्ट्रगीत वाजू लागलं.एका गीताऐवजी प्रत्येक बेटाचं राष्ट्रगीत वाजवण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र वेळ आणि संसाधनांचा विचार करता ते शक्य नसल्याने तो मुद्दा बारगळला.

वेस्ट इंडिजमध्ये नेमके किती देशात मोडतात?

अँटिगा अँड बारब्युडा, बार्बाडोस, डॉमिनिका, ग्रेनेडा, गयाना, जमैका, सेंट लुसिआ, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडियन्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो, सेंट किट्स अँड नेव्हिस, अँग्युइला, माँटेसेराट, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, सिंट मार्टेन, युएस व्हर्जिन आयलंड्स. हे बेटरुपी देश वेस्ट इंडिजचा भाग आहेत.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड संघटना कशी चालते?

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी सहा क्रिकेट असोसिएशन्स संलग्न आहेत. यामध्ये बार्बाडोस, गयाना, जमैका, त्रिनिदाद अँड टोबॅगो, लीवर्ड आयलंड्स आणि विंडवर्ड आयलंड्स यांचा समावेश होतो. लीवर्ड आयलंड्स असोसिएशनमध्ये अँटिगा अँड बारबुडा, सेंट किट्स अँड नेव्हिस यांच्यासह अँग्युइला, माँटेसेराट आणि ब्रिटिश आयलंड्स आणि युएस व्हर्जिन आयलंड्स आणि सिंट मार्टेन यांचा समावेश होतो. विंडवर्ड आयलँड्स क्रिकेट बोर्डात डॉमिनिका, ग्रेनेडा, सेंट लुसिआ, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडियन्सचा अंतर्भाव होतो.

वेस्ट इंडिज देश नाही मग त्यांचा राष्ट्रध्वज कोणता?

वेस्ट इंडिज हे देशांचं कॉन्फडरेशन असल्याने अर्थातच ध्वज किंवा बोधचिन्ह नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने बोधचिन्ह तयार केलं आहे. मरून रंगाच्या बॅकग्राऊंडवर, निसर्गरम्य बेटावर नारळाचं झाड आणि क्रिकेटचे स्टंप्स असं हे बोधचिन्ह आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात मानधनाच्या मुद्यावरून गेली अनेक वर्ष वाद सुरू आहे. खेळाडूंना समाधानकारक मानधन मिळत नसल्याने अनेक खेळाडूंनी जगभरात सुरू असलेल्या टी२० लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. काहींनी तिशी ओलांडल्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्यांपैकी सुनील नरिन, आंद्रे रसेल हे वेस्ट इंडिजसाठी फारसे खेळलेच नाहीत. मामुली मानधनासाठी वेस्ट इंडिजसाठी खेळण्याऐवजी सहा महिने टी२० लीग खेळून वर्षभराचा पैसा मिळत असल्याने खेळाडू त्याला पसंती देत आहेत.

काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजच्या संघाला नवख्या नेपाळने पराभवाचा धक्का दिला. शारजा इथे आयोजित तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत नेपाळने २-१ अशी सरशी साधली. एकेकाळी क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजची सध्याची स्थिती दयनीय आहे. वेस्ट इंडिजसाठी खेळणं हे प्राधान्य राहिलेलं नसल्याने संघबांधणी करणंही कठीण झालं आहे. २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरू शकला नव्हता. यंदा झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही ते पात्र ठरू शकले नाही. वेस्ट इंडिजचा खेळ असाच खालावत राहिल्यास त्यांच्या कसोटी खेळण्यावर बंदी येऊ शकते.

वेस्ट इंडिजने भारतात शेवटची कसोटी ३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ साली जिंकली होती.