WTC Final ICC Rules: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सर्वच क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ज्यामध्ये गतविजेत्या संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, जे पहिल्यांदाच WTC फायनलमध्ये पोहोचले आहेत. पण या सामन्यात पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना जर बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तर कोणता संघ विजयी होणार, यासाठी काय आहे आयसीसीचा नियम जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमण आहेत, जी इंग्लंडच्या परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, ज्यामुळे सामन्याचा निकाल लागेल अशी आशा आहे. हा सामना ११ जून ते १५ जूनदरम्यान खेळवला जाणार आहे.
इंग्लंडमध्ये, खराब हवामानामुळे सामन्यांदरम्यान अनेकदा व्यत्यय आला आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबतही अशीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानुसार, या सामन्याच्या पहिल्या आणि अखेरच्या दिवशी पावसाची चिन्हे असल्याचेही वर्तवण्यात आलं आहे. आयसीसीने जेतेपदाच्या सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवला आहे, जो १६ जून आहे. पण जर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर आयसीसीचा नियमाप्रमाणे ट्रॉफी कोणाला मिळणार?
आयसीसीच्या या नियमानुसार जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या चक्रातील अंतिम सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही किंवा अनिर्णित राहिला तर बक्षीस रक्कम समान प्रमाणात दोन्ही संघांमध्ये विभागली जाईल.
आयसीसीने आधीच बक्षीस रकमेची घोषणा केली आहे ज्यामध्ये विजेत्या संघाला ३.६ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रूपयांप्रमाणे सुमारे ३०.७ कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला २.१६ मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १८.५३ कोटी रुपये आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, एडन मारक्रम, टेम्बा बावुमा (कर्णदार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, विआन मुल्डर, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथ्थुस्वामी
ऑस्ट्रेलियाचा संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुहनेमन, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.