Who is Indian Javelin Thrower Sachin Yadav: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नीरज चोप्राच्या पदरी निराशा पडली आहे. पण नीरज चोप्रानंतर भारताचा अजून एक भालाफेकपटू उदयाला आला आहे, तो म्हणजे सचिन यादव. सचिन यादवने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कमालीचे थ्रो करत कडवी झुंज दिली आणि जगभरात त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. पण हा भारताचा येऊ घातलेला भालाफेकपटू सचिन यादव कोण आहे, जाणून घेऊया.

भारताचा नवा येऊ घातलेला स्टार भालाफेकपटू सचिन यादव अवघ्या काही मीटरमुळे पदकासाठी हुकला. सचिन यादवने संपूर्ण सहा थ्रोमध्ये ८५ मीटरपर्यंतचा थ्रो कायम ठेवला. सचिन यादवने या ५ थ्रोमध्ये आजवरचे त्याचे सर्वाेत्तम तीन थ्रो केले. सचिन यादवचा सर्वात चांगला थ्रो हा ८६.२७ मीटर होता. सचिन या थ्रोसह चौथ्या स्थानावर राहिला. तर नीरज चोप्राला आठव्या स्थानी समाधान मानावं लागलं.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये नीरज चोप्राने चांगली कामगिरी केली नाही, परंतु बागपतमधील खेकरा येथील सचिन यादवने चमकदार कामगिरी केली. २५ वर्षीय सचिनने टोकियो चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच प्रयत्नात ८६.२७ मीटरचा कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो नोंदवला, त्याने त्याच्या सहा प्रयत्नांपैकी चार प्रयत्नांमध्ये ८४ मीटरपेक्षा जास्त थ्रो केला. सचिन भारताला पदक मिळवू शकला नाही.

कोण आहे भारताचा नवा भालाफेकपटू सचिन यादव?

नीरज चोप्रा मागे राहिलेल्या या स्पर्धेत सचिन यादवने कमालीचा थ्रो करत जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवला. २०१९ पर्यंत, सचिन त्याच्या गावात टेनिस-बॉल क्रिकेट खेळत असे. सरकारी नोकरीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तो कोचिंग क्लासेसमध्ये जात असे. ६ फूट ४ इंच उंचीचा सचिन वेगवान गोलंदाज आणि फ्लोटर फलंदाज होता. टाईमपास म्हणून क्रिकेट खेळणारा सचिन आज कमालीचा भालाफेकपटू झाला.

स्थानिक भालाफेक प्रशिक्षक संदीप यादव यांनी सचिनची प्रतिभा पाहिली. संदीप यांनी सचिनला टेनिस-बॉल क्रिकेट सामना खेळताना पाहिलं. सहा फूट चार इंच उंची असलेल्या सचिनकडे प्रभावी हाताचा वेग होता, संदीप यांनी हा वेग अचूक हेरला. काही आठवड्यांतच सचिन टेनिस बॉलऐवजी बांबूच्या भाल्याकडे वळला.

सचिनला भालाफेक खेळण्याकरता त्याचं मन वळवण्यासाठी संदीप यांना खूप कष्ट घ्यावे लागले. संदीप खेकरा येथील एका खाजगी शाळेच्या मैदानावर भालाफेकसाठी प्रशिक्षण देत असे. तिथेच सचिनने बांबूच्या भालाफेकीने पहिला भालाफेक केला. सचिनने याबद्दल म्हटलं होतं की, “तो ५७ मीटरचा थ्रो होता आणि संदीप सरांनी मला सांगितलं की ही एक उत्तम सुरुवात होती.”

पुढील दोन वर्षे सचिनने शाळेच्या मैदानावर प्रशिक्षण घेतलं. उत्तर प्रदेश पोलिस विभागत कार्यरत असणारा संदीप ड्युटीवर असताना व्हिडिओद्वारे प्रशिक्षण घेत असे. सचिनला खेकरा येथून दूर असलेल्या एका चांगल्या प्रशिक्षण केंद्रात जाण्याची संधी मिळावी अशी कोच संदीप यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अँटिलचे प्रशिक्षक नवल सिंग यांच्याशी संपर्क साधला. नवल सिंग हे दिल्लीच्या जेएलएन स्टेडियममध्ये खेळाडूंना प्रशिक्षण देत असत आणि तिथे प्रशिक्षणासाठी सचिन गेला आणि त्याचा भालाफेकपटू म्हणून प्रवास सुरू झाला.