Tilak Varma Thrilling Innings Pakistan: तारणहार तिलक वर्माच्या ६९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर आशिया चषक अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताला पाकिस्तानने विजयासाठी १४७ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने पॉवरप्लेमध्येच ३ विकेट्स गमावले होते. पण यानंतर तिलक वर्माने सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाला विजय मिळवून देत नाबाद राहत माघारी परतला. तिलक वर्माने संजू सॅमसन व शिवम दुबेसह उत्कृष्ट भागीदारी रचली. पण तिलक वर्मा नेमका कोण आहे, जाणून घेऊया.

तिलक वर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी तारणहार आणि मॅचविनरची भूमिका अनेकदा बजावली आहे. त्याच्या उत्कृष्ट आणि सावध तसेच संधी मिळताच मोठे फटके मारत केलेल्या फलंदाजीच्या बळावर भारतालाही विजय मिळवून दिला आहे.

इलेक्ट्रिशियनचा मुलगा कसा झाला क्रिकेटपटू?

तिलक वर्मा हा मूळचा हैदराबादचा आहे. २०१८ पासून तो हैदराबाद संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. तिलकचे बाबा एक इलेक्ट्रिशियन होते आणि त्यांनी मोठ्या कष्टाने तिलकच्या क्रिकेट कारकिर्दीला आकार दिला. घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. त्यामुळे तिलकचे बाबा नियमित नोकरीबरोबरच अतिरिक्त पार्ट-टाईम कामं करावी लागली. कधी पंखे दुरुस्त करणे, तर कधी छोटे-मोठे काम करावे लागत असे. जेणेकरून महिन्याला थोडाफार पैसा मिळून त्यांनी कुटुंब चालवलं.

तिलक वर्माच्या वडिलांची इच्छा होती की तिलक आणि तरुण वर्मा यांनी डॉक्टरीचं शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावं. पण दोघांच्या मनात मात्र खेळाची स्वप्नं होती. मोठ्या मुलाला बॅडमिंटनमध्ये करिअर करायचं होतं, तर लहानगा तिलक मात्र ठामपणे म्हणाला की क्रिकेटर व्हायचाच. स्वप्न निश्चित होतं, पण त्याला योग्य दिशा देणारा कोणी तरी हवा होता आणि इथेच तिलकच्या कारकिर्दीला वळण देणारे कोच भेटले ते म्हणजे सलाम बयाश.

कोच सलाम यांनी तिलकच्या कारकिर्दीला असं दिलं वळण

बयाश यांनी तिलकच्या डोळ्यांतील क्रिकेटप्रति प्रेम पाहिलं, जो त्यांना स्वतःच्या लहानपणी जाणवला होता. त्यांच्या मार्गदर्शनात तिलकने क्रिकेटचे धडे गिरवले. व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय उतरलेला हा मुलगा जेव्हा सराव सामन्यात हैदराबादच्या एका खासगी अकादमीविरुद्ध शतक झळकावताना पाहिलं, तेव्हा बयाश थक्क झाले. त्या क्षणानेच त्यांना खात्री पटली की या मुलात अफाट प्रतिभा आहे. त्यांनी त्वरित त्याच्या पालकांना विनंती केली की तिलकला अधिकाधिक सराव करण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

तिलक वर्माला प्रशिक्षणादरम्यान दररोज बर्कसहून लिंगमपल्लीपर्यंत (४० किमी अंतर) प्रवास करावा लागायचा आणि त्याचबरोबर शिक्षणही सांभाळावं लागायचं. सरावाच्या वेळी मात्र कोच सलाम बयाश यांनी त्याला वेळप्रसंगी ओरडत चांगला सराव करून घेता. तरीदेखील तिलकला पहिल्याच वेळी हैदराबादच्या अंडर-१४ संघात स्थान मिळालं नाही. तेव्हा बयाश यांनीच पुढे येऊन त्याला योग्य मार्गदर्शन केलं. बयाश यांनी यानंतर त्याच्या सरावाची वेळ वाढवली.

बयाश यांनी तिलकचा सराव चार तासांवरून वाढवून पाच तासांचा केला. पुढच्या वर्षी त्याने तब्बल १३६० धावा केल्याचं कोचने सांगितलं. त्यानंतर तिलकची निवड झाली आणि २०१५/१६ मध्ये त्याला हैदराबाद अंडर-१४ संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील आपल्या ओळखींचा उपयोग करून त्यांनी तिलकला हैदराबादमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात (चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध) बॉल बॉयचं काम मिळवून दिलं. या माध्यमातून तिलकला आपल्या आदर्श खेळाडूला सुरेश रैनाला भेटण्याची संधी मिळेल, हे बयाश यांना माहीत होतं.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीनंतर मार्च २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. तिलक वर्माने भारताकडून खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३१ सामन्यांमध्ये ८९३ धावा केल्या आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोअर नाबाद १२० आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी-२० मध्ये त्याने १२५ सामन्यांमध्ये ३८०२ धावा केलेल्या आहेत.