वरिष्ठ गटाच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला प्रथमच मिळत आहे. या संधीचा लाभ घेत पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे, असे युवा बॅडमिंटनपटू धन्या नायरने सांगितले.
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे १० ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या जागतिक स्पर्धेत धन्याला महिलांच्या दुहेरीत भाग घेण्याची संधी मिळाली आहे. ती मोहिता सहदेव हिच्या बरोबरीने मैदानात उतरणार आहे. वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत ती प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. भारतीय संघात सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, एच. एस. प्रणोय, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, मनु अत्री, सुमेध रेड्डी, अक्षय देवाळकर, प्रणव चोप्रा, प्रज्ञा गद्रे, सिक्की रेड्डी व अपर्णा बालन यांचाही समावेश आहे.
धन्याने २००२ मध्ये कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना भारताला सांघिक विभागात कांस्यपदक मिळवून दिले होते. त्यानंतर प्रथमच ती आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. आगामी जागतिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास व्यक्त करत तिने सांगितले की, ‘‘यापूर्वी मी कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यामुळे माझ्यावर कोणतेही दडपण नाही. मात्र वरिष्ठ गटात अनेक बलाढय़ खेळाडू खेळत असल्यामुळे त्यांच्यावर खेळण्यासाठी मी उत्सुक झाले आहे.’’
‘‘मोहिताच्या बरोबरीने मी नवी दिल्ली येथे दहा दिवस सराव केला आहे. त्या वेळी आम्हाला सुरजितसिंग यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. एरवी मी कोणत्याही प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेत नाही. स्वत:च्या खेळाचे आत्मपरीक्षण करीत त्यानुसार मी माझ्या खेळात सुधारणा करते,’’ असे धन्या म्हणाली.
जागतिक स्पर्धेबाबत ती म्हणाली की, ‘‘या स्पर्धेत आमच्यापुढे मोठे आव्हान असले तरी आम्ही तेथे सर्वोत्तम कामगिरी करणार आहोत. प्रत्येक सामन्यानुसार आम्ही रणनीती ठरविणार आहोत. मोहिता हिच्यासमवेत सराव केल्यामुळे आमच्यात चांगला सुसंवाद निर्माण झाला आहे. त्याचा फायदा जाकार्ता येथे मिळेल.’’