Wimbledon 2022: टेनिसच्या वेडासमोर सर्वकाही शुल्लक! जखमी असूनही नदाल खेळणार उपांत्य फेरी

Rafael Nadal Abdominal Tear : बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नदालला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागला.

Rafael Nadal
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

टेनिस जगतामध्ये सध्या विम्बल्डनचा थरार रंगात आलेला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यांचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने बुधवारी आठव्यांदा विम्बल्डची उपांत्यफेरी गाठली आहे. तब्बल चार तास २० मिनिटे रंगलेल्या लढतीत त्याने टेलर फ्रिट्झचा पाच सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना नदालने ३-६, ७-५, ३-६, ७-५, ७-६ (१०-४) असा जिंकला. ही लढत नदालच्या लढवय्या वृत्तीमुळे जास्त चर्चेत आली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नदालला पोटातील एका स्नायूमध्ये सात मिलिमीटरची चीर पडली आहे. तरी देखील तो उपांत्य फेरी खेळणार आहे. गुरुवारी सकाळी त्याच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नदालला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागला. तरी देखील त्याने लढवय्या वृत्ती दाखवत सामना पूर्ण केला.

हेही वाचा – Sania Mirza Retirement : “मला नक्कीच आठवण येईल”, निवृत्तीनंतर भारतीय सानियाची भावनिक पोस्ट

नदाल पहिल्या सेटमध्ये ३-१ ने आघाडीवर होता. परंतु, फ्रिट्झने सलग पाच गेम जिंकून पुनरागमन करत पहिला सेट जिंकला. त्यानंतर पोटाच्या त्रासामुळे नदालला काही काळ कोर्टमधून बाहेर पडावे लागले. प्रथमोपचार करून आल्यानंतर नदालने दुसरा सेट जिंकून सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर फ्रिट्झने पुन्हा तिसरा सेट जिंकून नदालची चिंता वाढवली. त्यानंतर नदालने चौथा आणि पाचवा टायब्रेकर सेट जिंकत सामना आपल्या नावे केला.

हेही वाचा – IND vs ENG T20 Series : इंग्लंडमध्ये ठरणार विराटचे भवितव्य! टी २० विश्वचषकात खेळण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

“मला वेदना सहन करण्याची आणि समस्यांचा सामना करण्याची सवय आहे,” असे नदाल म्हणाला. यापूर्वी देखील त्याने रोलँड गॅरोसवर (फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा) प्रत्येक सामना वेदनाशामक इंजेक्शन्स घेऊन खेळले होते.

आता उपांत्य फेरीत नदालचा सामना ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसशी होणार आहे. किर्गिओसने उपांत्यपूर्व फेरीत चिलीच्या क्रिस्टियन गॅरिनचा ६-४, ६-३, ७-६ (५) असा पराभव केला आहे. किर्गिओस पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wimbledon 2022 rafael nadal suffered a tear in abdominal muscle before semifinal vkk

Next Story
Ind vs Eng 1st T20 Highlights : भारतीय गोलंदाजांसमोर यजमानांचे लोटांगण; पहिला सामना जिंकत भारताची मालिकेत आघाडी
फोटो गॅलरी