Women’s World Cup 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाने ५२ वर्षांत पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. हरमीनप्रत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी रात्री उशिरा नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकणे हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक १९७३ मध्ये सुरू झाला आणि भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आता ५२ वर्षांत प्रथमच पूर्ण झाले आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून ५१ कोटी आणि आयसीसीकडून सुमारे ४० कोटींचे बक्षीस मिळाले.
असा होता भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास
भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना एकेकाळी सामान्य डब्यातून प्रवास करावा लागत असे. त्यांना रात्र शाळेत घालवावी लागत असे आणि स्वत:चे अंथरूण स्वत: प्रवासात घ्यावा लागत असे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी हे स्वत: सांगितले. शांता रंगास्वामी यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या सुरूवातीच्या काळात आलेल्या अडचणी आठवल्या.
शांता रंगास्वामी त्या कठीण दिवसांची आठवण करतात. जेव्हा महिला क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून फारसा किंवा कोणताही पाठिंबा मिळत नव्हता. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार शांता रंगास्वामी यांनी १९७६मध्ये पदार्पण केले आणि १९९१ पर्यंत खेळल्या. त्या काळात महिला संघ ट्रेनच्या जनरल डब्यांमधून प्रवास करत असे आणि सामन्यांसाठी दौऱ्यावर असताना अनेकदा वसतिगृहाच्या मजल्यावरच झोपत असे. “आम्हाला जनरल डब्यांमध्ये प्रवास करावा लागत अशे आणि वसतिगृहाच्या मजल्यावर झोपावे लागत. शिवाय आम्हाला व्यवस्थित बेड आणि इतर आवश्यक सुविधा स्वत:च्या स्वत: सोबत घेऊन जाव्या लागत असे. आम्ही आमचे क्रिकेट किट पाठीवर बॅकपॅकसारखे बांधायचो आणि एका हातात सुटकेस घेऊन जायचो”, असे रंगास्वामी म्हणाल्या होत्या.
आताच्या संघाला करोडो रूपये…
शांता रंगास्वामी म्हणाल्या की, “आम्हाला खूप आनंद आहे की भारताच्या सध्याच्या महिला खेळाडूंना त्यांच्या पात्रतेच्या सर्व सुविधा मिळत आहेत. भारतीय महिला क्रिकेटने खरंच प्रगती केली आहे.”
भारताच्या विश्वचषक विजयानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी ५१ कोटींचे बक्षीस जाहीर केले. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक मोठा क्षण असल्याचे म्हटले. आयपीएलचे अध्यक्ष अरूण धुमल यांनीही या विजयाची तुलना पुरूष संघाच्या १९८३च्या विश्वचषक विजयाशी केली.
