वर्ल्ड हॉकीलिग सेमिफायनल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सुपडा साफ करुन टाकला आहे. पाकिस्तानच्या संघाला तब्बल ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत टीम इंडियाने या स्पर्धेतली आपली विजयी घौडदौड कायम ठेवलेली आहे.
एकीकडे चॅम्पियन्स करंडकात भारत पाकिस्तान सामना सुरु असताना हॉकीच्या सामन्याला प्रेक्षक गर्दी करणार का असा प्रश्न होता. मात्र या सामन्यालाही प्रेक्षकांनी तितक्याच संख्येने हजेरी लावत खेळाडूंचं मनोबल वाढवलं. सुरुवातीपासून भारतीय संघाने या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतला होता. १३ व्या मिनीटाला युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. रमणदीपने इंजेक्ट केलेला बॉल हरमनप्रीतने मोठ्या सहजतेने गोलपोस्टमध्ये धाडला. यानंतर फॉर्मात आलेली टीम इंडियाची गाडी जी सुरु झाली ती थांबलीच नाही.
तलविंदर सिंहने पाकिस्तानची बचावफळी भेदत अवघ्या ३ मिनीटांच्या अंतराने गोल करत ही आघाडी ३-० अशी वाढवली. यावेळी एस.व्ही.सुनील आणि तलविंदरमधला ताळमेळ हा केवळ वाखणण्याजोगा होता. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी अनेक चाली रचल्या, ज्यापुढे सर्व पाकिस्तानी खेळाडू हतबल दिलत होते.
यानंतर अखेरच्या सत्रात पुन्हा भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानवर आक्रमणाला सुरुवात केली. आकाशदीप सिंहने ४७ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी आणखी वाढवली. यानंतर अवघ्या दोन मिनीटात प्रदीप मोरने ४९ व्या मिनीटाला उजव्या बाजूने अँगल घेत बॉल गोलपोस्टमध्ये धाडला. या आक्रमणापुढे पाकिस्तानने अखेरचा उपाय म्हणून गोलरक्षक बदली केला. त्यानंतर मोहम्मद भुट्टाने पाकिस्तानसाठी एकमेव मैदानी गोल झळकावला. परंतू त्यानंतर सामना संपायला अवघं एक मिनीट बाकी असताना आकाशदीप सिंहने पुन्हा एक गोल करत हे अंतर ७-१ असं केलं.
या विजयामुळे वर्ल्ड हॉकी लिग सेमीफायनसच्या आपल्या गटात भारत अव्वल स्थानावर पोहचला आहे. भारताचा पुढचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे.