कसोटी हॅट्ट्रिकवीर नासीम शाह सामनावीर पुरस्काराचा मानकरी
एकीकडे बांगलादेशच्या युवा संघाने (१९ वर्षांखालील विश्वचषक) विश्वविजेतेपदावर नाव कोरले असले तरी वरिष्ठ संघावर डावाने कसोटी गमावण्याची वेळ आली. पाकिस्तानने सोमवारी बांगलादेशवर पहिल्या कसोटीत एक डाव आणि ४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
पाकिस्तानने सकाळच्या सत्रात चौथ्याच दिवशी कसोटी जिंकत दोन कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरलेला १६ वर्षीय नासीम शाह सामनावीर ठरला. बांगलादेशचा दुसरा डाव १६८ धावांत आटोपला.
६ बाद १२६ धावांवरून बांगलादेशने त्यांचा डाव सुरू केला होता. मात्र त्यांचा खेळ ९० मिनिटेच चालला. कर्णधार मोमिनूल हकने ४१ धावांचे योगदान दिले. कारण रावळपिंडी मैदानाच्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या फलंदाजांना पाकिस्तानच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीला सामोरे जाणे जमले नाही. युवा वेगवान गोलंदाज नासीम शाह बरगडीच्या दुखापतीमुळे चौथ्या दिवशी गोलंदाजीला उतरू शकला नाही. मात्र फिरकीपटू यासीर शाहने चार बळी घेत बांगलादेशला गुंडाळण्यात योगदान दिले. दुसरी कसोटी थेट ५ एप्रिलपासून आहे.
पाकिस्तानचा १० वा विजय
पाकिस्तानचा हा बांगलादेशवर ११ सामन्यांतील १०वा कसोटी विजय ठरला. त्यात उभय संघांमधील एकच कसोटी अनिर्णीत राहिली आहे. पाकिस्तानने या विजयाबरोबरच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ६० गुणांची कमाई केली. आता त्यांचे एकूण १४० गुण झाले आहेत.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश (पहिला डाव) ८२.५ षटकांत सर्वबाद २३३ आणि (दुसरा डाव) ६२.२ षटकांत सर्वबाद १६८ (मोमिनूल हक ४१, नजमूल हुसेन शांतो ३८, तमिम इक्बाल ३४, लिटॉन दास २९, नासीम शाह ४/२६, यासीर शाह ४/५८) पराभूत विरुद्ध पाकिस्तान (पहिला डाव) सर्वबाद ४४५ (बाबर आझम १४३, शान मसूद १००, हॅरिस सोहेल ७५, असद शफिक ६५, अबू जायेद ८६/३, रुबेल हुसेन ३/११३), सामनावीर : नासीम शाह.