जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी संमिश्र यशाचा ठरला. ७५ किलो वजनी गटात रौप्यपदक विजेत्या स्वीटी बोराने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, तर ५७ किलो गटात नीरज फोगटचे आव्हान संपुष्टात आले.
स्वीटीने मोंगोलियाच्या मायागमार्जरगल मुंखबातचा ५-० असा पराभव केला. पुढील फेरीत तिची द्वितीय मानांकित वेल्शवुमन लॉरेन प्राइसशी गाठ पडणार आहे. नीरजने चीनच्या क्विओ जिरूकडून २-३ अशा फरकाने हार पत्करली.
नीरज सामन्यात सरस ठरल्याचेच चित्र दिसून आले. परंतु पंचांच्या विभाजीत निकालात जिरूला दिलासा मिळाला. जिरूला या सामन्यात तंबीसुद्धा देण्यात आली होती.
या निकालाच्या विरोधात भारतीय पथकाने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडे दाद मागितली, परंतु तांत्रिक समितीने ती फेटाळून लावली.