जागतिक कुस्ती स्पर्धा
भारताच्या वीर देव गुलियाने २३ वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक कुस्ती स्पध्रेतील ७९ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीमधील स्थान निश्चित केले आहे. याचप्रमाणे ७० किलो गटात नवीनने रॅपिचेज फेरीत स्थान मिळवले आहे.
दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या २२ वर्षीय वीरने हंगेरीच्या बोटोंड ल्युकॅक्सचा ३-१ असा पराभव केला. मग त्याने चीनच्या लिगान शायला ७-२ असे नामोहरम करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. नंतर मोंगोलियाच्या बॅटझूल डॅमजिनला १२-१ असे नमवले. उपांत्य सामन्यात अझरबैजाच्या अबुबाकर अबाकारोव्हने वीरची वाटचाल ८-१ अशा फरकाने रोखली. त्यामुळे आता वीरपुढे कांस्यपदकाचे आव्हान असले तरी त्याचा प्रतिस्पर्धी अद्याप निश्चित झालेला नाही. नवीनने पात्रता लढतीतच चेर्मेन व्हॅलीव्हकडून ०-११ असा पराभव पत्करला. चेर्मेनने अंतिम फेरी गाठल्यामुळे नवीनला रॅपिचेजची संधी मिळाली आहे.
