भारताचा माजी कसोटी आणि टी-२० कर्णधार रोहित शर्माने या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण रोहित वनडेमध्ये खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकासाठी रोहितने सरावाला देखील सुरूवात केल्याचं म्हटलं जात आहे.पण रोहित आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान माजी भारतीय खेळाडूने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या मते रोहित शर्मा असा खेळाडू आहे, जो वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत खेळू शकतो. रोहितने भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेरचा खेळताना दिसला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकावले होते. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७६ धावा केल्या. या खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

रोहित वनडे वर्ल्डकप २०२७ पर्यंत खेळेल की नाही याबद्दल क्रिकेट तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे, कारण त्याचा फिटनेस हा एक मोठा मुद्दा आहे. रोहितच्या भविष्याबद्दल काहीही सांगणं घाई करण्यासारखं असेल, परंतु योगराज यांनी रोहित पुढील पाच वर्षे खेळू शकतो असं म्हटलं आहे.

योगराज सिंग म्हणाले, “रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल बरेच लोक विनाकारण काहीही बोलतात. तो कसा फलंदाजी करतो ते पहा. एकीकडे त्याची फलंदाजी आणि दुसरीकडे संघातील इतर खेळाडूंची फलंदाजी. एकीकडे त्याची खेळी आणि दुसरीकडे जगातील इतर कोणत्याही फलंदाजाची खेळी. हा रोहितचा क्लास आहे.”

युवराज सिंगचे वडिल पुढे म्हणाले, “आपण म्हणायला हवं, रोहित तू अजून ५ वर्षे खेळ, आम्हाला तुझी गरज आहे. तू देशासाठी अधिक योगदान द्यायला हवं. तुझ्या फिटनेसवर आणि सगळ्या गोष्टींवर कठोर परिश्रम कर. त्याच्यासोबत चार जणांना ठेवा आणि रोज सकाळी त्याला १० किमी धावायला सांगा. रोहित असा खेळाडू आहे जर त्याने मनात आणलं ना तर तो वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत खेळू शकतो.”

योगराज यांनी रोहितला स्वतःला फिट ठेवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. योगराज म्हणाले, “रोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे असं मला वाटतं. तो जितका जास्त खेळेल तितका तो फिट होईल. अंतिम सामन्यात सामनावीर कोण होता? रोहित शर्मा. त्यामुळे लोकांनी तुम्ही फक्त तुम्हाला जे माहित आहे त्याबद्दलच बोललं पाहिजे. जर तुम्हाला त्याचा खेळ आणि फिटनेसबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही त्या स्तरावर क्रिकेट खेळलं पाहिजे.”