रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

प्राण्यांची काळजी घेण्याच्या सूत्रांमधील वेळच्या वेळी लसीकरण, जंतुनाशक औषधे देणे यानंतर पिसवा आणि गोचिडींचा बंदोबस्त हे मुख्य सूत्र.

प्राण्यांचे केस गळणे स्वाभाविक तसेच पिसवा आणि कीटकांचा त्रासही स्वाभाविक. वातावरण झाडे, परिसरातील हे उपद्रवी असे परजीवी. प्राण्यांचे रक्त शोषून ते जगतात. या कीटकांमुळे प्राण्यांना केस गळण्याच्या त्रासाबरोबरच अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. हे कीटक चावल्यामुळे जखमा होतात. त्याचेच अनेक आजार होतात, त्याचबरोबर इतरही अनेक संसर्ग आणि आजारांसाठी हे कीटक कारणीभूत ठरतात. या कीटकांचा जेवढा प्राण्यांना त्रास होतो तेवढाच तो माणसांनाही होतो. त्यामुळे प्राण्यांची काळजी घेण्याच्या सूत्रांमधील वेळच्या वेळी लसीकरण, जंतुनाशक औषधे देणे यानंतर पिसवा आणि गोचिडींचा बंदोबस्त हे मुख्य सूत्र.

उपद्रव कसा टाळावा?

या कीटकांचा उपद्रव टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय नाही. प्राण्यांची डोळ्यात तेल घालून काळजी घेणे, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देणे हाच उपाय. प्राणी जेवढे केसाळ तेवढी त्यांची काळजी घेणे अधिक आवश्यक. कुत्री फिरवून आणल्यानंतर त्यांचे केस विंचरणे आवश्यक. प्राण्यांच्या अंगावर आता पिसवा आणि गोचीड दिसली नाही म्हणजे हे प्राणी कधीच त्यांच्या अंगावर मुक्कामी येणार नाहीत असे अजिबात नाही. वातावरणात असलेले हे कीटक प्राणी बाहेर फिरून आले की त्यांच्या अंगावर येऊ  शकतात. बाहेर फिरणाऱ्या मांजरींवरही पिसवा आल्या नाहीत ना हे सातत्याने पाहायला हवे. प्राणी स्वत:ला चावे घेत असतील, पायाने खाजवत असतील तर परजीवींनी त्यांच्या शरीरावर ठाण मांडलेला असू शकतो. काही वेळा कीटक दिसत नाहीत. ते त्यांच्या केसांमध्ये लपलेले असतात. त्यांच्या अंगावर जखमा दिसल्या तर त्याचेही कारण कीटकांचे चावे असू शकतात.

या कीटकांना नष्ट करण्यासाठी औषधी फवारे, पावडर मिळतात. त्याचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. मात्र कोणती औषधे वापरावीत हे पशुवैद्यांच्या सल्ल्यानेच निश्चित करावे. मानेखाली, कान या ठिकाणी औषध आवर्जून लावावे. अगदी शेपटीच्या टोकापर्यंत, पोटावरही औषध लागले पाहिजे. काही औषधे प्राण्यांनी चाटणे घातक असू शकते. त्यामुळे औषध लावल्यावर प्राणी लगेच अंग चाटणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे औषध लावताना ते डोळ्यात जाणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

प्राण्यांची स्वछता राखण्याबरोबरच ते वावरतात तो परिसर, झोपण्याच्या जागा, घरातील फर्निचर याचीदेखील स्वच्छता राखायला हवी. पिसवांची अंडी खूप बारीक असतात. ती प्राणी वावरतात त्या भागात चिकटून बसतात. त्यातून कीटकांचा जन्म होतो आणि ते पुन्हा प्राण्यांच्या अंगावर जातात. या कीटकांचा खूपच प्रादुर्भाव झाला असेल तर त्यांना तातडीने पशुवैद्यांकडे घेऊन जावे.