उमेदवाराकडे क्षेत्रासंबंधित पदवी अथवा पदव्युत्तर पदवी असणे ही तर आवश्यक अर्हता आहेच, पण त्याचबरोबर तो उमेदवार रोजगारक्षम आहे का हे उमेदवार निवडीच्या वेळेस कंपन्या आवर्जून बघतात. म्हणजेच काय तर कंपन्यांना उमेदवारांकडून त्यांच्या पदवीव्यतिरिक्त आणखी बरेच काही गुण अपेक्षित असतात. त्यांचे ज्ञान, विविध कौशल्ये, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू आणि कामात सक्रिय सहभाग हा प्रत्येक उमेदवाराकडून अपेक्षित असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौशल्यांच्या विकासासाठी..
* महाविद्यालयीन शिक्षण घेताना अहवाल लेखनापासून सादरीकरणार्पयची कौशल्ये विद्यार्थ्यांनी संपादन करायला हवी.
* संवादकौशल्ये, नेतृत्त्वगुण, वाटाघाटी करणे, समस्येचे निराकरण करणे यांसारखी सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा.
* अभ्यासाच्या पलीकडच्या योजनांमध्ये तुम्ही सहभागी व्हायला हवे. महाविद्यालयातील नेचर क्लब्ज, फिल्म सोसायटी यांसारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी अर्धवेळ काम केल्याने त्यांचे अनुभवविश्व अधिक समृद्ध होते.
* महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच संगणकीय कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
* अनेक महाविद्यालयांमध्ये मुख्य अभ्यासक्रमासोबत करता येतील असे वेगवेगळ्या प्रकारचे अर्धवेळ प्रशिक्षणक्रम आणि ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध असते, ते जरूर शिका. तुमच्या अभ्यासक्रमाला पूरक ठरेल असा एखादा अल्पावधीचा अभ्यासक्रम तुमच्या रेझ्युमेमध्ये भर घालेल.
* महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांच्या लेखनाला व्यासपीठ मिळावे, म्हणून विशेषांक काढले जातात. त्यात केलेले लेखन, संशोधन, सादरीकरण तुम्हाला पुढील करिअरच्या वाटचालीत नक्कीच उपयुक्त ठरेल.
* काही अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. अशा संधींचा जरूर लाभ घ्या. संशोधनाचा अनुभव तुमचे ज्ञान विस्तारण्यास नक्कीच उपयोगी ठरतो. संशोधनाच्या अनुभवाने तुमची कौशल्ये परिणामकारक पद्धतीने विकसित होतात आणि हा अनुभव नोकरी मिळण्यासाठी उपयुक्तठरतो.
* महाविद्यालयीन, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये जरूर सहभागी व्हा. त्यातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमता आणि कौशल्ये वृद्धिंगत होण्यास मदत होते. आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठीय स्तरावरील स्पर्धामुळे स्पर्धात्मक वातावरणाला सामोरे जायची सवय होते, आव्हाने पेलण्याची समज वाढते. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. हे सारे गुण तुम्हाला रोजगारक्षम तर बनवतातच, त्याचबरोबर करिअरमधील स्पर्धात्मक वातावरणात नक्कीच उपयोगी पडतात.
* शिकताना कुठलाही मोबदला न घेता केलेली स्वयंसेवा तुम्हाला कामाचा अनुभव देते, ते काम तुम्ही तुमच्या सीव्हीत नमूद करू शकाल.

* तुमच्यात रोजगारक्षम कौशल्ये असली तरी ती व्यक्त व्हायला हवीत. त्याचबरोबर कामाचा अनुभव, स्वयंसेवा आणि आयुष्यातील अनुभव यांमुळेही तुमच्यातील रोजगारक्षमता वाढते.
* नोकरी मिळण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नसते. कारण अर्ज करणारे सारेच पदवीधर असतात. अशा वेळी पदवीधरांनी स्वत:चे वेगळेपण सिद्ध करायला हवे.
* आधी तुमच्या अर्जातून तुमच्यातील रोजगारक्षमता व्यक्त होऊ दे आणि निवडीच्या नंतरच्या टप्प्यात- गटचर्चेतून अथवा मुलाखतीतून तुमच्यातील संवादकौशल्ये, नेतृत्त्वगुण यासारखी कौशल्ये दिसून आली पाहिजेत.
* या कौशल्यांच्या विकासाचा विचार तुम्ही तुमचे महाविद्यालयीन पदवी शिक्षण घेतानाच करायला हवा. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच विविध उपक्रमांत सहभागी होऊन ही कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करता येतील.

 

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job skills and abilities