एखादे करिअर आपण का निवडतो याचं आपल्याला भान हवं. व्यवसाय मार्गदर्शक जी माहिती देतील ती संपूर्ण असेलच असे नाही. याकरता संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना, उद्योजकांना भेटा. संबंधित क्षेत्राची माहिती मिळवा तसेच त्यातील यशस्वी व्यक्तींबाबत वाचा. सुट्टीत अशा व्यक्तींसोबत छोटे-मोठे काम करता येईल का ते बघा. त्या व्यवसायाचे फायदे-तोटे, धोके, भविष्यातील संधी जाणून घ्या. ज्या संस्थांमध्ये हे शिक्षण दिले जाते, त्या संस्थांना भेट द्या. ती वास्तू, तो परिसर यांतून वातावरणाचा अंदाज येतो. तिथले विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्याशीही बोला.
करिअर महत्त्वाचे, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची आपली तब्ब्येत. एरवी मनात असूनही ज्या गोष्टी वेळेअभावी करता येत नाहीत, त्या तुम्हाला सुटीत करता येतील. मॉर्निग वॉक, जॉगिंग, संध्याकाळी फुटबॉल, कबड्डीसारखे मैदानी खेळ, ट्रेकिंग, देशी-विदेशी पर्यटन अशा गोष्टींची योजना आपल्या पालकांसमवेत आखा. मित्रांचा गट बनवून बस, रेल्वेनं जवळच्या ठिकाणांना भेट द्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक दिवसीय शैक्षणिक सहलींचे आयोजन करता येईल. थोडा आत्मविश्वास आल्यावर पालकांच्या परवानगीने तुम्हाला निवासी प्रवास करता येईल. एखाद्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा कोणी नातेवाईक, ओळखीच्यांच्या घरी राहा. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. नातेवाईकांना भेटा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जिममध्ये अथवा पोहायला जरूर जायला हवं. किमान योगासने शिकून घ्या. या प्रशिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
सुटीत निरनिराळ्या कला व छंद यांची जोपासना करता येईल. यामुळे आपली एकाग्रता वाढते. अधिक काळ स्थिर राहण्याची सवय वाढीला लागते. स्मरणशक्ती सुधारते.
एखादा छंद तुमचा व्यवसाय होऊ शकतो अथवा तो छंद व्यवसाय, उच्च शिक्षणाला पूरक ठरू शकतो. किमान काहीजणांना याचा पॉकेटमनी मिळवण्याचा स्रोत म्हणून नक्कीच वापर करता येईल. एखादी गोष्ट जमते म्हटल्यावर आत्मविश्वास येतो. त्या गोष्टीची आवड निर्माण होते आणि मग त्याचा अधिक अभ्यास तुम्हाला करावासा वाटतो. अलीकडे अल्प कालावधीचे अनेक अभ्यासक्रम काही सामाजिक संस्था चालवतात. या अभ्यासक्रमांसाठी माफक शुल्क आकारले जाते. काही गोष्टी तर इंटरनेटवरही शिकता येतात.
आज खूप छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये स्वयंरोजगाराच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. कमी किंवा विनाभांडवलाचे उद्योग ज्यात करता येतील, असे काही अभ्यासक्रम, छंद, कला यांची ओळख करून घेऊयात. एक छोटं उदाहरण देण्याचा मोह होतो आहे. पन्नाशी उलटलेल्या, डॉक्टर असणाऱ्या माझ्या दोन मैत्रिणी छंद म्हणून पेपर क्विलिंग शिकल्या. दिवाळीनिमित्त भरलेल्या ग्राहकपेठेत क्विलिंगचा वापर केलेल्या अनेक गोष्टी त्यांनी विक्रीला ठेवल्या. झालेल्या नफ्याचे एक लाख रुपये त्यांनी कर्करोग झालेल्या रुग्णांच्या मदतीसाठी दिले.
क्विलिंग, पेपरवर्क, पेंटिंग, रांगोळी, फ्लॉवर मेकिंग, फ्लॉवर अरेंजमेंट, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, सुतारकाम, प्लंबिंग, ज्वेलरी मेकिंग, मोबाइल रिपेरिंग, मेकअप, हेअरड्रेसिंग, मेंदी काढणं, ड्रायव्हिंग, सायकलिंग, मसाज, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, लोकनृत्य, बॉलीवूड डान्स, नाटय़शिबीर, व्हॉइस कल्चर, सूत्रसंचालन, पोवाडा अथवा अभंग गायन, ओरिगामी, ‘एमएससीआयटी’चा अभ्यासक्रम, ग्राफिक डिझायनिंग, चारकोल पेंटिंग, गिफ्ट पॅकेजिंग, ग्लास पेंटिंग, बॅग मेकिंग, सॉफ्ट टॉइज बनवणं, बेकिंग, विविध प्रांतांतील कुकिंग, ब्रेललिपी शिकणे, वैज्ञानिक खेळणी अशी अनेक कौशल्ये तुम्हाला शिकता येतील.
परदेशात सुटीमध्ये अनेक विद्यार्थी कंट्रीसेल लावतात अथवा त्यांच्या वयाहून लहान मुलांसाठी फन विथ मॅथ्स, कॉन्कर द फिअर, डेस्टिनेशन, इमॅजिनेशन, रसायनशास्त्राची जादुई दुनिया असे विविध प्रकारचे १० ते १५ दिवसांचे प्रशिक्षणवर्ग चालवतात. यामुळे चार पैसेही कमावता येतात. तुम्हालाही मित्रांच्या मदतीने असे प्रयत्न करता येतील.
सुटीचा वापर असे कौशल्य शिकण्यासाठी केलात तर तुम्ही अनुभवांनी समृद्ध व्हाल. तुमचा आत्मविश्वास अधिक बहरेल. तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक व छाप पाडणारं होईल.
हे सर्व करताना नित्य नियमानं एक गोष्ट ध्यासपूर्वक करा ती म्हणजे वाचन. जवळच्या वाचनालयात नाव नोंदवा, टॅबवर पुस्तकं डाऊनलोड करा. आता जे हाती येईल ते पुस्तक, मासिकं, वृत्तपत्रे, पाक्षिके अधाशासारखी वाचा. जे वाचलं त्याबद्दल तुमचं मत लिहून ठेवा. लक्षात ठेवा, वाचनाअभावी आपलं व्यक्तिमत्त्व भलतंच खुजं होतं हे विसरू नका.
goreanuradha49@yahoo.in
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2015 रोजी प्रकाशित
क्षमता वाढविण्यासाठी सुटीचा वापर
सुटीत ठरलेल्या दिनक्रमापासून, अभ्यासाच्या ताणापासून आपली सुटका होते आणि करिअरच्या अनुषंगाने अभ्यासापलीकडचा विचार करण्याची संधी मिळते.
First published on: 22-04-2015 at 07:21 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use your vacation to improve your ability