3 Superfoods for Father Health : पन्नाशीनंतर महिलांप्रमाणे पुरुषही थकतात. उठता-बसताना आधार घेणे, जिने चढल्यावर दमल्यासारखं वाटणे, जड सामान उचलल्यावर हात दुखणे आदी समस्या जाणवू लागतात. त्यामुळे वय वाढत असताना, हृदयाचे आरोग्य मजबूत ठेवणे, रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि सांध्यांची हालचाल टिकवणे महत्वाचे असते.

तर याबद्दल पोषणतज्ज्ञ शालिनी सुधाकर म्हणातात की, या समस्यांसाठी तुमच्या दैनंदिन जीवनातील तीन साधे पदार्थ मदत करू शकतात. तसेच तुमच्या बाबांच्या दिनचर्येत त्यांचा समावेश करण्यास सांगणे सुद्धा योग्य ठरू शकते.

पन्नाशीनंतर तुमच्या बाबांनी काय खाल्लं पाहिजे?

१. लसूण – दररोज सकाळी रिकाम्या पोटी ६ ते ८ भाजलेल्या लसूण पाकळ्या खाण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. या सगळ्या लसूण पाकळ्या फक्त २-३ थेंब तुपात शिजवल्याने अ‍ॅलिसिन नावाचे संयुग सक्रिय होते; जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत सुद्धा करते. सकाळी बाबा उठण्याआधी एका पॅनमध्ये लसूण पाकळ्या दोन थेंब तूप घालून हलक्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या, त्यांना थंड होऊ द्या आणि मग बाबांना खाऊ घाला.

२. मेथीच्या बिया – तीन चमचे मेथीच्या बिया रात्रभर भिजवा आणि तुमच्या बाबांना नाश्ता, दुपारी, रात्री जेवणाच्या १५ मिनिटे आधी एक चमचा मेथीच्या बिया खायला द्या.या बियांमध्ये फायबर गॅलेक्टोमनन असते जे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात आणि यकृत, स्वादुपिंड आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यास मदत करतात.

३. भोपळ्याच्या बिया – झोपण्यापूर्वी एक तास आधी एक चमचा भोपळ्याच्या बियांचे सेवन करा. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३, सेलेनियम आणि लिग्नान्स असतात; असे पोषक घटक जे सांधे, मज्जासंस्थेचे आरोग्य, चांगली झोप आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. संध्याकाळची चहा किंवा हलका नाश्ता केल्यानंतर, भोपळ्याच्या बिया तुम्ही खाऊ शकता.

मग आता तुम्ही काय लक्षात ठेवाल?

  • हे पदार्थ तुमच्या बाबांच्या पन्नाशीनंतर शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण, हे कोणतेही चमत्कारिक उपाय नाहीत. त्याचबरोबर जेव्हा तुमचे वडील फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने खातील, नियमीत ऍक्टिव्ह राहतील आणि जास्त प्रोसेस्ड अन्नापासून दूर राहतील तेव्हाच हे उपाय जास्त परिणामकारक ठरतील.
  • पण, जीवनशैलीत कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांशी संपर्क साधणे फायद्याचे ठरू शकते. विशेषतः जर ते कोणत्याही आजारावर औषध घेत असतील तर.
  • त्याचप्रमाणे जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसूण, दुपारच्या जेवणापूर्वी बिया आणि रात्री झोपण्यापूर्वी भोपळ्याच्या बियाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच योग्य वेळ पाळल्याने फायदा अधिक मिळतो.