Parents Of CEOs Teach Successful Parenting: अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या प्री- वेडिंग कार्यक्रमात अनंत यांनी आपले वडील मुकेश अंबानी व आई नीता अंबानी यांच्यासाठी खास भाषण केले होते. या वेळी लेकाचे बोल ऐकून मुकेश अंबानी यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. अनंत यांनी म्हटले की, “माझं आयुष्य फार सोपं नव्हतं, विशेषतः आरोग्याच्या बाबत मी अनेक अडचणींचा सामना केलाय. पण आई- वडिलांनी नेहमी मला तू करू शकतोस, तू करायला हवं असं म्हणत प्रोत्साहन दिलं. म्हणून मी आज इथे आहे.” अनंत अंबानी यांच्या भाषणातून बोध घ्यायची बाब अशी की, पालक म्हणून आपली भूमिका पार पाडताना फक्त पैसे किंवा सुखसोयी देण्यापेक्षा सक्षमपणे उभं राहण्याचं बळ देणं अधिक महत्त्वाचे आहे. हेच बळ देण्यासाठी मुलांना लहानपणापासून कोणत्या गोष्टी शिकवायला हव्यात हे आज आपण पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या मुलांनी यशस्वी व्हावं यासाठी आधी आपण स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत, तसेच आपण नक्की कोणत्या गोष्टी त्यांना शिकवायला हव्यात, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. स्पर्धा वाढत असताना फक्त एखाद्याचं अनुसरण करण्यापेक्षा किंवा आपल्याला आवश्यक वाटतो म्हणून एखादा छंद पाल्यावर लादण्यापेक्षा व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, पाल्य व पालक दोघांनाही स्वतःमध्ये बदल करता आले पाहिजेत. हे बदल यशस्वीरित्या करून आपल्याला बाळांना CEO, सेलिब्रिटी शेफ, आणि मोठे अधिकारी केलेल्या काही पालकांकडून आज आपण याचा धडा घेणार आहोत. चला तर मग..

स्वावलंबन काय असतं?

‘हाऊ टू रेज सक्सेसफुल पीपल’ या पुस्तकाच्या लेखिका आणि पालो अल्टो हायस्कूल मीडिया आर्ट्स प्रोग्रामची स्थापना करणाऱ्या एस्थर वोजिकी यांनी आपल्या तीन मुलींना वाढवताना वापरलेले तंत्र सांगितले आहे. ‘बिझनेस इनसाईडर’च्या वृत्तानुसार, त्यांची एक कन्या सुझेन ही यूट्यूबची माजी सीईओ आहे तर, दुसरी लेक ॲन, ’23 And Me’ या ब्रॅण्डची सीईओ आहे, तिसरी लेक जेनेटसुद्धा आता एक डॉक्टर आणि बालरोगशास्त्राची प्राध्यापक आहे.

वोजिकी म्हणतात की “माझे पहिले ध्येय होते की माझ्या मुलींना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायचं, आणि मी त्यांच्या जन्मापासूनच यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मुली एक वर्षाच्या असताना मी त्यांना पोहायला शिकवलं. त्या १८ महिन्याच्या असताना घरात त्यांना लहान लहान कामे करायची सवय लावली, जेणेकरून त्या स्वावलंबी होतील. अगदी स्वतःचा नाश्ता स्वतः काढून घेण्याइतकं साधं काम का असेना पण ते स्वतः करायची सवय लावली. मी त्यांना फक्त दोन शो पाहू द्यायचे, ‘मिस्टर रॉजर्स’ आणि ‘सेसिमी स्ट्रीट.’

मुलांची ओळख काय?

न्यूयॉर्कमधील माजी रेस्टॉरंट उद्योजिका आणि मेक्सिकन कूकबुकच्या लेखक झारेला मार्टिनेझ यांनी जुळ्या मुलांना वाढवताना लक्षात ठेवलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे मार्टिनेझ यांनी सिंगल मदर म्हणून कुणाच्याही मदतीशिवाय आपल्या मुलांना वाढवले आणि त्यांचा एक मुलगा हा आता सेलिब्रिटी शेफ आहे. मार्टिनेझ सांगतात, “माझ्या मुलाने माझ्या पावलावर पाऊल ठेवून शेफ होण्याचं ठरवलं पण तेव्हाच त्याला हे सांगितलं की यशस्वी व्हायचे असेल तर तुला तुझी वेगळी ओळख निर्माण करावी लागेल, माझीच स्टाईल तू कॉपी करू शकत नाहीस. सात वर्षांचा असल्यापासून त्याला कामाची सवय लावली होती. “

शाळा- कॉलेजची निवड आणि पालकांचा हट्ट

सीझर रोल्डन या मेकॅनिकने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, तो १९८२ मध्ये मूळ ग्वाटेमालामधील गृहयुद्धादरम्यान अमेरिकेत स्थलांतरित झाला होता. त्यानंतर त्याने एल साल्वाडोरमधून स्थलांतरित झालेल्या अॅनाशी लग्न केले. लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील पिको रिवेरा या गावात त्याने तीन मुलांना वाढवून मोठे केले आणि आज, त्यांची तिन्ही मुले मेजर लीग सॉकरमध्ये नोकरी करतात. रॉल्डन म्हणाले की, “कॉलेजमध्ये अर्ज करताना मोठ्या मुलानेच सर्वकाही केले. महाविद्यालयात जाणारा तो कुटुंबातील पहिलाच होता त्यामुळे शाळा- कॉलेज शोधण्यापासून ते आवश्यक कागदपत्र देण्यापर्यंत अनेक कामात त्याला कुणालाच मदत करता आली नाही. पण यामुळेच त्याला स्वावलंबनाची सवय लागली.”

न दुखावता बोलायचं कसं?

मार्टिनेझ सांगतात, मुलांना इतरांचा स्वीकार करण्याची शिकवण देणे सुद्धा महत्त्वाचे आहे. इतरांचा सुद्धा विचार करणे हे मूल्य आपल्या मुलांमध्ये असायला हवे. सतत टीका करू नये किंवा करायचीच असेल तर इतरांना दुखवू नये हे सुद्धा महत्त्वाचे आहे. यासाठीच संभाषण कसे करावे हे सुद्धा मुलांना शिकवायला हवं. यालाच अनुमोदन देत रोल्डन म्हणाले की “लोकांचा आदर करणे व विनम्र राहणे हे मुलांना शिकवण्यावर आम्ही भर दिला.” तर वोझीकी यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मुलांना ही समज देणे गरजेचे आहे की, फक्त स्वतःबद्दल नाही तर आपल्याला जगाबद्दल आपुलकी बाळगणे गरजेचे आहे. ज्यांना आपल्याप्रमाणे सुख-सोयी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी मदतीचा हात होता आलं पाहिजे आणि याची मुलांना जाणीव करून देणं हे पालकांचे काम आहे.

आधी स्वतःला बदला मग मुलांना..

मार्टिनेझ, रोल्डन आणि वोझीकी तिघांनीही या मुद्द्यावर भर देताना सांगितले की, आम्ही स्वतः कधी काम करणे थांबवले नाही. आपल्याला मिळालेली नोकरी किंवा कोणतीही संधी ही आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आई वडिलांनी किती कष्ट घेतले आहेत हे मुलांना समजायला हवे. त्यांच्यात गुंतवणूक करताना आपण किती गोष्टींचा त्याग केलाय हे दिसणं आवश्यक आहे. ज्यामुळे ते पालकांची निराशा होईल असे वागणार नाहीत अन्यथा आपण काही काम न करता मुलांना पुढं जाण्यासाठी सांगत राहणे ही फक्त जबरदस्ती वाटू शकते. आपल्याला आपलं मुलं जसं वागायला हवं असेल त्या पद्धतीने आधी आपण स्वतः वागायला हवं. यशस्वी पाल्यांनी सांगितलेली ही सूत्र वापरलीत तर कदाचित आपली मुळेही सीइओ किंवा अतिवरिष्ठ पदावर दिसू शकतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 must have quality in child parents of ceos teach successful parenting to create identity of child anant ambani emotional speech hldc svs