How to eat apple: आधुनिक आहारशास्त्रानुसार, शरीर निरोगी ठेवण्यासाठी भाज्या, चपाती, डाळ आणि भातासोबतच फळांचे सेवन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. फळांमध्ये नैसर्गिक पोषक तत्त्वे असतात, जी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात. त्यात सफरचंद हे एक अत्यंत लोकप्रिय फळ आहे, जे खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव करता येतो. मात्र, अनेकांना सफरचंद सालीसकट खावे की सोलून खावे, या प्रश्नाचे नेमके उत्तर माहीत नसते.

सामान्यतः बहुतेक लोक सफरचंद न सोलताच खातात. कारण- त्याच्या सालीमध्ये जास्त पोषक तत्त्व असल्याचे समजले जाते. मात्र, वजन कमी करण्याच्या बाबतीतील तज्ज्ञ सुधीर अष्ट यांचे मत या बाबतीत काहीसे वेगळे आहे. त्यांनी सांगितले की, सफरचंद खाण्याबाबत योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व फळे सारखी नसतात.

सफरचंद कसे खावे?

सुधीर अष्ट यांच्या मते, सफरचंद नेहमी सोलून खावे. त्यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये स्पष्ट केले, “साल फळांच्या बाहेरील थराचे रक्षण करते. हे फळांच्या अंतर्गत पोषक तत्त्वांचे बाह्य घटकांपासून किंवा कीटकांच्या कणांपासून संरक्षण करते. तथापि, फळांच्या सालीसोबत येणारे काही घटक शरीरासाठी आवश्यक असले तरी सफरचंदाच्या सालीतील पोषक घटक फळांच्या गरासोबत मिसळल्यासच शरीराला फायदा होतो.”

त्याच वेळी ते म्हणतात की, सफरचंद सालीसह खाल्ल्याने कधी कधी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, विशेषतः ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी. म्हणून दररोज सफरचंद खाताना ते सोललेले खाणे चांगले. द्राक्षे किंवा आंबा, केळी यांसारख्या फळांसाठी नियम वेगळे आहेत; काही फळे सालीसह खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण- त्यातील पोषक तत्त्वे सालीसह शरीरासाठी फायदेशीर असतात.

सफरचंद कसे फायदेशीर ठरते?

सफरचंद हे केवळ चविष्टच नाही, तर शरीरासाठी खूप फायदेशीरदेखील आहे. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यात प्रामुख्याने फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात.

फायबर : पचन सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

व्हिटॅमिन सी: रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि त्वचा उजळवते.

पोटॅशियम: हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतो.

अँटिऑक्सिडंट्स: शरीराचे हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते ज्यामुळे दीर्घकालीन आजार टाळता येतात

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन संतुलित राहते, पचन मजबूत होते आणि संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहते.

अशा प्रकारे सफरचंदाचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. सालीसकट खाण्यापेक्षा सोलून खाण्याची सवय आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आणि उपयुक्त आहे. त्यामुळे रोजच्या आहारात सफरचंदाचा समावेश करा आणि या साध्या फळाच्या चमत्कारिक फायद्यांचा लाभ घ्या.