Mistakes while online hotel booking: सध्या आपली बरीचशी कामं ऑनलाइन पद्धतीने करण्याची सवय आपल्याला लागली आहे. साधं सिनेमाचं तिकीट, रेल्वेचं तिकीट किंवा अगदी फिरायला जाण्यासाठीच्या नियोजनातही ऑनलाइन पद्धतीनेच सर्वकाही केलं जातं. ऑनलाइन पद्धतीने सर्वकाही सोपं झालं आहे. फक्त काही क्लिक्स आणि गरजेनुसार फिल्टर केले की अचूक उत्तरं मिळतात. मात्र सोयीस्कर वाटणारी ही पद्धत तुम्हाला धोक्यातही आणू शकते. सहसा राज्याबाहेर किंवा इतरत्र फिरायला जाताना आपण ऑनलाइन हॉटेल बुक करतो, जे आपल्या खिशाला परवडणारं असेल. पण हे करताना लोक काही बेसिक चुका करतात. ऑनलाइन बुकिंग करताना एखाद्या साइटवरील दिशाभूल करणाऱ्या चित्रांमुळे असो किंवा अनपेक्षित किंमतीमुळे असो. अशा परिस्थितीत नंतर पश्चात्ताप करण्याऐवजी तुम्ही ऑनलाइन जर हॉटेल बुक करत असाल, तर या चुका अजिबात करू नका…
साइटवर दाखवलेले फोटो तपासा
ऑनलाइन बुकिंग स्वीकरणाऱ्या हॉटेल्सच्या वेबसाइटवर सुंदर खोल्यांचे आणि इतर सोयीसुविधांचे फोटो असतात. प्रत्येक खोली ही फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसणे शक्य नाही. म्हणजेच फोटोमध्ये समुद्राचे दृश्य दिसत असेल तर हॉटेलमधल्या प्रत्येक खोलीतून समुद्र दिसेलच असे नाही, तिथे पार्किंग लॉटचे दृश्यही असू शकते. किंवा बऱ्याचदा हे फोटो नवीन खोल्या असताना काढलेले असतात, मात्र त्या हॉटेलला किंवा तिथल्या खोल्यांमधील वस्तूंना गेली कित्येक वर्षे इतर पर्यटकांनी वापरले असेल तर त्या नवीन अजिबातच असू शकत नाही. त्यामुळे अचूक माहिती मिळवण्यासाठी सद्यस्थितीचे फोटो पाठवण्यास सांगू शकता.
हिडन चार्जेस बघा
ऑनलाइन हॉटेल बुक करताना बारिकसारिक गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, हे तुम्हाला नंतर महागात पडू शकते. अनेकदा ऑनलाइन बुकिंग करताना कॅन्सलेशन नियम, नाश्त्याचे पर्याय, वाय-फाय शुल्क किंवा रिसॉर्ट शुल्क याबाबत माहिती दिली जात नाही. त्यामुळे आधीच हे सर्व तपासा.
हॉटेलचं नेमकं ठिकाण बघा
ऑनलाइन हॉटेल बुक करण्यापूर्वी त्याचे ठिकाण निश्चित करून घ्या. अनेक हॉटेल्स शहराच्या मध्यभागी असल्याचा दावा करतात. मात्र, ते लांब अंतरावर असू शकतात. त्यामुळे तुमचा अनुभव काही वेगळा असू शकतो.
किंमतींची तुलना करा
ऑनलाइन हॉटेल बुक करताना आधी वेगवेगळ्या साइट्सवरील किंमतींची तुलना करा. तुम्हाला दिसणारं पहिलं डील बुक करणं शहाणपणाचं नाही. वेबसाइट्सनुसार दर वेगवेगळे असू शकतात.
पेमेंट सुरक्षा तपासा
अनेक फसव्या साइट्स बहुतेकदा प्रसिद्ध बुकिंग प्लॅटफॉर्मची नक्कल करतात. असुरक्षित पेजवर तुमचे कार्ड तपशील टाकल्याने डेटा चोरी होऊ शकते. वेबसाइट https:// याने सुरू होत असल्याची खात्री करा आणि सुरक्षित व्यवहारासाठी क्रेडिट कार्ड वापरा.