लहानपणी आपल्याला आई-आजोबांकडून “घास नीट चावा आणि मग गिळा”, असा सल्ला ऐकायला मिळायचा. त्यावेळी त्यांचा हा सल्ला अनेकांना रटाळवाणा वाटला असेल; पण तज्ज्ञांचे याबाबत म्हणणे असे आहे की, हा सल्ला फक्त घास चावण्यापुरता मर्यादित नाही, तर आपल्या शरीरासाठीही तो अत्यंत आरोग्यदायी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोक घाईघाईत जेवतात, ज्याचा पचनप्रक्रिया आणि शरीरावर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

आयुर्वेदानुसार ३२ वेळा चावणे का आवश्यक?

आयुर्वेदानुसार जेवणाचा प्रत्येक घास किमान ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्नपदार्थ हळूहळू खाल्ल्यास त्यातील पोषणतत्त्व शोषून घेण्यास शरीराला पुरेसा वेळ मिळतो. जर आपण अन्न पटकन खाल्ले, तर मेंदूला पोट भरल्याचे संकेत वेळेत मिळत नाहीत आणि परिणामी जास्त खाल्ले जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहणे कठीण होते. हळूहळू खाल्ल्यास भुकेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे शरीराच वजन संतुलन टिकून राहते.

पचन आणि शरीराचे फायदे

जेवणाचा प्रत्येक घास नीट चावल्यास पचन सुधारते. लाळेतील एंझाइम्स अन्नाचे विघटन करतात आणि पोषक घटक शरीराला व्यवस्थित मिळतात. पटापट जेवण केल्यास या नैसर्गिक एंझाइम्सची कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. हळूहळू खाल्ल्यास केवळ पचनच नाही, तर अन्न अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते आणि अतिरिक्त अन्न पोटात जमा होत नाही.

३२ वेळा चावल्याने आरोग्यला होणारे फायदे

वजन नियंत्रण : हळूहळू खाल्ल्याने अति खाणे टाळता येते.

पचन सुधारते: अन्न नीट पचल्याने शरीराची चयापचय गती वाढते.

गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी होते : पोटातील गॅस, फुगणे आणि जळजळ यांसारख्या समस्या दूर होतात.

हृदयाचे आरोग्य टिकते : नीट खाल्ल्यामुळे हृदयासंबंधीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

पोटाची चरबी कमी करते : अनावश्यक चरबी जमा होण्याची शक्यता कमी होते.

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ञांचा सल्ला आहे की, हळूहळू खाण्याची सवय लावल्याने केवळ पचन सुधारत नाही, तर संपूर्ण शरीराचे पोषणदेखील होते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत घाई करून खाल्लेले जेवण आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक घास नीट चावणे आणि मजा घेत खाणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

तेव्हा आता यापुढे आई वा ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेले असे सल्ले फक्त रटाळवाणे वाटतात म्हणून दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल. तसे न करता, त्यामागील मथितार्थ लक्षात घ्या. आपण अन्न हळूहळू, नीट चावून खाल्ल्यास शरीराला आवश्यक ते पोषण मिळते, वजन नियंत्रणात राहते आणि पचनासंबंधीच्या समस्या दूर होतात. त्यामुळे पुन्हा कधीही जेवताना थोडे संयमाने खा, आणि प्रत्येक घासाचा लाभ मिळवा!