कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India) आयओएस अॅप आता आयफोन (iPhone) आणि आयपॅडसाठीच्या (iPad) अॅप स्टोअरवर अर्थात अॅपल अॅप स्टोअरवर (Apple App Store) उपलब्ध झाला आहे. बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया किंवा BGMI ला भारतात मोठं यश मिळालं आहे. अँड्रॉइडसाठी जून २०२१ हा गेम उपलब्ध झाला. डेव्हलपर क्राफ्टनकडून (Developer Krafton) गेल्या काही काळापासून बीजीएमआयच्या iOS लॉंचबद्दल विधानं केली जात होती. कंपनीने सांगितलं होतं की ते बीजीएमआयला iOS पोर्टवर आणण्यासाठी देखील काम करत आहेत. आता अखेर हा लोकप्रिय बॅटल रॉयल गेम अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध झाला आहे.
Android नंतर काहीच दिवसांत iOS पोर्टवर उपलब्ध
BGMI फक्त अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी भारतात लाँच केले गेले. त्यातही कंपनीने यांच्या अॅपल आयओएस आवृत्तीवर काम करत असल्याचं सांगितलं. मात्र, यापूर्वी असा अंदाज लावला जात होता की iOS पोर्टवर येण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. परंतु क्राफ्टन इंकने लोकप्रिय मोबाइल गेम आयफोनवर आणण्यात बिलकुल वेळ वाया घालवला नाही असं दिसत आहे.
अनेक व्यावसायिक एस्पोर्ट्स खेळाडू आणि जगभरातील खेळाडू iOS डिव्हाइसवर PUBG मोबाइल खेळले. तर, भारतात BGMI अॅपल अॅप स्टोअरवर लॉंच होणं खूपचं अपेक्षित होतं. हे सध्या iOS ११.० किंवा त्यापुढच्या iPhones साठी iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. हा गेम १.९ जीबीचा आहे आणि अँड्रॉइडआवृत्ती प्रमाणेच खेळाडूंना इन्स्टॉलेशननंतर रिसोर्स पॅक आणि इतर अपडेट्स डाउनलोड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे.
गुगल प्ले स्टोअरवर ५० दशलक्षाहून अधिक डाऊनलोड्स
क्राफ्टनने जरी असं म्हटलं असलं की सुरु असलेल्या मेंटेनन्समुळे कदाचित iOS युझर्स त्वरित लॉगिन करू शकणार नाहीत परंतु हे काम (१८ ऑगस्ट २०२१) रात्री ९:४० वाजता संपणार आहे. अलीकडेच, बीजीएमआयने एकट्या गुगल प्ले स्टोअरवर ५० दशलक्षाहून अधिक डाऊनलोड्स पूर्ण करून एक उल्लेखनीय कामगिरी केली होती. म्हणून स्टुडिओने सर्व खेळाडूंना गेममध्ये कायमस्वरूपी गॅलेक्सी मेसेंजर सेट दिलं आहे.
iOS युझर्स त्यांच्या iPhone किंवा iPad वर Battlegrounds Mobile India डाउनलोड आणि प्ले करू शकतात. हा गेम मे महिन्याच्या मध्यावर गुगल प्ले स्टोअरवर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध होता, त्यानंतर १७ जून रोजी बीटामध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाला. त्यानंतर लगेचच, अँड्रॉईड युझर्सना बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया डाऊनलोड आणि प्ले करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर, २ जुलै रोजी त्यांचं अधिकृत अँड्रॉईड लाँच झाले. तर आता हा बॅटल रॉयल गेम अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध झाला आहे.