5 foods that instantly spike diabetes: स्त्यावरून चालताना आजूबाजूच्या पदार्थांचा सुगंध आला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तोंडाला पाणी सुटते. असं असताना जर तुम्हाला आधीच स्ट्रोक किंवा मधुमेह असेल तर तुम्ही रस्त्यावर अगदी चविष्ट असे काही फास्ट फूडचे प्रकार आवर्जून टाळले पाहिजेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थ हे बहुतेक रिफाइंड पीठ, साखर, बटाटे आणि बराच काळ कढईत असलेल्या तेलात तळलेले असतात. हे पदार्थ खाल्ल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत ते तासाभरात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. तर मग तुम्ही जर मधुमेही असाल, तर तोंडाला कितीही पाणी सुटलं तरी या काही पदार्थांपासून लांबच रहा…

समोसा

समोसा प्रामुख्याने पीठ आणि बटाटे यांनी भरलेला असतो. या दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जे पचल्यावर रक्तातील साखर झटक्यात वाढवतात.

पाणीपुरी

पाणीपुरी हा एक अतिशय लोकप्रिय फास्ट फूड पदार्थ आहे. अगदी गल्लोगल्ली पाणीपुरीचे स्टॉल दिसतात आणि ते दिसल्यावर आपसूकच तिकडे पावलं वळतात. पण हे पाय मधुमेहींनी जरा रोखावे. कारण पाणीपुरीच्या पुऱ्या या तळलेल्या असतात आणि त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. पाणीपुरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते. तेव्हा पाणीपुरी तिखट खाल्ली आणि मग तुमचं पोट साफ झालं असं वाटत असलं तरी साखर मात्र वाढते.

वडापाव

वडापावमधील पावामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे चयापचय क्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. रिफाइंड साखरेमुळे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करण्यासदेखील कारणीभूत ठरते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. शिवाय वडापावसोबत काही जण झणझणीत हिरवी मिरचीही खातात, त्याने गॅस, अतिसार अशा समस्या उद्भवू शकतात.

पावभाजी

पावभाजी ही रस्त्यावरील गाडीवर एका मोठ्या तव्यात तयार केली जाते. जिथे कुठलीही सुरक्षा पाळली जात नाही. उघड्यावर ही भाजी बनवली जाते. पावामध्ये साखर किंवा उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरप मिसळल्याने त्यात कॅलरीज जास्त असतात. जर नियमितपणे सेवन केले तर हे पदार्थ अस्वस्थ वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. अनेक अभ्यासांनुसार, यामुळे मधुमेहींमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

गुलाब जामुन

गुलाब जामुन हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. काहींना जेवण झाल्यावर गोडाचे पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र, मधुमेहींसाठी ही सवय अत्यंत घातक ठरू शकते. त्यात गुलाब जामुन म्हणजे साखरेचा अतिरेक. कारण त्यात रिफाइंड शुगर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

जिलेबी

जिलेबी खाल्ल्याने मधुमेहाची पातळी झपाट्याने वाढू शकते. कारण त्यात साखरेचा पाक आणि पीठ हे असे दोन घटक आहेत, जे मधुमेहींसाठी ट्रिगर पॉइंट्स आहेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढून इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो, त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

हे सर्व पदार्थ तुम्ही अगदी कमी प्रमाणात खाल्ले तरीही त्याचा विपरीत परिणाम तुमच्या रक्तातील साखरेवर होऊच शकतो. त्यामुळे प्रमाणावर काम करण्यापेक्षा हे पदार्थ खाणं टाळणंच योग्य आहे.