Gut inflammation symptoms: आपण अनेकदा थकवा, पोट फुगणं किंवा चेहऱ्यावर अचानक आलेली मुरमे यांकडे दुर्लक्ष करतो. पण, हेच संकेत तुमच्या शरीरातील एका गंभीर समस्येकडे इशारा करीत असतात. ‘गट इन्फ्लेमेशन’ म्हणजेच आतड्यांना येणारी सूज! होय, शरीराच्या आत आलेली ही सूज हळूहळू तुमची रोगप्रतिकारक शक्ती, पचनक्रिया आणि मानसिक आरोग्यावरही घाला घालू शकते.

वैज्ञानिक संशोधनानुसार, जेव्हा आतड्यांच्या भित्तींवर (lining) सूज येते, तेव्हा शरीरातील पोषणशक्ती शोषून घेण्याची प्रक्रिया विस्कळित होते. त्याचबरोबर ‘गट-ब्रेन अॅक्सिस‘ म्हणजे मेंदू व पचनसंस्था यांतील नाते बिघडते आणि त्याचे विपरीत परिणाम थेट आपल्या मूड, झोप व एकाग्रतेवर झाल्याचे दिसून येते. त्याचा अर्थ आपल्या शरीरात आतड्यांमध्ये (गटमध्ये) सूज किंवा जळजळ सुरू आहे आणि आता ती इतकी वाढली आहे की, ती गंभीर टप्प्यात पोहोचली आहे. खालील सहा लक्षणं दिसत असल्यास, तुमच्याभोवती या समस्येचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे, असं समजा. म्हणजे तुमच्या आतड्यांच्या समस्येने हळूहळू आता गंभीर स्वरूप धारण केले आहे आणि शरीर आपल्याला त्यासंबंधी काही इशारे (लक्षणे) देत आहे.

१. पोट फुगणं (Bloating)

जेवण झाल्यावर पोट फुगल्यासारखं वाटणं ही फक्त पचनाची समस्या नाही. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्या (gut microbiota) संतुलनात बिघाड झाल्यास आतड्यांच्या हालचालींचे कार्य बिघडते आणि त्यामुळे सूज व पोट फुगणं वाढतं.

२. सततचा थकवा (Fatigue)

रोज पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा जात नसेल, तर ती शरीरांतर्गत सूजेची निशाणी असू शकते. एका संशोधनानुसार, Inflammatory Bowel Disease (IBD) असलेल्या जवळपास ५०% रुग्णांना दीर्घकाळ थकवा जाणवतो.

३. मेंदूवर धूसरपणा (Brain Fog)

एकाग्रता कमी होणं, विसरभोळेपणा आणि विचार करण्याची गती मंदावणं हे फक्त ताणामुळे नाही, तर आतड्यांत जळजळ होण्यामुळेही होतं. संशोधकांच्या मते, दीर्घकाळ कमी न होणारी सूज मेंदूकडून मिळणाऱ्या संदेशांवर विपरीत परिणाम करते आणि गट-ब्रेन अॅक्सिस कमकुवत करते.

४. पिंपल्स आणि मुरमे (Acne)

चेहऱ्यावर अचानक वाढलेली मुरमांची समस्या अनेकदा हार्मोन्सवर ढकलली जाते. पण, संशोधन सांगतं की, गट सूज आणि त्वचेचं आरोग्य यांचं थेट नातं आहे. पचनसंस्थेत सूज वाढली की, त्वचेतील संतुलन बिघडतं आणि मुरमांचे प्रमाण वाढते.

५. चेहऱ्यावर लालसरपणा (Rosacea)

चेहऱ्यावर लालसरपणा, सूज आणि लहान रक्तवाहिन्या दिसू लागणं – या लक्षणांचं एक कारण म्हणजे आतड्यांत होणारी दीर्घकालीन सूज! संशोधन दाखवून देते की, ज्यांचा चेहरा लालसर (Rosacea) होण्याचा त्रास होत असतो, त्यांच्या बाबतीत गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांचं प्रमाण जास्त असतं.

६. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं (Weak Immunity)

सुमारे ७० ते ८०% रोगप्रतिकारक पेशी पचनसंस्थेत असतात. त्यामुळे जर आतड्यांना सूज असेल, तर संपूर्ण शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि मग त्यांच्यावर वारंवार लहान लहान आजारांचा घाला पडत असतो.

सूज कमी करण्यासाठी काय करावे?

डॉक्टर सांगतात की, आहार आणि जीवनशैलीत काही बदल केल्यास ही शरीरांतर्गत सूज कमी होऊ शकते.

  • दररोज दही, ताक किंवा केफिरसारख्या प्रो-बायोटिक पदार्थांचं सेवन करा.
  • फायबरयुक्त आहार सफरचंद, केळी, ब्रोकोली, जौ आणि ओट्स खा.
  • किमचीसारख्या फर्मेंटेड भाज्या आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवतात.

पण लक्षात ठेवा, हे उपाय करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण- प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि योग्य निदान केल्याशिवाय उपाययोजना करणं धोकादायक ठरू शकतं.

जर तुम्हाला वारंवार पोट फुगणं, थकवा किंवा चेहऱ्यावर मुरमे येणे असे त्रास होत असतील, तर तो शरीराकडून मिळणारा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण- आतड्यांत लपलेली ही सूजच तुमचं आरोग्य बिघडण्याचं मूळ कारण असू शकते.