आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मुलांना वेळेवर झोपवणं हे अनेक पालकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. टीव्ही, मोबाईल, घरातील सततची हालचाल किंवा अतिउत्साहामुळे मुलं बराच वेळ जागी राहतात. झोप कमी झाल्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो, लक्ष केंद्रित होत नाही आणि शारीरिक वाढीतही अडथळा येतो. म्हणूनच मुलांची झोप वेळेत आणि शांतपणे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया काही असे सोपे आणि घरच्या घरी करता येणारे उपाय, ज्यांनी तुमचं मूल रात्री त्रास न देता लवकर झोपी जाईल.
१. झोपेची ठरलेली वेळ निश्चित करा
मुलांना रोज एकाच वेळी झोपवणं आणि उठवणं ही सवय लावणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं जैविक घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) सेट होतं आणि ठरलेल्या वेळेला शरीर स्वतःच झोपेचा सिग्नल देऊ लागतं. सुरुवातीला थोडं कठीण वाटलं तरी जर तुम्ही सातत्य ठेवलं, तर ही सवय सोपी होते.
२. झोपण्यापूर्वी शांत आणि आरामदायी वातावरण तयार करा
झोपण्याच्या किमान एक तास आधी खोलीतील प्रखर दिवे बंद करा आणि मंद दिवे चालू करा. मोबाईल, टीव्ही किंवा टॅबलेटसारख्या स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवा. अशा उपकरणांमधून येणारा निळा प्रकाश (ब्ल्यू लाइट) झोपेचं हार्मोन कमी करतो. शांत वातावरणात मुलं पटकन शांत होतात आणि झोप येऊ लागते.
३. कॅफिन किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळा
झोपण्याच्या आधी मुलांना चॉकलेट, कोल्ड ड्रिंक किंवा साखरयुक्त स्नॅक्स देणं टाळा. त्यामुळे त्यांच्या शरीरात ऊर्जा वाढते आणि झोप येत नाही. तसेच खूप भरलेलं पोट किंवा अगदी रिकामं पोट या दोन्हीमुळेही झोपेत अडथळा येतो. हलकं आणि पचायला सोपं काहीतरी द्या.
४. झोपण्यापूर्वी एक अंगाई गीत किंवा गोष्ट सांगा
आई किंवा वडिलांनी हळू आवाजात गोष्ट सांगणं, प्रेरणादायी कथा वाचून दाखवणं किंवा अंगाई गीत म्हणणं हे मुलांना भावनिक सुरक्षितता देतं. त्यांचं मन शांत होतं आणि ती सहज झोपी जातात. ही वेळ तुम्ही आणि मुलं यांच्यातील नातं मजबूत करणारीही असू शकते.
५. कोमट दूध
झोपण्याच्या आधी कोमट दूध पाजणं हा पारंपरिक; पण प्रभावी उपाय आहे. दुधात असलेला ट्रिप्टोफॅन हा घटक शरीरात झोपेसाठी आवश्यक असणारे हार्मोन्स तयार करतो. त्यामुळे मुलांना खोल आणि शांत झोप लागते.
मुलांना झोपवणं ही लढाई नसून ती एक सवय आहे. तुम्ही फक्त संयम ठेवा आणि रोज हळूहळू हे नियम पाळा. बघता बघता, तुमचं मूल स्वतःहून वेळेवर झोपायला शिकेल आणि तुम्हालाही रात्रीची थकवा मिटवणारी शांत आणि निवांत झोप येईल.