Unhappy Leaves Rule In Company: “आज काम करायची इच्छाच होत नाहीये”, असा विचार आठवड्यातून किती वेळा तुमच्या मनात येतो? अर्थात यावर काही उपाय नाही म्हणून विचार बाजूला करून लॅपटॉप उघडून कीबोर्ड बडवावा लागतो ही गोष्ट वेगळी. पण तुम्हाला माहित आहे का, कर्मचाऱ्यांच्या या समस्येवर चीनच्या एका कंपनीने अगदी मोठया मनाने तोडगा काढलाय.

Pang Dong Lai चे संस्थापक आणि अध्यक्ष- Yu Donglai- यांनी अलीकडेच आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी १० दिवसांची ‘दुःखी रजा’ जाहीर केली आहे. वर्षभरात या १० सुट्ट्यांसाठी कर्मचारी अर्ज करू शकतात. “प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही. त्यामुळे आनंद नसताना कामावर येण्याची गरज नाही, उलट यावेळी तुम्ही आराम करायला हवा तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करायला हव्यात” असं म्हणत Yu Donglai यांनी ‘दुःखी रजा’ किंवा ‘नाखूष रजा’ या संकल्पनेची घोषणा केल्याचे समजतेय. विशेष म्हणजे या रजा कंपनीच्या व्यवस्थापनाद्वारे नाकारल्या जाणार नाहीत याचीही हमी Yu Donglai यांनी दिली आहे.

२०२१ च्या चीनमधील सर्वेक्षणात ६५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर थकल्यासारखे आणि नाराज वाटतात असे समोर आले होते. यानंतर काम व खासगी आयुष्याचे संतुलन राखण्यासाठी, कंपनीच्या रोजगार धोरणानुसार कर्मचाऱ्यांना दिवसातून फक्त सात तास काम करावे लागेल असेही सांगण्यात आले होते. याशिवाय आठवड्याच्या शेवटी (शनिवार- रविवार) सुट्टी असेल आणि प्रत्येक वर्षाला ३० ते ४० दिवसांची रजा व नवीन वर्षासाठी ५ दिवसांची रजा असेल. ही घोषणा करताना Yu Donglai म्हणतात की, “आम्हाला फक्त मोठं व्हायचं नाही, आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना निरोगी व आरामदायी आयुष्य सुद्धा द्यायचं आहे, यामुळेच आमची कंपनी सुद्धा प्रगती करू शकेल.”

प्राप्त माहितीनुसार, याच कंपनीने यापूर्वी नोकरीसाठी एक प्रमाणपत्र प्रणाली सुद्धा तयार केली होती. याची घोषणा करताना Yu Donglai म्हणाले होते की, “कंपनीतील स्वच्छता कर्मचारी सुद्धा त्याच्या कामाच्या क्षमतेनुसार वर्षाला साधारण ५ लाख युआन म्हणजेच (७० हजार अमेरिकन डॉलर्स) कमावू शकतो.” तसेच ठराविक वेळेपेक्षा जास्त काम करायला लावणाऱ्या वरिष्ठांवर टीका करताना Donglai यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. “कर्मचाऱ्यांना अधिक वेळ काम करायला लावणे हे अनैतिक आहे यामुळे आपण इतर लोकांच्या प्रगतीच्या संधी हिरावून घेत आहोत” असे Donglai म्हणाले होते.

हे ही वाचा<< Fact check: भाजपाच्या रॅलीत अभिनेत्री कंगना रनौतशी असभ्य वर्तन? व्हायरल होणारा Video नेमका कुठला? वाचा सत्य

दरम्यान, ही ‘दुःखी रजेची’ घोषणा होताच सोशल मीडियावर नेटकरी या कंपनीचं तोंडभरून कौतुक करत आहेत. “एवढा चांगला बॉस मिळण्यासाठी कोणतं व्रत करावं”, असा प्रश्न काहींनी गंमतीत विचारला आहे. तर काहींनी ही पद्धत चीनमध्येच नाही जगभरात अवलंबली पाहिजे असंही कमेंट्समध्ये लिहिलं आहे. भारतीय कंपन्यांमध्ये असा नियम कधी लागू होईल का आणि झालाच तर तुम्हाला आवडेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.