Leftover Soap Hacks : आपण सगळेच नियमितपणे अंघोळ करण्यासाठी साबणाचा वापर करतो. पण प्रत्येकजण वापर असलेल्या साबणाचा रंग, सुगंध, आकार वेगळा असतो. यात अनेकांना साबण अंगावर चोळून भरपूर फेस येईपर्यंत अंघोळ केल्याशिवाय जमत नाही. अशाने तो साबण आठवड्याभरात संपतो. पण साबण संपल्यानंतर शेवटी एक छोटा तुकडा उरतो. जो आपण एकतर नवीन साबणाच्या वडीला चिकटवून वापरतो किंवा फेकून देतो, नाहीतर अनेक दिवस तो कसा बॉक्समध्ये पडून राहतो.
पण तुम्हाला माहिती आहे का की, उरलेल्या साबणाचे हे तुकडे खूप उपयुक्त आहेत? हो, तुम्ही ते पुन्हा वापरून पैशांची काहीप्रमाणात का होईना बचत करु शकता. जर तुम्ही उरलेल्या साबणाचे छोटे तुकडे फेकून देत असाल तर थांबा आणि त्याचा पुन्हा कसा वापर करायचा जाणून घ्या.
नवीन साबण बनवा
साबणाच्या उरलेल्या तुकड्यांपासून तुम्ही नवीन साबण देखील तयार करू शकता. हा साबण तुम्ही बाथरुममधून आल्यानंतर हात धुण्यासाठी किंवा बुटांमधील कुबट वास घालवण्यासाठी वापरु शकता. यासाठी प्रथम साबणाचे छोटे तुकडे गोळा करा. आता ते एका भांड्यात चांगल्याप्रकारे वितळवा. हे तुकडे पूर्णपणे विरघळतील तेव्हा तयार मिश्रण एका साच्यात काढून थंड करा. तुम्ही ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवूनही गोठवू शकता. अशा प्रकारे तुमचा नवीन साबण तयार होईल. जो रात्रभर बुटांमध्ये ठेवून त्यातील कुवट वास घालवू शकता.
लिक्विड हँडवॉश तयार करा
उरलेल्या साबणाच्या तुकड्यांपासून तुम्ही घरीच लिक्विड हँडवॉश तयार करू शकता. यासाठी प्रथम उरलेल्या साबणाचे बारीक तुकडे करा, यानंतर एका बाटलीत पाणी घ्या आणि त्यात साबणाचा तयार केलेला चुरा चांगला मिक्स करा. चांगला सुगंध येण्यासाठी तुम्ही त्यात आवडीचे अरोमा ऑईल देखील घालू शकता. अशाप्रकारे तुम्ही लिक्विड हँडवॉश तयार करु शकता.
कपडे धुण्यासाठी करा वापरा
उरलेला साबण तुम्ही कपडे धुण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी उरलेले साबणाचे तुकडे गोळा करुन ते एका लहान जाळीत जमा करा किंवा कापडात बांधा आणि ते कपडे धुण्याच्या बॉक्समध्ये ठेवा. आता कपडे धुताना साबणाच्या तुकड्यांनी भरलेली जाळी पाण्यात भिजवा आणि कपड्यांवर घासून घ्या, यामुळे फेस देखील तयार होईल आणि कपडे देखील सहज स्वच्छ होतील.