Make dhoop with marigold flowers: देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सणासुदीच्या काळात पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही फुले रंगीबेरंगी आणि सुगंधी असतात. मात्र, पूजा झाल्यानंतर अनेकदा ती फेकून दिली जातात. पूजा केल्यानंतर फुले वाया जातात. अनेकदा ती कचऱ्यात फेकली जातात. तुम्ही त्यांचा पुन्हा वापर करू शकता. झेंडूच्या फुलांपासून तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने धूप, अगरबत्ती बनवू शकता. अशाने फुले वाया न जाता त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. फुलांपासून बनवलेल्या या धूपाचा वापर पूजेतही करू शकता. अगरबत्ती केवळ घराला सुगंधित करत नाही, तर मनालाही शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते.

घरी अगरबत्ती किंवा धूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

७ ते ८ झेंडूची फुले
४ ते ५ कापूर
५ ते ६ गुलाबाची फुले
२ ते ३ तमालपत्र
६ ते ७ लवंग
४ ते ५ दालचिनीच्या काड्या
२ चमचे चंदन पावडर
१ चमचा मध
२ चमचे तूप

अगरबत्ती, धूप कसे बनवायचे?

अगरबत्ती, धूप बनवण्यासाठी सर्वात आधी हे सर्व साहित्य गोळा करा. नंतर ते उन्हात वाळवा. वाळल्यानंतर ते मिक्सरमध्ये ठेवा आणि बारीक करा. आता त्याची पावडर चाळणीतून चाळून घ्या. त्यानंतर उरलेले कण पुन्हा मिक्सरमध्ये घाला आणि ते बारीक होईपर्यंत वाटून घ्या.

आता एका प्लेटमध्ये ही पावडर घ्या. तूप, मध आणि थोडे पाणी घाला आणि मिक्स करा. हवे असल्यास तुम्ही तीळाचे तेलही वापरू शकता. एकदा हे पूर्णपणे मिसळले की तुम्ही हव्या त्या आकारात अगरबत्ती किंवा धूप तयार करू शकता. त्यानंतर पुन्हा ते उन्हात चांगले वाळवून घ्यावे.