Pink vs white guava: पेरू हे डायबिटीज रूग्णांसाठी सर्वात अनुकूल असं फळ मानलं जातं. ते आहारातील फायबर, जीवनसत्त्व सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फळ आहे. ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. या फळाच्या बिया ज्या गुलाबी किंवा पांढऱ्या गरात आढळतात, त्यासुद्धा फायबरचा उत्तम स्त्रोत मानल्या जातात. या पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत करतात. पण मग प्रश्न असा पडतो की गुलाबी पेरू चांगला की पांढरा? तर मग जाणून घेऊ नेमका कोणता पेरू आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो…

एडविना राज, हेड ऑफ सर्व्हिसेस, क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, ऍस्टर सीएमआय हॉस्पिटल, बंगळुरू यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी साधलेल्या संवादात दोन्ही प्रकारचे पेरू आरोग्यासाठी चांगले आणि पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

गुलाबी पेरू अँटी-ऑक्सिडंट्ससारख्या लाइकोपीनने समृद्ध आहे, ते हृदयाचं रक्षण करतं आणि कॅन्सरचा धोका कमी करतं. त्यात व्हिटॅमिन ए सुद्धा जास्त असतं, त्यामुळे त्याला तेजस्वी रंग मिळतो. तर पांढऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि पचन सुधारतात अशी माहिती राज यांनी दिली.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कन्सलटंट डॉ. राशी अग्रवाल यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, गुलाबी आणि पांढरे दोन्ही पेरू पोषणाच्या दृष्टीने आणि चयापचयाच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. त्यांच्या पोषक घटकांमध्ये तफावत तर आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

पांढरा पेरू

पांढऱ्या पेरूमध्ये त्यातही प्रामुख्याने साल आणि बियांच्या जवळील भागात जास्त फायबर असतं. ते रक्तातील साखरेचं शोषण कमी करतं, पोट भरलेलं ठेवतं आणि पचन सुधारतं. फायबर आंत्राच्या हालचाली नियमित ठेवतं आणि वाईट एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतं. ते डायबिटीज किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असणाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. सालासह पेरू खाल्ल्याने फायबरचं प्रमाण वाढतं आणि जेवणानंतर जास्त वेळ भूक लागत नाही.

गुलाबी पेरू

गुलाबी रंग लायकोपीन नावाच्या अँटी-ऑक्सिडंटमुळे येतो. तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेबस, हृदयविकार आणि काही प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण करतो. लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी मिळून फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करतात, जे स्वादुपिंड आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे इन्सुलिनचे कार्य आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य टिकवण्यात मदत होते. गुलाबी पेरू थोडा गोड असतो, पण त्यातील फायबरमुळे रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम अत्यल्प असतो.

एंडोक्रायनोलॉजिकल दृष्टिकोनातून डॉ. अग्रवाल सांगतात की, दोन्ही प्रकारचे पेरू एकत्र खाल्ल्यास फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे उत्तम मिश्रण मिळते. हे चयापचय संतुलन राखतात, जेवणानंतर रक्तातील साखरेच्या चढ-उतारांना नियंत्रित करतात आणि पेशींना संरक्षण देतात.

डायबिटीज रूग्णांसाठी कोणता पेरू चांगला?

एडविन राज यांनी स्पष्ट केलं की, डायबिटीज रूग्णांसाठी गुलाबी पेरू थोडा अधिक फायदेशीर आहे. गुलाबी पेरूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. ते साखरेचं रक्तात शोषण कमी करतं आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतं. त्यात लाइकोपीनसारखे अँटी-ऑक्सिडंट्सही जास्त असतात, जे हृदयाचं रक्षण करतात आणि एकूण आरोग्य सुधारतात. पांढऱ्या पेरूमध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स थोडे कमी असतात, पण तेही मर्यादित प्रमाणात खाणं चांगलं आहे.

डायबिटीज रूग्णांनी दिवसाला १ ते २ पेरू खावेत, तेही साखर न घालता आणि शक्यतो कच्च्या स्वरूपात खावेत असा सल्ला तज्ज्ञ देतात. भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांसह संतुलित आहारात पेरूचा समावेश केल्याने डायबिटीज नियंत्रणात ठेवता येतो. महत्त्वाचं म्हणजे फक्त एका रंगाच्या पेरीवर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण फळ खाणं हेच आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर आहे.

(टिप: हा लेख सार्वजनिक माहिती आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)