Diabetes in Pregnancy: गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेकदा गर्भावस्थेतील मधुमेह होतो. यामध्ये शरीरातील इन्सुलिन योग्यरित्या काम करत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी वाढतेय ही स्थिती तात्पुरती असते, मात्र वेळीच उपचार केला नाही तर ती आई बाळ दोघांसाठीही हानिकारक ठरू शकते. अशा काळात योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न हळूहळू ऊर्जा देतात आणि रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होत नाही. म्हणून कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.
गर्भावस्थेच्या मधुमेहाचा सामना करताना अन्नाची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते आणि आई व बाळ दोघांसाठीही धोके कमी करू शकतात.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ
- धान्य: लाल तांदूळ, ओट्स, क्विनोआ, बार्ली आणि बाजरी किंवा ज्वारी
- डाळी आणि शेंगा: हरभरा, मसूर, राजमा आणि वाटाणे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ असतात.
- हिरव्या भाज्या: पालक, ब्रोकोली, भेंडी, शिमला मिरची आणि दुधी यासारख्या भाज्या साखर नियंत्रणात ठेवतात
- फळे: सफरचंद, नाशपती, स्ट्रॉबेरी आणि पेरूसारखी फळे मर्यादित खा
- दुग्धजन्य पदार्थ: कमी चरबीयुक्त दूध आणि साधे दही हे चांगले पर्याय आहेत
- सुकामेवा आणि बिया: बदाम, अक्रोड, जवस आणि चिया सीड्स हे नाश्त्याचे चांगले पर्याय आहेत.
आहार आणि जीवनशैली टिप्स
- तुमच्या साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे जेवण करा
- पांढरा ब्रेड, पांढरा भात आणि रिफाइंड पीठापासून बनवलेले पदार्थ टाळा
- प्रत्येक जेवणात प्रथिने आणि फायबरचा समावेश करा
- फळे मर्यादित प्रमाणात खा, फळांच्या ज्यूसऐवजी फळे खा
- चालणे किंवा योगा यासारख्या हलक्या शारीरिक हालचाली फायदेशीर आहेत.
