Home Cleaning Jugaadu Tips Video: मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून गुडूप झालेला पाऊस पुन्हा आल्याने पाण्याची चिंता, शेतीची काळजी काहीशी कमी झाली आहे. पण दुसरीकडे पावसाला जोडून येणारे अन्य प्रश्न सुद्धा समोर उभे ठाकले आहेत. तुम्हीही तुमच्या घरात पावसाळ्यात स्वच्छता कशी राखावी या काळजीत असाल तर आजची आपली जुगाडू ट्रिक तुमच्या चांगलीच कामी येणार आहे. पावसाळ्यात बाथरूम व टॉयलेटमध्ये अनेकदा किडे, गांडूळ वगैरे येतात. अगदी तुम्ही बिल्डिंगमध्ये राहात असाल तरीही हा त्रास काही सुटत नाही. शिवाय बाथरूमच्या टॉयलेटच्या भिंतींना सुद्धा ओल लागते. रंग असेल तर पापुद्रे निघू लागतात आणि टाईल्स लावलेल्या असतील तर सतत चिकटपणा जाणवत राहतो. यामुळे अनेकदा बाथरूम- टॉयलेटमध्ये दुर्गंधी सुद्धा पसरते.

वर नमूद केलेल्या प्रश्नांची साधी- सोपी उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला फार खर्च करायची आवश्यकता नाही. युट्युबवर अविका रावत फूड्स या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, मिठाची पिशवी तुमचे हे त्रास दूर करू शकते. तुम्हाला करायचं काय आहे हे पाहूया..

१) सर्वात आधी मिठाची एक रिकामी पिशवी घ्या. यात एक ते दोन चमचे मीठ घाला.
२) तुम्हाला दुर्गंधीही दूर करायची असेल तर त्यात लवंग/ वेलची किंवा बेकिंग सोडा घालावा.
३) सैंधव मीठ वापरणे अतिउत्तम
४) मग ही पिशवी कमोडच्या मागे किंवा एखाद्या कोपऱ्यात लटकवा.
५) मीठ हे हवेतील आद्रता शोषून घेते तर बेकिंग सोडा दुर्गंधी कमी करते.

दरम्यान, वेळोवेळी हे मीठ बदलत राहावे अन्यथा मीठाचे पाणी झाल्यामुळे सुद्धा हवेतील ओलावा वाढू शकतो. साधारण एक-दीड दिवसांनी मीठ बदलले तरी चालते. या पद्धतीने आपण घरच्या घरीच टॉयलेट फ्रेशनर बनवू शकता.

हे ही वाचा<< माणूस न जेवता किती दिवस जगू शकतो? प्रत्येक दिवशी शरीरात काय बदलतं, शरीराचं गणित नीट जाणून घ्या 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)