दिवाळीचा सणासुदीचा काळ लक्षात घेत Samy Informatics या भारतीय कंपनीने एक नवा स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. दिल्लीतील constitution Club मध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला. या टीव्हीची पूर्णपणे भारतात निर्मिती करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.
कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त टीव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. Tuffen ग्लासचा वापर करण्यात आलेला हा टीव्ही Android वर कार्यरत राहिल. टणक ग्लासमुळे टीव्हीचा ग्लास तुटणार नाही. 32 इंचाच्या या टीव्हीची किंमत फक्त 5,999 रुपये असून केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हा टीव्ही खरेदी करता येईल. टीव्हीच्या किंमतीव्यतिरिक्त ग्राहकांना जीएसटी आणि शिपिंग चार्ज वेगळा द्यावा लागणार आहे.
का स्वस्तात विक्री?
या 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची विक्री इतक्या कमी किंमतीत केली जाणार आहे, कारण टीव्ही सुरू केल्यानंतर ग्राहकांना जाहिराती दाखवण्यात येतील. स्वस्तात विकत असले तरी कंपनीला टीव्हीतून दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींद्वारे पैसे मिळणार आहेत. जाहिराती ग्राहकांना नको असल्यास, त्या हटवण्याचा पर्यायही उपलब्ध असेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
या कंपनीचे संकेतस्थळ आहे, पण टीव्हीची विक्री कंपनी वेगळ्या प्रकारे करते. लिंकवर क्लिक केल्यास युजर आपोआप रिडायरेक्ट होऊन अॅपवर जातो. त्यामुळे अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे. टीव्ही खरेदी करण्यासाठी अॅपवर आधार कार्डची नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतरच हा टीव्ही ग्राहकांना खरेदी करता येईल. आधार कार्डवरील माहिती व अॅपवर भरलेली माहिती योग्य आहे का याची तपासणी केल्यानंतर ग्राहकांना हा टीव्ही खरेदी करता येईल.