Gargle For Sore Throat: पावसाचे महिने आता संपत आले आहेत, पुढील काही आठवड्यांमध्ये हिवाळ्याला सुरुवात होईल. अशातच आता परतीच्या पावसासह ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढायला सुरुवात होणार आहे. बदलत्या वातावरणात अनेकदा व्हायरल इन्फेक्शनचा प्रसार अधिक वेगाने होऊ लागतो. महाराष्ट्रातील अनेक भागात आता व्हायरल संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. जेव्हा असे संसर्ग पसरतात तेव्हा मुख्यतः नाक, डोळे, जीभ, व घसा यावर अधिक परिणाम होतो. आजच्या या लेखात आपण घसा बसने, घश्यात खवखव जाणवणे, बोलताना- आवंढा गिळताना टोचल्यासारखं वाटणे अशा समस्यांवर काही साधे- सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत.
आजीच्या बटव्यातील उपाय पाहायचा तर घसा खराब झाल्यावर त्याला शेक देणं म्हणजेच गरम पाणी पिणं खूप महत्त्वाचं व फायदेशीर ठरू शकतं. नुसतं साधं गरम पाणी प्यायलात तरीही तुम्हाला घशाला आराम मिळू शकतो पण संसर्ग टाळायचे असतील तर या गरम पाण्यात किचनमधील काही जादुई पदार्थ आपण मिसळू शकता. हे पदार्थ कोणते व त्यांचा फायदा काय हे ही पाहूया…
- हळद, मीठ व पाणी
हळदीमध्ये असंख्य फायदे आहेत हे वारंवार अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे, हळद ही निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरते. तर मीठ सुद्धा अँटी- बॅक्टेरियल सत्वांनी समृद्ध असतं. या दोन्ही गोष्टी गरम पाण्यात मिसळून आपण नुसत्या गुळण्या केल्या तरी घशाला येणारी सूज व खवखव कमी होण्यास मदत होऊ शकते.
- त्रिफळा
त्रिफळा हे एक आयुर्वेदिक औषध म्हणता येईल जे दाहविरोधी गुणाने समृद्ध आहे. आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला सहज त्रिफळा चूर्ण मिळू शकते. गरम पाण्यात मिसळून या औषधाने गुळण्या केल्यास टॉन्सिल्ससारखे त्रास दूर व्हायला सुद्धा मदत होऊ शकते.
हे ही वाचा<< ३० सेकंदात वाटीभर लसूण सोलण्यासाठी ‘या’ ६ टिप्स वापरून पाहा, तुमची नखं मानतील आभार
- तुळशीचे पाणी
बहुसंख्य घरांच्या दारात- खिडकीमध्ये तुळशीचं लहानसं का होईना रोप असतंच. तुळशीतही अनेक औषधी सत्व आहे. तुम्ही या सत्वांचा फायदा घेण्यासाठी कोमट पाण्यात तुळशीची पाने घालून त्या पाण्याने गुळण्या करू शकता. तुळशीच्या अँटी- बॅक्टेरियल व अँटी- फंगल गुणांनी घसा दुखण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)