Tulsi vivah 2025: २ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक निद्रेमधून जागे होतात. या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणतात. हिंदू धर्मात शुभ कार्य भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सुरू करतात असे मानले जाते. या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. हिंदू धर्मात तुळशीला पवित्र आणि दिव्य मानले जाते. असं असताना यासंदर्भात एक मनोरंजक आणि विशेष गोष्ट अशी आहे की, गणपतीच्या पूजेदरम्यान तुळशीचा वापर कधीही केला जात नाही. यामागे एक पौराणिक कथा आहे ती जाणून घेऊ…
तुळशीने आणि गणपतीने का दिले एकमेकांना श्राप?
तुळशी माता यांचं गणेशावर प्रेम होतं आणि त्यांच्याशी त्या विवाह करू इच्छित होत्या. कथेनुसार, एक दिवशी तुळस आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी थेट गणेशाकडे गेली. तिने नम्रपणे गणेशाला आपल्या भावना व्यक्त केल्या आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. असं असताना गणेशाने तिचा विवाह प्रस्ताव नाकारला. हा नकार तुळशीसाठी खूप दु:खद आणि अमपानकारक होता. तिची भक्ती आणि प्रेम असूनही गणेशाने ते शक्य मानले नाही. परिणामी तुळस संतापली आणि तिने गणेशाला श्राप दिला की त्यांची दोन लग्न होतील.
या शापामुळेच गणेशाने रिद्धी आणि सिद्धी या दोन दिव्य बहिणींशी लग्न केले. तुळशीच्या शापामुळे गणेश संतप्त झाले आणि त्यांनी तुळशीलाही श्राप दिला. गणेशाने तुळस एका राक्षसाशी लग्न करेल असा श्राप दिला. या श्रापामुळे तुळशीने राक्षस कुळातील राजा जालंधरशी विवाह केला.
पौराणिक कथेनुसार, तुळशी मातेला तिची चूक कळताच तिने गणेशाची माफी मागितली. गणेशाने तिची प्रार्थना ऐकली आणि वचन दिले की कालांतराने तुळशीमाता एक वनस्पतीचे रूप धारण करेल. तिची पूजा आणि आदर केला जाईल. या वनस्पतीला तुळशी असे नाव देण्यात आले आणि ती धार्मिक विधी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी प्रतीक मानली जाऊ लागली. त्यावेळी गणेशाने हेही स्पष्ट केले की, त्याच्या पूजेत मात्र तुळशीचा वापर केला जाणार नाही. म्हणूनच आजही गणपतीच्या पूजेत तुळशी अर्पण करण्याची पद्धत नाही.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
