Cheating Partner Signs: प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, हल्ली असं निर्मळ आणि नि:स्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. अलीकडच्या काळातील अनेक तरुण-तरुणींना प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं याच गोष्टींकडे लक्ष असतं, त्यामुळे जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते नातंदेखील तुटतं.

हल्लीच्या काळात दोन व्यक्तींचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही गैरसमज आणि अविश्वासामुळे नातं कमकुवत होताना दिसतं. कालांतराने हे नातं तुटतं. हे नातं तुटण्यामागे अनेकदा दोघांपैकी एक व्यक्ती जबाबदार असते, ज्यात विश्वासघात हे सर्वात मोठे कारण आहे. नात्यामध्ये असताना आपल्या जोडीदाराचा हळूहळू बदलणारा स्वभाव, वागणं, बोलणं या सगळ्याच गोष्टी धोक्याची घंटा ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला प्रेमातील हेच धोक्याचे संकेत सांगणार आहोत.

पार्टनरच्या वागण्यात ‘या’ गोष्टी म्हणजे धोक्याचे संकेत

अचानक स्वभावात बदल

एकेकाळी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असल्याची शाश्वती देणारा जोडीदार तुमच्याशी कमी बोलू लागतो. त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या स्वभावात खूप फरक पाहायला मिळतो. पूर्वीसारखे व्यक्त होण्यास तो टाळतो. कॉल, मेसेजला तो लवकर प्रतिसाद देत नाही.

खोटं बोलणं

तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देण्याच्या तयारीत असेल तर तो हळूहळू अनेक गोष्टी लपवतो. पूर्वी सर्व गोष्टी शेअर करणारा तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगत नाही. यावर तुम्ही जाब विचारल्यास तुमच्याशी खोटं बोलू शकतो.

राग येणं

विश्वासघात करण्यापूर्वी पार्टनर तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवतो. त्याच्या आयुष्यात नक्की काय काय सुरू आहे हे सांगण्यास तो महत्त्व देत नाही. यावर तुम्ही त्याला जास्तीचे प्रश्न विचारल्यास तो तुमच्यावर चिडचिड करतो, रागावतो.

निष्काळजीपणा दाखवणं

एकेकाळी तुमची खूप काळजी करणारा पार्टनर हळूहळू तुमच्या कोणत्याच गोष्टीला अधिक महत्त्व देत नाही. तुमच्या आयुष्यातील अडचणींबद्दल ते निष्काळजीपणा दाखवतात. शिवाय तुम्ही स्वतःहून त्यांच्याशी बोलणे सोडून दिले तरीही यावर ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.