How to fix a wooden door: पावसाळ्यात अनेकदा घरातील स्वच्छता, बिघडलेल्या वस्तू यामुळे आपली कामंच जास्त वाढतात. या दिवसांत अनेकांना घरात भिंतीला ओल धरण्याचा, जमीन चिकट होण्याचा, कपडे न सुकण्याचा, दरवाजे घट्ट होण्याचा त्रास होतो. परंतु, आपल्या भारतीयांकडे प्रत्येक गोष्टींचा घरगुती उपाय असतोच. त्यामुळे आज आपण पावसाळ्यातील मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे घराच्या दारं-खिडक्यांचे दरवाजे पावसात फुगल्याने घट्ट होणे यावर उपाय पाहणार आहोत.
पावसाळ्यात दारं-खिडक्या फुगून घट्ट झाल्यास करा ‘हे’ उपाय
तेलाचा वापर
तेल लाकडाच्या पृष्ठभागाचं रक्षण करतं. यासाठी कापसाच्या बोळ्याने दरवाजाला तेल लावल्याने पाण्याचे ओले थेंब दारावर टिकत नाहीत आणि दरवाजे फुगण्याचे प्रमाण कमी होते.
सँडपेपरचा करा वापर
पावसाळ्यात दरवाजे नियमितपणे स्वच्छ केले तर ते जाम होण्याची शक्यता नसते. बऱ्याचदा सांध्याभोवती गंज लागल्याने दरवाजा जाम होतो. अशा परिस्थितीत लोखंडी खिडक्या किंवा दरवाज्यांवर सँडपेपरने घासून घ्या, यामुळे जाम झालेला दरवाजा अगदी सहजपणे दुरुस्त होऊ शकतो.
वॅक्सचा वापर
बाजारात दारांसाठी विशेष पॉलिशसुद्धा उपलब्ध असते. तुम्ही अगदी कोणाचीही मदत न घेतासुद्धा हे पॉलिश दारावर लावू शकता. यामुळे लाकडी दरवाजे फुगण्याचे प्रमाण तर कमी होतेच, त्याशिवाय दरवाजाला एक नवीन झळाळीसुद्धा मिळू शकते.
मेणबत्ती वापरा
तुम्हाला बाजारातून वॅक्स आणायचे नसल्यास घरच्याघरी काही मेणबत्त्यांच्या चुरा करून त्यात तेल घालून नीट मिसळून घ्या आणि हेच मिश्रण तुम्ही दरवाजावर लावू शकता.
मोहरीचे तेल
अनेकदा लाकडी दरवाजा फुगल्यावर कड्या व स्क्रूवर खूप दबाव येतो, त्यामुळे त्यांनासुद्धा वंगणाची गरज आहे हे लक्षात घ्या. तुम्ही कापडावर किंवा कापसाच्या बोळ्यावर मोहरीचे काही थेंब तेल घेऊन हे जॉइंट्स पुसू शकता, त्यामुळे घर्षणाने येणारा कर्कश्श आवाजसुद्धा कमी होऊ शकतो.
पुसण्याची पद्धत
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कितीही उपाय केले आणि पुन्हा पुन्हा दरवाजे स्वच्छ करताना ओला कपडा वापरला तर तुमचा कोणताच त्रास कमी होणार नाही. आपल्याला साधारणपणे कुठलीही गोष्ट स्वच्छ करताना ओले फडके फिरवल्याशिवाय स्वच्छ वाटतच नाही. पण, अशा सवयींमुळे दारं-खिडक्यांचे नुकसान होऊ शकते. काच स्वच्छ करायला वापरले जाणारे लिक्विडसुद्धा दारांवर स्प्रे करू नका. कोरड्या कपड्याने लाकडी वस्तू पुसण्याची सवय लावा.