Kdney Disease Symptoms: चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे बहुतेक लोकांना लहान वयातच मूत्रपिंडाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाणे, खूप कमी पाणी पिणे, अतिप्रमाणात जास्त चहा, कॉफी, कोल्डड्रिंक्स पिणे यांमुळे मूत्रपिंडांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दैनंदिन जीवनातील या चुकीच्या सवयींमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. मूत्रपिंडाचे नुकसान होण्यापूर्वी काही लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखल्याने समस्या टाळता येऊ शकते.

मूत्रपिंड निकामी होण्याआधी शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे

पायांना अचानक सूज येणे

पायांना अचानक सूज येणे हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते. जर सूज बराच काळ राहिली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चेहरा सुजतो

जेव्हा मूत्रपिंडे योग्यरीत्या कार्य करीत नाहीत तेव्हा शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर पडत नाहीत. जेव्हा विषाक्त पदार्थ जमा होऊ लागतात तेव्हा चेहरा सुजतो.

मळमळणे

मूत्रपिंड निकामी होण्याआधी कोणत्याही कारणाशिवाय उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटणे हेदेखील मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते.

लघवीमध्ये रक्त

लघवीमध्ये रक्त येणे आणि सतत पिवळी लघवी होणे हेदेखील मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते. तसेच लघवीला फेस येतो; परंतु जर तो बराच काळ राहिला, तर ते मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते. तेव्हा मूत्रपिंडांचे आरोग्य सांभाळण्यासाठी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.