Toilet cleaning tips: आपल्या घरातील बाथरूम हा सर्वांत जास्त वापरला जाणारा कोपरा असतो; पण त्याची स्वच्छता राखणे मात्र अनेकांना अवघड जाते. बाजारातील क्लीनर्स केवळ महागडेच नसून, त्यातील रसायनांमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळी एक अगदी सहज उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजेच मीठ तुम्हाला स्वच्छतेसाठी मदत करू शकतो. मिठासोबत बेकिंग सोडा, थोडे न्यूट्रल तेल आणि हवं तर लिंबाचा रस यांच्या साह्याने टॉयलेटला पुन्हा चमकदार आणि जंतुमुक्त करता येते. ही पद्धत केवळ सोपी नसून., पर्यावरणपूरक आणि अत्यंत फायदेशीर आहे.

टॉयलेट क्लीनर बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

मीठ – २५० ग्रॅम (डाग घासून काढण्यासाठी नैसर्गिक स्क्रबर म्हणून कार्य करते)

बेकिंग सोडा – २५० ग्रॅम (वास दूर करून घाण सैल करतो)

सूर्यफूल किंवा कोणतेही न्यूट्रल तेल – २५ टेबलस्पून (मिश्रण भिंतींवर चिकटून राहण्यासाठी मदत करते)

पर्यायी – लिंबाचा रस (शेवटी ताजेतवाने करणारा सुगंध आणि चमक देण्यासाठी)

वापरण्याची पद्धत

सर्वप्रथम मीठ, बेकिंग सोडा व तेल थेट टॉयलेटच्या कडेकडेला ओतून घ्या. हे मिश्रण रात्रभर तसेच राहू द्या, जेणेकरून ते सर्व कोपऱ्यांमध्ये पोहोचून जंतू आणि डाग सैल करतील. दुसऱ्या दिवशी गरम पाणी ओतून फ्लश करा. हवं तर शेवटी लिंबाचा रस ओतून पुन्हा फ्लश केल्यास ताजेतवाने करणारा सुगंध येतो आणि पृष्ठभाग अधिकच चमकदार दिसतो.

किती वेळा करावा हा उपाय?

महिन्यातून किमान एकदा हा उपाय केल्यास बाथरूम स्वच्छ आणि दुर्गंधमुक्त होते. स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणारे लोक दर १५ दिवसांनी ही कृती करू शकतात.

साफसफाईच्या आणखी काही सोप्या टिप्स

स्वच्छतेचा अधिक परिणाम चांगला साधला जावा. म्हणून कधी कधी टॉयलेट ब्रशने कोपरे हलकेसे घासल्यास लपलेली घाणसुद्धा बाहेर येते. टाइल्सवर स्टीम क्लिनिंग केल्यास बुरशी सहज निघून जाते. मात्र, त्याचा अति वापर टाळणे गरजेचे असते. कधी कधी गरज पडल्यास, टाइल्सच्या ग्रॉउट लाइन्समध्ये थोडेसे ब्लीच लावल्यानं त्या उजळतात, आणि जर ग्रॉउट खूप गडद झाला असेल, तर त्यावर थोडासा रंग लावल्यास संपूर्ण बाथरूम नव्यासारखे चकचकीत दिसते.

नैसर्गिक मीठ वापरणे फायदेशीर कसे?

नैसर्गिक मिठाचा वापर करण्यामागे सर्वांत मोठा फायदा म्हणजे ते स्वस्त असून कुठल्याही घरात सहजगत्या उपलब्ध असते. त्यात कोणतेही हानिकारक रसायन नसल्यामुळे ते आरोग्यास, तसेच पाळीव प्राण्यांसाठीही सुरक्षित ठरते. मीठ आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण जंतुनाशक म्हणून कार्य करीत डाग आणि दुर्गंधी दोन्हीवर नियंत्रण ठेवते. या प्रक्रियेत रसायनांचा वापर कमी होत असल्याने पर्यावरणालाही त्याचा लाभ होतो.