Best Exercise For Women: महिलांनी वाढत्या वयासह आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहायला हवे. आजपर्यंत आपण ३५ ते ५० वय ओलांडलेल्या महिलांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यायला हवी, कोणते व्यायाम करायला हवेत. याबाबत अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत. पण, पंचविशी ओलांडलेल्या तरुणींनीही आरोग्याबाबत जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे. आरोग्यदायी जीवनशैली आणि संतुलित आहार यांचा अवलंब करून तुम्ही दीर्घकाळ तरुण राहू शकता. वाढत्या वयानुसार महिलांना अशक्तपणा, अनियमित मासिक पाळी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु, जर तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार व व्यायाम यांचा दिनचर्येत समावेश करून, त्याप्रमाणे सुरुवात केलीत, तर तुम्ही या समस्या टाळू शकता. योगाद्वारे मासिक पाळीच्या वेदनादेखील मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच दोन योगासनांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही करणे गरजेचे आहे.

मार्जरी आसन (Cat Cow Pose)

मार्जरी आसन सर्वांसाठी फायदेशीर आहे. पण, जर महिलांनी हे आसन दररोज केले, तर त्यांच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. या आसनामुळे पेल्विक फ्लोरचे स्नायू मजबूत होतात. तसेच रक्तप्रवाहाचे चलनवलन योग्य प्रकारे होते. मासिक पाळीदरम्यान वेदनांच्या समस्येचा त्रास होत नाही. पाठीचा कणा मजबूत होतो. हा व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारते.

मार्जरी आसन कसे करावे?

मार्जरी आसन करण्यासाठी योगा मॅटवर बसा. त्यानंतर दोन्ही गुडघे पुढे नेऊन गुडघ्यांवर बसा. अशा रीतीने हळूहळू वज्रासन मुद्रेत या त्यानंतर तुमचे दोन्ही हात गुडघ्याच्या पुढे न्या आणि योगा मॅटवर टेकवा. पुढे दोन्ही हातांच्या मनगटांवर थोडा भार देऊन नितंबाचा भाग वर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही मांड्या वरच्या दिशेला नेत सरळ रेषेत आणा. त्यामुळे तुमच्या गुडघ्यामध्ये ९० अंशाचा कोन तयार होईल. या मुद्रेत तुमच्या छातीचा भाग जमिनीला समांतर असेल. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन डोक्याचा भाग मागच्या बाजूला आणा आणि बेंबी वरच्या बाजूने नेऊन ताणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पाठीचा कण्याच्या शेवटचा भाग वर आणण्याचा प्रयत्न करा. आता श्वास सोडताना डोके खाली नेऊन तोंडाखाली हनुवटीने छातीला स्पर्श करायचा प्रयत्न करा. ही प्रकिया पाच वेळा तरी करा.

पर्वतासन (Mountain Pose)

पंचविशीनंतर महिलांना केसगळतीची समस्या अनेकदा जाणवते. अशा परिस्थितीत पर्वतासन केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच पर्वतासनामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर लवचिक बनते. अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते. प्रजनन क्षमता सुधारते. तसेच, पोटाची चरबीदेखील कमी होते.

पर्वतासन कसे करावे?

पर्वतासन करण्यासाठी प्रथम वज्रासनात बसून घ्या. त्यानंतर दोन्ही हात आणि पायांची बोटे हळूहळू जमिनीवर ठेवा. त्रिकोणी आकारात कंबर शक्य तितकी वर खेचण्याचा प्रयत्न करा. या आसनात तुमच्या शरीराचा आकार उभ्या डोंगरासारखा दिसायला हवा. दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा आणि काही काळ त्याच स्थितीत राहा.