रघुनंदन गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३५ वर्षांपूर्वी ‘भारतीय बुद्धिबळाचा इतिहास’ या विषयावर पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत मी एक भाषण दिलं होतं. त्या वेळी काही जुन्या पुस्तकांचा उल्लेख केला होता आणि काळाच्या ओघात मी ते विसरून गेलो; पण काही दिवसांपूर्वी मला ‘Jewels of Chess’ हे नवं पुस्तक पाहायला मिळालं आणि आपल्या पूर्वजांच्या देदीप्यमान बुद्धिमत्तेची ओळख वाचकांना करून द्यायचं मनात आलं.

रावणाची पत्नी मंदोदरी लग्न झाल्यावर भारतातील माहेराहून लंकेत सासरी गेली त्या वेळी तिनं सोबत बुद्धिबळाचा खेळ नेला होता, असा उल्लेख पुराणात आढळतो. यावरून आपल्या पूर्वजांनी हा खेळ शेकडो वर्षांपूर्वी शोधून काढला होता याची साक्ष मिळते; पण आज मी आपल्याला आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या दोन महान बुद्धिबळ ग्रंथांची ओळख करून देणार आहे. त्यांची नावे आहेत- ‘विलासमणिमंजरी’ आणि ‘बालक-हित:बुद्धिबलक्रीडनम्’!

‘विलासमणिमंजरी’ हा ग्रंथ २५० वर्षांपूर्वीचा आहे आणि फक्त ७ श्लोकांचा (आणि त्यावरील ‘भामिनी’ या टीकेचा), तर बालक-हित:बुद्धिबलक्रीडनम्’ आहे सुमारे १००० वर्षांपूर्वीचा! दुसरे बाजीराव पेशवे यांनी २५० वर्षांपूर्वी तिरुपतीच्या त्रिवेंगडाचार्य शास्त्री नावाच्या तेलुगू विद्वानाला बुद्धिबळावर पुस्तक लिहिण्यास सांगितलं गेलं आणि ‘विलासमणिमंजरी’ या एका महान कलाकृतीचा जन्म झाला. कोणत्याही पुस्तकाला महान कलाकृती म्हणणे हे धाडसाचे काम आहे; पण मी हे साहस पूर्ण विचारांती करत आहे. मला खात्री आहे की, या पुस्तकाचं वर्णन वाचल्यावर वाचकांनाही आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटेल.

त्रिवेंगडाचार्य शास्त्री हे तिरुपतीचे रहिवासी होते यापेक्षा त्यांच्याविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही; परंतु त्यांनी ‘विलासमणिमंजरी’ नावाचं पुस्तक लिहून आपलं नाव बुद्धिबळ जगतात अजरामर करून ठेवलं आहे यात शंका नाही. सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि खेळाडू हॉवर्ड स्टॉनटन यानं त्याच्या ‘Chess Playersl Companion’ या १८८७ साली निघालेल्या पुस्तकात काय लिहिलं आहे ते वाचा – ‘‘त्रिवेंगडाचार्य शास्त्री यांनी लिहिलेल्या मूळ संस्कृत पुस्तकात डावाच्या अंतिम अवस्थेची आश्चर्यकारक उदाहरणे दिली आहेत. एम. डी. क्रुझ यांनी १८१४ साली भाषांतर केलेल्या या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.’’

या पुस्तकात वापरलेली शब्दावलीही मनोरंजक आहे. पांढऱ्या मोहऱ्यांसाठी ‘जाडा’ आणि काळय़ांसाठी ‘बारका’ हे शब्द खेळणाऱ्या खेळाडूसाठी चपखल बसणारे नसतील, पण करमणूक करणारे आहेत. विचार करा – १२५ किलो वजनाच्या खेळाडूला काळी मोहरी असतील तर तो काय सांगेल? – आज मी बारका आहे!

आता वाचकांची या अफलातून पुस्तकाविषयीची उत्कंठा मी जास्त ताणून धरत नाही. त्रिवेंगडाचार्य शास्त्री हे किती उच्च प्रतीचे बुद्धिबळ खेळाडू असतील याची कल्पना आपणास त्यांनी तयार केलेल्या बुद्धिबळ कोडय़ांमधून येईल. त्यांनी अगदी नवख्या खेळाडूला पचतील अशा कोडय़ांनी सुरुवात करून वाचकाला गुंगवून ठेवायचं काम छान केलं आहे. पुस्तकाची सुरुवात ‘पांढऱ्यानं (जाडय़ानं) खेळून एका चालीत मात करा’ यानं होते आणि कोडी सोडवता सोडवता आपल्याला त्रिवेंगडाचार्य शास्त्री घेऊन जातात ते सामान्य वकुबाच्या बुद्धिबळ खेळाडूला सोडविता न येणाऱ्या, पण रंजक अशा महान कूटप्रश्नांकडे! वाचक म्हणतील, की यात काय मोठे? असे अनेक कूटप्रश्न आम्ही सोडवले आहेत! पण खरी गंमत तर पुढेच आहे. या कूटप्रश्नांना सोडविण्यासाठी काही अटी आहेत. उदाहरणार्थ – कोडे क्रमांक ४८ घ्या!

ते सोडवण्यासाठी ४ अटी आहेत – १) काळय़ा राजासमोरचं प्यादं मारायचं नाही. २) स्वत:चा घोडा हलवायचा नाही. ३) एका विशिष्ट प्याद्यानंच मात करायची आणि ४) हे सर्व १२ खेळय़ांत झाले पाहिजे. प्रथमदर्शनी हे अशक्य वाटतं, पण त्रिवेंगडाचार्यानी दिलेलं उत्तर पाहिलं, की आपले हात आपोआप जोडले जातात. अशी अनेक कोडी सोडवता सोडवता आपण सर्वात मोठय़ा कूटप्रश्नाकडे येतो.

 ‘विलासमणिमंजरी’मधील कोडं क्रमांक ६२ मध्ये पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळून काळय़ा राजाला मात द्यायची आहे; नुसती नाही तर प्याद्यानं मात करायची आहे आणि तीपण २२५ खेळय़ांत!! या महापंडिताचा बुद्धय़ांक (I.Q.) किती असावा याचा विचार करून आपण थक्क होतो! संगणक मदतीला नसताना त्यांनी हे कोडं तयार केलं. या कोडय़ाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे- तेही एका संस्कृत श्लोकाद्वारे!! एका माणसाचं किती गोष्टींवर प्रभुत्व असावं? परंतु दुर्दैवानं हा जो सर्वात मोठा कूटप्रश्न आहे त्याचं उत्तर मात्र काळाच्या ओघात नष्ट झालं आहे. संस्कृत ग्रंथाच्या त्या भागाला बहुधा वाळवी लागली असावी. त्यामुळे त्रिवेंगडाचार्य शास्त्रींच्या अपुऱ्या श्लोकामुळे २२५ चालींत मात कशी करावयाची याचा पत्ता लागत नाही; परंतु यावरून शास्त्रीजी किती महान होते याची अजून एक साक्ष मिळते.

आता वाचकांची उत्सुकता फार ताणली गेली असेल आणि त्यांना हे पुस्तक बघायचं असेल तर त्यांना संस्कृत येण्याची बिलकूल गरज नाही. पुण्यातील बुद्धिबळ खेळाडू/ प्रशिक्षक अनिरुद्ध देशपांडे यांनी या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर केलं आहे आणि ‘Jewels of Chess’ या नावाने ते बाजारात आणलं आहे. ते अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

अनिरुद्धनं ‘विलासमणिमंजरी’चं भाषांतर करताना मूळ पुस्तकाचा गाभा कायम राखला आहे आणि जवळजवळ सर्व कूटप्रश्नांचं अर्थात संस्कृत श्लोकांचं भाषांतर करून सोडवून दाखवलं आहे. ‘विलासमणिमंजरी’मध्ये हिंदूस्थानी आणि विलायती अशा दोन्ही प्रकारच्या बुद्धिबळांचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे चिनी, कर्नाटकी, मिश्र कर्नाटकी, दाक्षिणात्य यांचीही यथोचित माहिती देण्यात आली आहे; पण सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे त्रिवेंगडाचार्यानी उल्लेख केलेला ‘महाविलास’ हा बुद्धिबळाचा प्रकार.

कॅपाब्लांका नावाच्या जगज्जेत्यानं एकदा उद्वेगानं असे उद्गार काढले होते की, ‘‘बुद्धिबळ आता कंटाळवाणं होत चाललं आहे. त्यासाठी ८ x ८ ऐवजी १० x १० च्या पटाची गरज आहे.’’ (सुदैवानं असं झालं नाही आणि कॅपाब्लांकाच्या निधनानंतर ८० वर्षांनी हा खेळ मूळ स्वरूपात जिवंत आहे.) परंतु ‘कॅपाब्लांका बुद्धिबळ’ नावानं १०० घरांचा एक डाव त्या जगज्जेत्यानं तयार केला. त्याचं ‘सुंदर कल्पना’ म्हणून खूप कौतुकपण झालं ! परंतु ‘विलासमणिमंजरी’मध्ये २५० वर्षांपूर्वी त्रिवेंगडाचार्य शास्त्रींनी ‘महाविलास’ नावानं १० x १० घरांचा पट आणि त्यावरचे कूटप्रश्नही दाखवून दिले आहेत. दुर्दैवानं त्रिवेंगडाचार्य शास्त्री काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांचा सर्वाना विसर पडला.

पूर्वीचं भारतीय प्रकारचं बुद्धिबळ किचकट होतं आणि त्यामध्ये पारंगत होणं महाकठीण होतं. गंमत म्हणजे नवख्या खेळाडूला तरबेज खेळाडू अनेक सवलतीही देत असत. उदाहरणार्थ, स्वत: वजीर काढून ठेवणं किंवा प्रतिस्पर्ध्याला दोन वजीर देणं. सगळय़ात कठीण प्रकार म्हणजे ज्याला ‘त्रिवेंगडाचार्य शास्त्री प्यादी’ म्हणतात. यामध्ये खेळाडू समोरच्या खेळाडूवर सांगून प्याद्यानं मात करत असे. त्याहून महाकठीण प्रकार म्हणजे प्रतिस्पर्धी सांगेल त्या प्याद्याला डावाच्या प्रारंभी चुना लावण्यात येत असे आणि तरबेज खेळाडू त्याच प्याद्यानं मात देत असे.

यापूर्वी याच स्तंभात एक लेख लिहून डोळय़ावर पट्टी बांधून बुद्धिबळ खेळण्याच्या प्रकाराचा उल्लेख केला होता. त्रिवेंगडाचार्य याही प्रकाराचा समावेश आपल्या पुस्तकात करतात आणि महान खेळाडू एका वेळी अनेक जणांशी या प्रकारे खेळू शकतात, असे लिहून जातात. तासन् तास चालणाऱ्या भारतीय परंपरेच्या बुद्धिबळात असं डोळय़ावर पट्टी बांधून खेळणं किती कठीण असेल याचा वाचकांनी अंदाज करावा. याचं कारण भारतीय बुद्धिबळाचे नियम किचकट होते. उदाहरणार्थ, आपल्या वजिरावर प्रतिस्पर्धी प्याद्यानं हल्ला केला तर काय करायचं? आपल्या वजिराला प्याद्यानं आधार दिला की झाले! आपला वजीर वाचला, पण त्यामुळे डावात गुंतागुंत वाढत जात असे. 

मी गेल्या अनेक लेखांमध्ये बुद्धिबळाच्या खेळामुळे मुलांची बुद्धिमत्ता विकसित होते अशा अनेक पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी घेतलेल्या शोधांचा उल्लेख केला होता. हे सगळे प्रयोग गेल्या ५० वर्षांमधले आहेत; परंतु मी जर वाचकांना सांगितलं, की हा शोध हजार वर्षांपूर्वीच भारतीयांना लागला होता, तर किती लोकांचा यावर विश्वास बसेल? त्याविषयी आणखी एक पुस्तक ‘बालक-हित:बुद्धिबलक्रीडनम्’ कोल्हापूरच्या श्री. कुळकर्णी यांनी १९३७ साली प्रकाशित केले.

कोण्या एका लक्ष्मण पंडित नावाच्या महापंडितानं अनेक ग्रंथ १० ते १२ व्या शतकांमध्ये लिहून काढले असावेत, असं श्री. कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत लिहून ठेवलं आहे. कारण त्रिवेंगडाचार्य यांच्या पुस्तकात आढळणारे अरबी किंवा फारसी शब्द लक्ष्मण पंडितांच्या संस्कृत श्लोकात आढळत नाहीत. ‘बालक-हित:बुद्धिबलक्रीडनम्’या नावातच सगळं काही आलं. या ७ श्लोकांच्या पुस्तकात (आणि त्या समजावून सांगणाऱ्या ‘भामिनी’ नावाच्या टीकेत) बुद्धिबळ खेळाचे नियम समजावून सांगण्यात आलेले आहेत – तेही हजार वर्षांपूर्वी! फक्त गंमत म्हणजे, यामध्ये तांबडा (ज्याला आपण पांढऱ्या सोंगटय़ा म्हणतो) आणि पिवळा (हल्लीचा काळा) असा उल्लेख आहे. या ७ श्लोकांत अनेक अन्य बुद्धिबळविषयक पुस्तकांचा आणि लेखकांचा उल्लेख आहे; परंतु त्यांचा अजून तरी शोध लागलेला नाही. 

भारतीय बुद्धिबळपटू एकाहून एक यशोशिखरे पादाक्रांत करत आहेत. आज जगात प्रखर बुद्धिमत्तेच्या भारतीय बुद्धिबळपटूंना खूप मान मिळतो आहे. काळाच्या पडद्याआड गेलेलं ‘विलासमणिमंजरी’ आणि ‘बालक-हित:बुद्धिबलक्रीडनम्’ यांसारखे अनेक ग्रंथ आपल्या पूर्वजांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता दाखवून देतात. मला प्रश्न पडतो की, या प्रचंड बुद्धिमत्तेमागे बुद्धिबळाचा अभ्यास तर नसेल?

gokhale.chess@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ancient chess history of indian chess jewels of chess book by aniruddha deshpande zws
First published on: 21-05-2023 at 01:04 IST