रघुनंदन गोखले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनच्या ३० वर्षे वयाच्या सुपर ग्रँडमास्टर डिंग लिरेननं आतापर्यंतच्या जगज्जेतेपदाच्या लढतीतील सर्वात उत्कंठावर्धक सामना जिंकून आपल्या देशाला बुद्धिबळाचा पहिला विश्वविजेता मिळवून दिला. मी तर असं म्हणेन की, अनेक चुकांनी भरलेल्या डावांमुळे कधी नव्हे तो बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीला मानवी चेहरा मिळाला. डिंग आणि इयान नेपोमानेची या दोघाही लढवय्यांच्या देहबोलीतून आणि चेहऱ्यावरील हावभावावरून दोन मानव खेळत आहेत याची जाणीव होत होती.  डिंग नंतर समारंभात जाहीरपणे म्हणाला,  ‘नेपो, तू ग्रेट लढवय्या आहेस आणि शेवटपर्यंत लढलास.’ साध्या सरळ डिंगकडून नेपोचा हा गौरव ऐकल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. छिद्रान्वेषी तज्ज्ञ भले काहीही म्हणोत, सामान्य बुद्धिबळप्रेमींना या सामन्यानं भरभरून आनंद दिला.  आमच्यासारख्या बुद्धिबळाच्या विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळालं.

जगज्जेतेपदाच्या लढतीतील अंतिम निकालाच्या सामन्याची तुलना मी हिंदी देमार चित्रपटाशी करेन. इथे अर्थात कोणी नायक अथवा खलनायक नाही; परंतु जसे खलनायक नायकाची संपूर्ण चित्रपटभर धुलाई करत असतो, तशीच इयान नेपोमानेची हा रशियन सुपर ग्रँडमास्टर बिचाऱ्या चिनी डिंग लिरेनवर कायम वर्चस्व गाजवत होता; पण हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे बाजी उलटवून अखेर डिंग विजयी झाला. नेपो (या नावानेच नेपोमेनाची जास्त प्रसिद्ध आहे) पेक्षा डिंग मानसिकदृष्टय़ा जास्त कणखर आहे. या एकाच गोष्टीमुळे जगज्जेतेपदाचं पारडं डिंगच्या बाजूनं झुकलं.

जगातला सर्वोत्तम खेळाडू आणि जगज्जेता मॅग्नस कार्लसन यानं निव्वळ कंटाळा आल्यामुळे आपलं गेली १० वर्षे जपलेलं जागतिक अजिंक्यपद सोडून दिलं. परिणामी रशियाचा इयान नेपोमेनाची आणि चीनचा डिंग लिरेन या तुलनेनं अज्ञात खेळाडूंच्या लढतीमध्ये कुणालाही स्वारस्य नसेल, असा सगळय़ांचा कयास होता. बुद्धिबळाची महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असलेल्या भारतातही वृत्तपत्रांनी (काही सन्माननीय अपवाद वगळता) या सामन्यांकडे दुर्लक्षच केलं असं म्हटलं तरी चालेल; परंतु कझाकस्तानची राजधानी असलेल्या अस्थानामध्ये झालं भलतंच! जगज्जेतेपदाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात रंजक सुरुवात नेपो आणि डिंग यांनी केली आणि आळसावलेलं बुद्धिबळ जगत खडबडून जागं झालं.

१९७५ च्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत जिमी कॉनर्स संपूर्ण स्पर्धेत फक्त तीन सेट हरला होता; पण त्याच्या दुर्दैवानं ते सर्व अंतिम फेरीत होतं. तसंच काहीसं नेपोविषयी म्हणता येईल. संपूर्ण स्पर्धेत डिंगला आपल्या दबावाखाली ठेवणाऱ्या नेपोला फक्त एकदाच पांढऱ्या मोहऱ्यांकडून खेळताना बिकट परिस्थिती आली; पण दुर्दैवानं ती टायब्रेकरच्या अंतिम डावात होती आणि तिथेच डिंगनं बाजी मारली.

इयान नेपोमेनाची आणि डिंग लिरेन यांच्याविषयी सर्वानाच कुतूहल असेल; पण दोघंही आपलं खासगी आयुष्य जपणारे आहेत. नेपो हा रशियन सामाजिक कार्यासाठी खास अभ्यासक्रम आखणाऱ्या विश्वविद्यालयाचा पदवीधर आहे; पण हा प्राणी आणि सामाजिक कार्य यांचा काहीही संबंध नाही. नेपोचं पहिलं प्रेम बुद्धिबळ नाही. त्याला पूर्वी फुटबॉल जास्त प्रिय होता, पण आता त्याला वेड आहे ते ‘डिफेन्स ऑफ द अँसिएंट’ ( ऊडळअ) या व्हिडीओ खेळाचं! या खेळामध्ये ‘आसुस कप’ या अत्युच्च स्पर्धेत अंतिम विजयी होणाऱ्या संघामध्ये २०११ साली इयानचा समावेश होता. आता तर त्यानं या व्हिडीओ खेळाच्या स्पर्धेत ऑनलाइन समालोचन सुरू केलं आहे. फ्रॉस्टनोवा नावाच्या एका खेळामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी इयान आणि त्याचा मित्र ग्रँडमास्टर पीटर स्विडलर याला खेळाच्या निर्मात्यांनी विनंती केली आहे.

चिनी ग्रँडमास्टर डिंग लिरेन कायद्याचा पदवीधर आहे. मी त्याला प्रत्यक्ष पाहिला होता अथेन्स (ग्रीस) मध्ये २०१२ साली झालेल्या जागतिक ज्युनियर स्पर्धेत! तिथंही तो टॉप सीड होता आणि सहजी पहिला येईल अशी सगळय़ांची अटकळ होती; पण डिंगकडून अपेक्षा ठेवल्या तर त्याचा खेळ त्या दर्जाचा होत नाही. त्याला तिथं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं; पण हाच डिंग थोडा मागे पडला की खंबीर बचावानं आपल्या प्रतिस्पर्ध्याची दमछाक करतो. डिंगचा बचाव इतका उत्कृष्ट आहे की, मागे त्यानं तब्बल १०० डाव अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवला होता.

अस्थाना या कझाकस्तानच्या राजधानीत झालेल्या या जगज्जेतेपदाच्या सामन्यात नेपो कधीही पिछाडीवर नव्हता. याउलट डिंग मेहनत करून (आणि काही वेळा नशिबाच्या साथीने) त्याला गाठत असे. खरं तर दोघाही खेळाडूंना आपल्या सरकारचं भय पाठीशी लागलं असावं. युक्रेन युद्धाविरुद्ध आपल्या रशियन सरकारवर टीका करणाऱ्या नेपोमानेचीला परत गेल्यावर काय होईल याची चिंता भेडसावत असली तर नवल नाही. तर पराभूत होऊन परत आलेल्या खेळाडूंना कशी वागणूक मिळते ते भारताशी ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये पराभूत होणाऱ्या चिनी खेळाडूंना चांगलं माहिती आहे. २०२० च्या ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये विदित गुजराथीच्या भारतीय संघाकडून मात मिळालेल्या चिनी संघाला त्यानंतर गेली दोन वर्षे भारत असेल त्या सांघिक स्पर्धेत भाग घेता आलेला नाही.

जगज्जेतेपदाची स्पर्धा सुरू झाली आणि डिंगचं काही तरी बिनसलं असल्याची सर्वाना जाणीव झाली. अतिशय वाईट खेळून दुसराच डाव त्यानं गमावला- तोही पांढऱ्या मोहऱ्यांकडून! टेनिसमध्ये सव्‍‌र्हिस करणाऱ्या खेळाडूला जो वरचष्मा असतो तेवढा नाही तरी पांढऱ्या मोहऱ्यांकडून खेळणाऱ्याला फायदा असतोच. उगाच नाही माजी आव्हानवीर बोगोलजुबोव म्हणायचा – ‘‘मी ज्या वेळेला पांढऱ्या मोहऱ्यांकडून जिंकतो त्याचं कारण मला पांढऱ्या मोहऱ्यांचा फायदा असतो! आणि मी काळय़ा मोहऱ्यांकडून का जिंकतो? तर मी बोगोलजुबोव आहे म्हणून!’’

सुपर ग्रॅण्डमास्टर्सच्या दर्जाला पांढऱ्या मोहऱ्यांकडून पराभूत होणे याला अक्षम्य मानतात. याच स्पर्धेत बघा – नेपोमानेची एकही डाव पांढरी मोहरी असताना हरला नाही (अपवाद फक्त अखेरचा सामना आणि त्याला पण त्याला आलेला थकवा जबाबदार आहे). नेपोची तयारी अफलातून होती. प्रत्येक डावात त्याचे वर्चस्व होते. यासाठी त्याचा प्रमुख सहकारी निकिता विशुगोव याला १०० टक्के गुण द्यायला हवेत.

याविरुद्ध डिंगचा जवळचा मित्र आणि प्रमुख साहाय्यक हंगेरीचा सुपर ग्रँडमास्टर रिचर्ड रॅपोर्ट याची आणि डिंगची खेळण्याची शैली पूर्णपणे भिन्न. डिंग हा सर्वागसुंदर खेळासाठी प्रसिद्ध आहे. जर परिस्थिती पोषक असेल तर डिंग विद्युतगतीने हल्ले चढवू शकतो. वाचकांना त्याचा सर्वोत्तम डाव बघायचा असेल तर त्यांनी त्याचा जिनशी बाई (हा पुरुष ग्रँडमास्टर आहे) विरुद्धचा डाव बघा. आक्रमक खेळ म्हणजे काय ते आपल्याला बघायला मिळेल. याउलट रिचर्ड रॅपोर्ट हा धोके पत्करून हल्ले करण्यात प्रसिद्ध आहे. वाटेल तितके धोके पत्करण्याची त्याची तयारी असते. डिंगने रिचर्डच्या शैलीने खेळ करायचा प्रयत्न केला. इथे मला एक गुजराती म्हण आठवते – ‘जेनुं काम तेनुं ठाय, बिजा करे सो गोता खाय’. असो. दर वेळी गोत्यात येणारा डिंग आपल्या अफलातून बचावाच्या जोरावर तगून जायचा. १४ मुख्य डावांच्या अखेरीस दोघेही ७-७ गुणांसह बरोबरीत होते आणि नियमाप्रमाणे जलदगतीने टायब्रेकर सुरू झाले ते प्रत्येकाला २५ मिनिटे देऊन. पहिले तीन डाव इतके चुरशीचे झाले की जगभरातील लाखो प्रेक्षक आपल्या संगणकाला चिकटून होते. एका प्रेक्षकाने यूटय़ूबवर लिहिले की, तीन वेळा माझे टोस्ट जळून गेले. तिन्ही डाव बरोबरीत सुटल्यावर चौथ्या डावात नेपोने काही चुका केल्या आणि तिथे डिंगला सामन्यात पहिल्यांदाच वरचष्मा मिळाला. वेळेच्या अभावी जलद खेळताना नेपोला या बदललेल्या परिस्थितीशी जमवून घेता आलं नाही. त्यानं ६८ व्या खेळीनंतर पराभव मान्य केला आणि डिंगशी हस्तांदोलन करून ताबडतोब तिथून काढता पाय घेतला.

बुद्धिबळाच्या इतिहासात जगज्जेत्यानं आपलं अजिंक्यपद सोडून देण्याची ही तिसरी घटना! महाविक्षिप्त बॉबी फिशरनं आपल्या ८० पानी मागण्या मान्य झाल्यावरसुद्धा केवळ पहिले १० डाव जिंकणारा विश्वविजेता ठरावा, ही मागणी मान्य झाली नाही म्हणून जगज्जेतेपदावर पाणी सोडले. वाचकांना उत्सुकता असेल की कोणत्या होत्या या ८० पानी मागण्या? पंचतारांकित हॉटेलचा संपूर्ण मजला, तिथला पोहण्याचा तलाव फक्त बॉबीसाठी, फिरायला सोन्याचा मुलामा दिलेली रोल्स रॉइस गाडी इत्यादी इत्यादी.. आणि या सगळय़ाला प्रायोजक तयार होते!

दुसरा होता गॅरी कास्पारोव्ह! १९९३ साली जागतिक बुद्धिबळ संघटनेशी मतभेद झाल्यामुळे त्यानं आपली वेगळी चूल मांडली होती. दुबईमध्ये २०२१ साली नेपोला हरवणाऱ्या जगज्जेता मॅग्नस कार्लसननं ‘सारखं सारखं काय नेपोशी खेळायचं?’ असं कारण देऊन डिंगला संधी दिली आणि डिंगने त्याचं सोनं केलं.

या स्पर्धेत दोघाही खेळाडूंच्या मनोबलाची कसोटी लागली होती. इयान नेपोमानेची गेल्या लढतीत मॅग्नसविरुद्ध जोरदार सुरुवात करूनही अखेर ढेपाळला होता. या वेळी त्यानं स्वत:ला खास प्रशिक्षणाद्वारे कणखर बनवलं होतं; परंतु योग्य वेळी अचूक घाव घालता न आल्यामुळे त्याच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा आली. याउलट डिंग अनेक वेळा कडेलोटापर्यंत जाऊन परत आला होता. २०२० साली तर जगज्जेतेपदाच्या शर्यतीत डिंग लिरेन हे नावही नव्हतं; पण सर्जी कार्याकिनवर शिस्तभंगाची कारवाई झाली आणि त्या जागी डिंगची वर्णी लागली. नेपो आव्हानवीरांची स्पर्धा जिंकला आणि बिचारा डिंग दुसरा आला; पण मॅग्नसनं आपलं नाव मागे घेतलं आणि इतिहास घडला. नशीब ज्याला इतकी साथ देत असेल तो नक्की जगज्जेता होईल, असं मी ‘शतरंज सम्राट’ मासिकाला मुलाखत देताना सांगितलं होतं. या लढतीसाठी एकूण २० लाख अमेरिकन डॉलरचं बक्षीस होतं. डिंगला ५५ टक्के मिळतील आणि नेपोला ४५ टक्के; पण पैसा हा अखेर दुय्यम असतो. खऱ्या खेळाडूला अजिंक्यपद, इतिहासात कोरलं जाणारं नाव याचं महत्त्व असतं! माझ्या मते, या अजिंक्यपदावर दोघांचाही समान हक्क आहे- भले डिंगला बुद्धिबळाची ग्रीक देवता कैसानं इतिहासातील १७ वा जगज्जेता बनण्यासाठी आपला कौल का दिला असेना!

gokhale.chess@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about chinese grandmaster ding liren zws