कस्तुरीगंध : ‘दंडधारी’ : बाळासाहेबांची षोडशोपचार पूजा

दामोदर विश्वनाथ नेवाळकर हे आपण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात- ज्यांना आपण ‘हार्डकोर फॉलोअर’ म्हणतो तसे होते.

कस्तुरीगंध : ‘दंडधारी’ : बाळासाहेबांची षोडशोपचार पूजा
टिळकवादी नाटक म्हणजे १९०७ सालात रंगभूमीवर आलेलं ‘संगीत दंडधारी’!  

प्रा. विजय तापस

लोकमान्य टिळकांच्या काळातल्या अनेक नाटकांचा आत्मा हा लोकमान्य टिळकांनी आणि त्यांच्या विचारांनी मंतरलेला होता. स्वाभाविकपणेच त्यांच्या ‘सॉफ्ट पॉलिटिक्स’च्या यशाचा हा भाग होता. टिळकपक्षाने आपल्या पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी एखादा ‘थिंक टँक’ किंवा ‘ओपिनियन मेकर्स सेल’ निर्माण केला असावा आणि काही नाटककारांना ‘सन्माननीय सदस्य’ म्हणून त्यात आमंत्रित केलं असावं असं वाटण्यासारखी त्याकाळी परिस्थिती होती. टिळकांच्या बाजूने अशी काही नाटकं नाटककार धडाधड लिहीत होते की अचंबाच वाटावा. ‘टिळकांच्या विचार-प्रसारासाठी नाटक लिहून देशकार्यात सामील व्हा!’ असा विनंतीवजा आदेशच जणू या नाटककारांना कोणी दिला असावा. यातला चेष्टेचा भाग सोडला तरी त्या काळात असं घडत होतं यात संशय नाही. त्याकाळी समाजावर टिळकांचा आणि त्यांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राचा सर्वागीण प्रभाव होता, हे नि:संशय! या प्रभावातून जे कट्टर टिळकवादी नाटककार निर्माण झाले त्यातलं एक नाव म्हणजे दामोदर विश्वनाथ नेवाळकर! त्यांचं एक आदिअंती टिळकवादी नाटक म्हणजे १९०७ सालात रंगभूमीवर आलेलं ‘संगीत दंडधारी’!  

१९०७ सालीच खाडिलकरांचं अत्यंत बहुचर्चित असं ‘कीचकवध’ हे नाटकही जन्माला आलं हा निव्वळ योगायोग मानावा की नाही, हाही एक प्रश्नच आहे. अर्थात ‘दंडधारी’ हे ‘कीचकवध’सारखं स्फोटक राजकीय संदेश देणारं नाटक नाही. मात्र ते तत्कालीन सुधारक वा मवाळ पक्षावर निर्मम कोरडे ओढणारं नाटक आहे यात शंकाच नाही. नेवाळकरांचं हे नाटक त्याहूनही अधिक सुधारक पक्षातल्या लोकांवर बदफैलीपणाचा, सैल चारित्र्याचा आरोप करून त्यांची जनमानसातली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणारं आहे. टिळक आणि टिळकपक्षाच्या कर्मठ, सनातनी विचारांची थोरवी ठसवण्यासाठी नेवाळकरांनी सुधारकांची अक्षरश: या नाटकात कत्तल केली आहे. अर्थात समाजातल्या कोणत्याही सोम्यागोम्याने उठावं आणि त्याकाळच्या सुधारक वा मवाळ पक्षातल्या लोकांवर चिखल उडवावा इतके त्या पक्षातले लोक खचितच चिल्लर नव्हते. लोकहितवादी, फुले, आगरकर, रानडे, शाहू महाराज, लहुजी साळवे, वि. रा. शिंदे, पंडिता रमाबाई, प्रबोधनकार ठाकरे अशी ही सुधारकांची फळी! एखाद् वेळेस खुद्द बळवंतरावांनी त्यांना टीकेच्या तोंडी देणं समजण्यासारखं आहे. मात्र, एका टिळकप्रेमी नाटककाराने ते करू धजावं, हा अतिरेकच नाही का? (अर्थात भक्तांची अशी मांदियाळी आजही दिसतेच की!)

हेही वाचा >>> कस्तुरीगंध : कालचा आणि आजचाही ‘महारवाडा’

दामोदर विश्वनाथ नेवाळकर हे आपण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात- ज्यांना आपण ‘हार्डकोर फॉलोअर’ म्हणतो तसे होते. लोकमान्यांवर त्यांची अक्षरश: भक्ती होती. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते टिळकांच्या खास ‘आतल्या वर्तुळातले’ होते. (याचा एक पुरावा म्हणजे ‘गीतारहस्य’ प्रकाशित होण्यापूर्वी ज्या खास मंडळींना बळवंतरावांनी वाचायला दिले होते, त्यात दामोदररावांचा समावेश होता असे म्हणतात.) नेवाळकरांनी जितकी नाटकं लिहिली ती कोणत्या ना कोणत्या अर्थाने टिळकांशी किंवा टिळक-विचारांशी नातं राखणारी आहेत. त्यांच्या एकूण नाटकांत अशीही काही नाटकं दाखवता येतील, की ज्यांचा संबंध टिळकांना ज्या विषयांत रस होता त्या विषयांबद्दलची आहे. त्यांची गाजलेली आणि चर्चेच्या आखाडय़ात असलेली ‘मनोविजय’, ‘धर्मरहस्य’आणि ‘संगीत दंडधारी’ ही तिन्ही नाटकं म्हणजे नेवाळकरांची ‘सिग्नेचर नाटकं’ म्हणता येतील. त्यातही त्यांचं ‘दंडधारी’ हे नाटक म्हणजे त्यांनी टिळकांची (आतल्या गोटातले लोक त्यांना ‘बाळासाहेब’ म्हणत.) षोडशोपचारे केलेली पूजाच आहे.   

या नाटकाचे रग्गड पाच अंक आहेत. बावीस प्रवेशांमध्ये हे पाच अंक साकारतात. अंकानुसारी पाहिलं तर प्रवेश-विभाजन २-५-४-७-४ असं आहे. खेरीज या नाटकात अठ्ठयाऐंशी पदं- अर्थात गाणी आहेत. त्या गाण्यांचं विभाजनही १८-१७-१७-२३-१३ असं आहे. एखाद्याने या पदांचा काव्यगुणांच्या अंगाने विचार केला तर त्याच्या पदरी मात्र निराशाच पडेल. या पदांचं नाटकातलं कार्य हे बरंचसं निवेदनाचं किंवा घडलेल्या घटनेला दिलेल्या प्रतिक्रियेचं आहे. यातील काही पदांचं स्वरूप तर कोरससारखंच आहे. मात्र, नाटकाचं अंतरंग पाहता असं नक्कीच म्हणता येईल की, या नाटकात तसं पाहता पदांची आवश्यकताच नाही. पण १९०७ चा तो काळ लक्षात घेता आणि संगीताचा रंगभूमीवरचा प्रभाव लक्षात घेता ‘गरज असो वा नसो, नाटकात पदांचा जलसा हवा’ अशा संकेतामुळे या नाटकात पदं आहेत, इतकंच!

आज या नाटकाला ११४ वर्षे झालीत. सुधारक-उद्धारक यांच्यातले तेव्हाचे वाद केव्हाचेच काळाने गिळून टाकले आहेत. स्त्रीशिक्षण, स्त्री-सुधारणा, त्यांचे आर्थिक हक्क, स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य याबद्दल कालौघात प्रचंड बदल घडला आहे. अर्थात बदल घडला आहे म्हणजे समाज उन्नत झाला आहे असं नाही. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पंचाहत्तर वर्षांत आपला समाज काही बाबतींत जितका पुढे गेला आहे, तितकाच तो अनेक बाबतीत अधिक अवनत अवस्थेकडे झुकला आहे असं एखाद्याने म्हटलं तर त्याला सरसकट नकार देता येणार नाही. १९०७ सालच्या समाजातले सुधारणावादी, नेमस्त वा मवाळ म्हणवले जाणारे अगदी कालपरवापावेतो देशातील सत्ताकारण नियंत्रित करत होते. या वर्गात उदारमतवादी, उदारमतवादी डावे यांचा समावेश होता. आपण विकासाचं, प्रगतीचं सत्ताकारण आणि राज्यकारण करतो आहोत असा दावा ते करत होते. या काळात १९०७ सालातले जहाल, सशस्त्र स्वातंत्र्यवादी, परंपरावादी, धर्मवादी सत्ताकारणात मागे रेटले गेले होते. १९२० पर्यंत ते जोशात होतेच; शिवाय देशाचा सुकाणूही त्यांच्या हाती होता. ते सुकाणू नंतर मवाळांच्या हाती गेलं. नेवाळकरांनी ज्या सुधारकांना ‘दंडधारी’मधून हास्यास्पद केलं, ज्यांचं त्यांनी चारित्र्यहनन केलं होतं त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी देशाची सर्वागीण सत्ता आपल्या हाती जणू गोठवली होती. अर्थात इथे हेही सांगायला हवं की, सत्ता जरी सुधारणावादी मंडळींच्या हाती होती तरी ते संपूर्ण देशात कायमच अल्पसंख्य राहिले. तेव्हाचे जहाल राष्ट्रवादी (आताची ‘राष्ट्रवादी’ मंडळी आणि त्यांचा ‘राष्ट्रवाद’ हा एक ‘रि-कन्स्ट्रक्टेड फिनॉमिना’ आहे. त्यांचं पन्नासेक वर्षांपूर्वीच्या राष्ट्रवादाशी नेमकं नातं काय, हा कदाचित क्लेशकारी शोध ठरू शकतो.) परंपरा आणि धर्मवादी, स्त्रियांच्या संदर्भातले प्रतिगामी हेच कायम बहुसंख्याक राहत आले आहेत, जसे ते आजही आहेत. सत्ताकारणातला आणि राज्यकारणातला हा कालचा पराभूत वर्ग आजचं केवळ सत्ताकारणच नाही, तर समाजकारण, संस्कृतीकारण, शिक्षण आणि अर्थकारणही नियंत्रित करतो आहे. या आजच्या स्थितीच्या अनेक गर्भित खुणा ‘बिट्विन द लाइन्स’ स्वरूपात आपल्याला ‘संगीत दंडधारी’मध्ये वाचता, पाहता येतात. नाटकात जहाल आणि नीतिवादी पक्षापुढे सुधारकांचा वर्ग हा सरसकट प्रवाहपतितच वाटावा, त्यांच्या सुधारणांचा विचार निव्वळ स्वार्थसाधकच वाटावा अशाच घटनांची मालिका नाटककार जेव्हा रचत जातो, तेव्हा नेवाळकर नाटककार म्हणून नव्हे, तर टिळकपक्षाने नियुक्त केलेले प्रवक्ते म्हणून लक्षात राहतात.

हेही वाचा >>> कस्तुरीगंध : ‘टाकलेलं पोर’ आक्रमक वकिली युक्तिवाद

या नाटकाचा मूळ विषय आहे तो पुनर्विवाहाचा. तेव्हाच्या सुधारणावादी, मवाळ मंडळींनी आपलं सगळं लक्ष याच विषयावर केंद्रित केलेलं नाटकाच्या सुरुवातीपासूनच लक्षात येतं. उल्लू म्हणवता येतील असेच सगळे सुधारक नाटककार पेश करत जातो. यांचा नेता म्हणजे ‘काकशीर्ष’(म्हणजेच कावळ्यांचा नेता!) या पात्राची भाषा आणि वेशासकटचा सारा ‘ऑरा’ तंतोतंत गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर बेतलेला. त्यांचे सहकारी कोण, तर मिस्टर धरसोडे, उत्पात, विधुर असलेले प्रभाकरपंत, रेवती आणि चंद्रिका. या पात्रांतील काकशीर्ष यांना रेवतीमध्ये आणि प्रभाकरला चंद्रिकेमध्ये रस आहे. काकशीर्ष यांना त्यांची पत्नी आवडत नाही. आणि ज्या सुधारक म्हणवणाऱ्या पदवीधर भोलानाथशी रेवतीने विवाह केलाय त्याला अति पुढारलेली रेवती डोईजड झालीय. (तो तिला ‘पुरेसे स्वातंत्र्य’ देत नसल्याने ती त्याला सोडचिठ्ठी देते.) ही सगळीच पात्रे नाटककाराने जमेल तेवढी काळ्या रंगात रंगवली आहेत. बदफैली काकशीर्ष यांच्यापासून रेवतीला गर्भ राहताच ते तिला वाऱ्यावर सोडून देतात. नाटकाच्या अखेरीस रेवतीने आपल्या सर्व ‘पापां’ची कबुली लोकमान्य टिळकांपाशी- म्हणजे नाटकातल्या राष्ट्रवादी ‘दंडधारीं’पाशी देऊन क्षमायाचना केली आहे. दंडधारी यांना साथ देतात ते भारद्वाज आणि चक्रदंड. या दोघांसाठी दंडधारी यांचा प्रत्येक शब्द म्हणजे ‘फायनल ऑर्डर’! नाटकात एकदाही ते दंडधारी यांच्या शब्दाबाहेर जात नाहीत ही बाब लक्षात घेतली की त्या काळातला टिळकांचा करिष्मा लक्षात येतो. नाटकातली प्रभाकरपंतांची विधवा मुलगी ‘सरस्वती’ म्हणजे टिळकपक्षाची आर्य स्त्री. ती टिळकपक्षाची स्त्रीसंबंधीची भूमिका प्रसारीत करण्याचं काम करते. नाटकाच्या अखेरीस काकशीर्ष दंडधारींच्या पाया पडतात  आणि क्षमायाचना करतात असं नेवाळकर दाखवतात. मात्र, इथे दंडधारींची भूमिका ही मवाळ पक्ष आणि जहाल पक्ष यांनी एकत्र येऊन (आपापसातले सुधारणाविषयक मतभेद बाजूला ठेवून) ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष करण्याची आहे. गोखलेंचा पक्ष ती भूमिका स्वीकारताना नाटकात दिसतो. नाटकाची संहिता आणि प्रयोगाची म्हणून आपण जेवढी अंगं मानतो, त्या सर्वाच्या आधारे मित्रांच्या खासगी वर्तुळात ‘बाळासाहेब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्यांची षोडशोपचार पूजा म्हणजे हे नाटक आहे.

नाटक आहे १९०८ मधलं. समाजातला तेव्हाचा सुधारणावादी स्त्री-पुरुषांचा पदवीधर वर्ग आणि त्याच्यावरचा पाश्चात्य प्रभाव नाटकातून पुरेसा व्यक्त झाला आहे. हा प्रभाव त्यांच्या संवादभाषेतून आणि वेषशैलीतून नाटककाराने काहीसा कुचेष्टेच्या स्वरूपात दाखवला आहे. पायातले बूट, सॉक्स, चिटाची पोलकी, अलमारीत असलेली स्त्रियांची सेंट्स, परदेशी घडणावळीच्या बिलोरी बांगडय़ा, स्त्रियांची जाकिटे, पुरुषांचे इंग्लिश सूट्स, चिरूट, अनेक ब्रँडचे इंग्लिश मद्य, स्त्रियांची स्टॉकिंग्ज, स्त्रियांनी कपाळावर लावायच्या टिकल्या (मेणावर लावायच्या कुंकवाचा पर्याय पारंपरिक आर्य स्त्रियांसाठीच राखीव!), पुरुषांचा पार्शी फॅशनचा आणि स्त्रियांचा रात्रीचा बेड-गाऊन हे तपशील खूपच बोलके आहेत. या नाटकाची दोन-तीन वैशिष्टय़ं म्हणजे हे नाटक ‘बेळगाव स्त्री संगीत नाटक मंडळी’ या स्त्रियांच्या संस्थेने सादर केलं. त्यात सर्व भूमिका स्त्रियांनीच केल्या होत्या. या प्रयोगाला खुद्द टिळक हजर होते आणि त्यांना तो प्रयोग आवडला होता. टिळकांची भूमिका करणाऱ्या रंगम्माची टिळकांनी फार स्तुती केली. अखेरची खास बाब म्हणजे ‘हे नाटक हेतुपुरस्सर माझी बदनामी करीत आहे, त्यामुळे या नाटकावर सरकारने बंदी घालावी,’ अशी मागणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. त्यानुसार सरकारने नाटकावर बंदी घातली. हे एक नाटक जरी बंद पडलं असले तरी टिळकवादी नाटकांची सद्दी संपली नाही ती नाहीच! vijaytapas@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा धगधगता इतिहास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी