मी कायमच तुम्हाला सांगत आलो आहे की मला विचार करायला भरपूर वेळ मिळतो, त्यामुळे फावल्या वेळात मी सतत चिंतन करत असतो. फावला वेळ भरपूर असणे हे चिंतनासाठी फार गरजेचे आहे. आपले सगळे महत्त्वाचे ग्रंथ हे ऋषीमुनींनी निबिड अरण्यात बसून लिहिले; याचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्याकडे चिंतन करायला फावला वेळ भरपूर होता हेही आहे. आणि जंगलात रेंज मिळत नाही हेही आहे. त्या वेळी काही सिद्धयोगी लोकांनी अशी सिद्धी प्राप्त केली होती की, त्यांना जेव्हा ज्याच्याशी बोलायची इच्छा होईल तो तिथल्या तिथे प्रगट व्हायचा किंवा त्याच्याशी बोलता यायचे. नंतर नंतर काही रिकामटेकडे ऋषी साधना करायचे सोडून सारखे सारखे याला त्याला लीलया प्रगट करून रिकामटेकडय़ा गप्पा मारत बसायला लागले आणि मोठाच उच्छाद होऊन बसला म्हणे! म्हणून मग सिद्धी प्राप्त जरी झाली तरी एखाद्याला दगड बनवणे, मुंगूस बनवणे, अर्धा घोडा आणि अर्धा माणूस बनवणे असली करमणूक करून घ्यायला परवानगी होती, पण एखाद्या दूरच्या जंगलातल्या माणसाला प्रगट करून कुचाळक्या करणे बॅन होते. सध्याच्या काळात सगळीकडे रेंज असते हा चिंतन प्रक्रियेतला मोठाच अडथळा आहे. मी एका मोठय़ा विचारवंताला हल्ली नवीन काय असे विचारले, तर तो म्हणाला, ‘मला सारखे कोणत्या ना कोणत्या स्टुडिओमध्ये चच्रेला जावे लागते. त्यामुळे विचार करायला सवड कोणाकडे आहे?’ आता विचारवंतांना जर विचार करायलाही सवड नसेल तर भारतीय विचारविश्वापुढे मोठेच संकट उभे राहिले आहे, असे म्हणावे लागेल. मी त्या सद्गृहस्थांना  म्हणालो, ‘अहो, तुम्ही शेवटचा विचार केला होतात त्यालाही आता दहा-बारा वर्षे झाली. तर यापुढे मी तुमचा उल्लेख ‘माजी विचारवंत’ असा करू का?’ तर त्यांना भयंकर राग आला.

विचारवंतांची या भारतात प्रचंड वानवा आहे या कल्पनेने मला प्रचंड उदासी दाटून आली आहे. लोक आता मंगळावर जायची स्वप्ने बघतात, जगभरातल्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये आपल्या कंपन्या नोंदवतात. आपल्याकडच्या सुंदऱ्यांच्या गळ्याखाली उतरणाऱ्या पानाचा रंग आजवर फक्त आपणच बघत होतो आणि खूश होत होतो; आता या सुंदऱ्या विश्वसुंदऱ्या बनतात आणि मांजरी बनून चालून दाखवतात. माणसांना खच्चून भरून लोकल जशी विरारहून चर्चगेटला जाते, तसे खच्चून उपग्रह भरून आपल्या यानाने आपण अंतराळात बिनचूक नेऊन सोडले. मात्र आपले विचारवंत या सगळ्या गदारोळात मागेच राहिले याची मला मोठीच खंत लागून राहिली आहे.

विचारवंतांची आज नक्की अडचण काय असावी हे जेव्हा मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला काही धक्कादायक माहिती मिळाली. गुगलने विचारवंतांची फारच कोंडी करून ठेवली आहे. पूर्वी कसे सारे सोपे होते. सगळी माहिती वेगवेगळ्या ग्रंथांत लोक दडवून ठेवायचे. मग आपल्याच जातीतल्या काही निवडक लोकांना ते ती ग्रंथातली दडवून ठेवलेले माहिती द्यायचे. मग ते जवळजवळ मरेपर्यंत ती माहिती दुसऱ्याला द्यायचेच नाहीत. त्यामुळे फार थोडय़ा जणांकडे माहिती असायची आणि ती फार हळूहळू लोकांपर्यंत पोहोचायची. माणसाचा जीव कोणत्या औषधाने वाचवावा किंवा बाळाचे नाक चोंदले तर कोणता पाला नाकाला लावावा असली महत्त्वाची माहिती असली तरी हे लोक ती कोणाला द्यायचे नाहीत. चांगली स्मरणशक्ती असलेले किंवा चांगले पाठांतर असलेले लोक बऱ्याच काळपर्यंत विचारवंत किंवा ज्ञानी मानले गेले. आजही काही लोक मोठय़ा कौतुकाने सांगतात की, त्यांच्या पूर्वजांना धार्मिक ग्रंथ नुसतेच पाठ नव्हते तर ते उलटे, सुलटे, मधूनच कुठून तरी सुरू करून असे कसेही ते पाठ म्हणून दाखवत असत. एकपाठी, द्विपाठी, त्रिपाठी अशा ग्रेड होत्या त्यांच्यात. आता या सगळ्या पाठांतराच्या स्टंटचा उपयोग काय आणि या पाठांतराचा प्रज्ञेशी किंवा ज्ञानाशी संबंध काय, या प्रश्नांची उत्तरे तेव्हाही मिळाली नाहीत, आजही मिळत नाहीत. स्मरणशक्ती आणि पाठांतर चांगले असणाऱ्यांनी खूप काळ आपल्या विचारविश्वावर राज्य केले.

मागची किती तरी वष्रे तर एखाद्याला काही सामाजिक किंवा राजकीय प्रश्न पडले, तर त्याला आंतराराष्ट्रीय उदाहरणे देऊन किंवा जाडजूड पुस्तकातले उतारे सांगून गांगरवून टाकायची प्रथा होती. भिलवडी वांगी भागातल्या सोसायटी निवडणुकीतल्या मारामारीबद्दल प्रश्न विचारला की, सोव्हिएत क्रांतीतल्या हिंसाचाराच्या अपरिहार्यतेबद्दल माहिती देऊन घाबरवण्याची फॅशन होती. नवरा नांदवत नाही काय करू विचारले की, एका टोकाचे विचारवंत याचा संबंध अद्वैतवादाशी जोडायचे, तर दुसऱ्या टोकाचे विचारवंत पाश्चात्त्य मुक्त विचारपद्धतीत नवऱ्याचीच गरज कशी नाही आणि ज्या अर्थी नवरा नांदवत नाही त्या अर्थी ती इष्टापत्तीच कशी आहे ते सांगून टाकायचे. एकूणच काही दुर्मीळ ग्रंथ वाचले, थोडी माहिती लक्षात ठेवली, पाश्चात्त्य नावे लक्षात ठेवली आणि बोलण्यात थोडी दुबरेधता आणली की अगदी ढेकळातूनही विचारवंत जन्माला यायचा. आता गुगलने हे सारेच कठीण करून टाकले आहे. कचऱ्यासारखी माहिती आता सर्वव्यापी झाली आहे. कोणी भरपूर माहिती सांगायला लागला तर आता कोणालाच भुरळ पडत नाही. वाटेल तितक्या माहितीला आता सगळ्यांनाच ‘अ‍ॅक्सेस’ आहे. त्यामुळे आता या माहितीच्या कचऱ्यातून अर्थाची कला ज्याला काढता येईल तो खरा विचारवंत.

टीव्हीवर दिसणारे धर्मगुरू आणि काही निवृत्त झालेले प्राध्यापक, न्यायाधीश किंवा सनदी अधिकारी सोडले तर आज कोणीच विचारवंत या ‘करिअर’ला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. हे लोक या करिअरला माझ्यासारखेच गांभीर्याने घेतात, कारण त्यांच्याकडे चिंतनाला भरपूर रिकामा वेळ असतो. त्यामुळे विचारवंत बनण्याची चन त्यांना परवडू शकते. पण किती काळ आपण या लोकांवर अवलंबून राहणार आहोत? आपल्याला समाजाच्या विविध स्तरातल्या लोकांना एकत्र करावे लागेल आणि त्यांना विचारवंत बनण्याची प्रेरणा द्यावी लागेल.

मोठय़ा शिक्षेवर तुरुंगात असलेले कैदी भारतीय विचारवंत परंपरेत मोठीच भर घालू शकतील. त्यांच्याकडे रिकामा वेळ भरपूर असतो. त्यांना सतरंज्या विणायला लावणे किंवा बागकामाला जुंपण्यापेक्षा विचार करायला बसवले पाहिजे. तसेही त्यांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर स्टेट्स अपडेट करायची दगदग नसते, चॅनेलवाले अजून तरी त्यांना तुरुंगातून लाइव्ह चच्रेला बसवत नाहीत, त्यामुळे त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहील. हे लोक गुगल वापरू शकत नाहीत, त्यामुळे संपूर्ण नवे काही तरी कैद्यांना सुचण्याची शक्यता खूपच आहे. त्याचप्रमाणे बहुतांश ड्रायव्हर लोक हे आपापल्या मालकांना कामाला सोडल्यावर मोकळेच असतात आणि ड्रायव्हर असल्याने त्यांनी जगही बरेच पाहिलेले असते. त्यांनाही फावल्या वेळात या कामाला जुंपता येईल. राज्यपाल, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, मेकअप आर्टिस्ट, तडीपार, तिकिटे वाटून झालेला कंडक्टर, सिनेमाचे डोअरकीपर या सगळ्यांमधून नवेकोरे विचारवंत जन्माला येऊ शकतात; आपण त्यांच्यावर मेहनत घ्यायला हवी. आजकाल आपल्या वाटय़ाला येणारे विचारवंत हे भरपूर दगदग असणारे कष्टकरी आयुष्य जगतात. पोरीचे लग्न, बँकेचे हफ्ते, अ‍ॅसिडिटी यांनी गांजलेले लोक आज विचारवंत या व्यवसायात आहेत. यांच्याकडून कोणत्याही भरीव कामगिरीची अपेक्षा करता येणार नाही. आता आपल्याला पुन्हा कामाला लागावे लागेल. फर्स्टक्लास जंगलं शोधावी लागतील, थोडय़ा गाई-म्हशी, जमल्यास मोर, हरणं, भरपूर सारे तूप-लोणी, गुरूच्या सेवेला चेले चपाटे, राजाकडून भरपूर सारा तनखा असा बंदोबस्त करायला पाहिजे; आणि या वातावरणात काही निवडक लोकांना विचार करायला नेऊन सोडले पाहिजे. सन्यभरती किंवा पोलीसभरती जशी असते तशी गावोगाव विचारवंत भरतीचे मेळावे भरवले पाहिजेत. रिकामटेकडा भरपूर वेळ असणे या निकषावर त्यांची भरती केली पाहिजे आणि त्यानंतर त्यांना आपण बनवलेल्या घनदाट जंगलात नेऊन सोडले पाहिजे. एकाच पंचवार्षिकात पाचपन्नास वेद आणि शेदोनशे उपनिषद या लोकांनी नाही पाडली तर नाव बदलून टाकीन.

प्रज्ञावान विचारवंत माणसे ही समाजाची सर्वोच्च चन आहे. त्यासाठी समाजाला मोठी किंमत मोजावी लागेल; फुटकळ किंमत मोजून ‘गुगलवरचे शहाणे’ मिळतील, विचारवंत नाही.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com