‘औरंगजेब – शक्यता आणि शोकांतिका’, ‘सम्राट अकबर’, ‘इंद्राचा जन्म’, ‘वेदांचा तो अर्थ’ या पुस्तकानंतर रवि गोडबोले यांचे ‘महाभारत – संघर्ष आणि समन्वय’ हे महाभारताचे बौद्धिक आणि तात्त्विक विश्लेषण करणारे पुस्तक आज (१० मार्च) पुण्यात ‘देशमुख आणि कंपनी’च्या वतीने प्रकाशित होत आहे. महाभारताचा नव्याने अन्वयार्थ लावू पाहणाऱ्या या पुस्तकातील लेखकाच्या मनोगताचा संपादित भाग.
महाभारताची आणि माझी पहिली ओळख इतर असंख्य मुलांप्रमाणे शाळेत जायच्याही आधीच झाली. भीम, बकासुर, कृष्ण, बलराम, पूतना राक्षसीण, दुष्ट कंसमामा ही मंडळी तेव्हापासून माहितीची झाली. पुढे शाळकरी वयात महाभारतातल्या अनेक गोष्टी वाचल्या, ऐकल्या.  कितीतरी मनोरंजक आणि बोधपर गोष्टींचा खजिनाच महाभारताच्या रूपाने हातात आला. याच वयात महाभारतातील कथांवर आधारित असलेले काही चित्रपटही पाहिले.
कॉलेजच्या पहिल्या वर्षांत असतानाच डॉ. इरावती कर्वे यांचे ‘युगान्त’ हे पुस्तक हातात पडले. या पुस्तकाने मला जणू झपाटूनच टाकले. महाभारतातील पात्रांची ही ओळख नवी, वेगळी, मनाला अंतर्मुख करणारी होती. यानंतर दुर्गाबाई भागवतांचे ‘व्यासपर्व’, दाजीशास्त्री पणशीकरांचे ‘महाभारत – एक सुडाचा प्रवास’ ही पुस्तकेही लक्षात राहिली. ‘महाभारत’ या विषयावर हाताला लागेल ते पुस्तक वाचतच होतो. आनंद साधले, गो. नी. दांडेकर, प. वि. वर्तक, रणजित देसाई, काका विधाते.. अनेकांनी महाभारताचा अन्वयार्थ आपापल्या परीने लावण्याचा प्रयत्न केला होता. याच काळात कधीतरी विदर्भ मराठवाडा बुक कंपनीने प्रकाशित केलेले महाभारताच्या नीलकंठी प्रतीच्या मराठी अनुवादाचे सगळे खंडही वाचून काढले. या वाचनाला काही शिस्त नव्हती हे तर खरेच, पण त्याच पात्रांची तीच कथा एका वेगळ्या लेखकाच्या दृष्टिकोनातून समजून घेताना दरवेळी मनाचे समाधान होण्याऐवजी अनुत्तरित प्रश्नांची संख्या वाढत जात होती आणि महाभारताचे आकर्षण कमी होण्याऐवजी ते वाढतच जात होते.
यानंतर महाभारताशी पुन्हा संबंध आला तो बी.आर.चोप्रा निर्मित ‘महाभारत’ दूरदर्शनवर पाहताना. दूरदर्शनवर ‘महाभारत’ सुरू झाले की, मंडईसारखे गजबजलेले बाजारही ओस पडताना दिसत.  महाभारताचे आकर्षण संपूर्ण भारतवर्षांला होते आणि भारताचे औद्योगीकीकरण होऊनही ते कमी झाले नव्हते. लहान मुले, प्रौढ माणसे, सुशिक्षित-अशिक्षित, स्वप्नरंजन करणारे कलावंत, ताíकक विचारवंत, प्रतिभावान नाटककार, पटकथा-लेखक अशा सगळ्यांनाच आकर्षति करणारे कोणते रहस्य महाभारत या ग्रंथात आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते.
महाभारताचे वाचन आणि वाचलेल्या भागावर केलेले चिंतन, ही बुद्धिमत्तेला आव्हान देणारी, चिकाटीचा कस पाहणारी प्रक्रिया आहे. ‘वेदांचा तो अर्थ’ हे पुस्तक लिहिताना मला महाभारतातील काही संदर्भ देणे आवश्यक वाटले होते. हे संदर्भ केवळ नीलकंठी प्रतीमध्ये सापडले तर त्यांचा उपयोग नव्हता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने संपादित केलेल्या महाभारताच्या संशोधित आवृत्तीमधील मूळ संस्कृत श्लोक त्यासाठी तपासून पाहणे आवश्यक होते. ही ‘संशोधित आवृत्ती’ म्हणजे नेमके काय, हे मला डॉ. इरावती कर्वे आणि नरहर कुरुंदकर यांच्या लिखाणावरून माहीत झाले होते. (कै.) रा. ज. देशमुख यांनी विकत घेतलेले संशोधित आवृत्तीचे जवळपास सगळे खंड देशमुख आणि कंपनीच्या संग्रहात, उत्तम स्थितीमध्ये शिल्लक राहिले होते, हे माझे सुदैव! ‘वेदांचा तो अर्थ’च्या निमित्ताने माझी संस्कृत भाषेत लिहिलेल्या महाभारताशी ओळख झाली. वेद आणि ब्राह्मण या ग्रंथांमधील संस्कृत भाषा ‘आर्ष’ होती. या अतिप्राचीन भाषेला व्याकरणाचे काटेकोर नियम नव्हते. या भाषेमधील अनेक शब्दांचे नेमके अर्थ कालाच्या प्रवाहात वाहून गेले होते. ब्राह्मण ग्रंथांमध्ये वापरलेली गद्य संस्कृत लेखनाची पद्धत उत्तरकालामध्ये जवळजवळ लुप्त झाली होती. महाभारतात वापरलेली संस्कृत भाषा त्या मानाने अर्वाचीन होती. ही भाषा, महाभारतातील श्लोकांचे अर्थ समजून घेणे वेदांमधील ऋचा समजून घेण्यापेक्षा खूपच सोपे होते. पण हे वाचन करत असताना मध्येच एखादा श्लोक, क्वचित एखादा अध्याय ‘आर्ष’ संस्कृत भाषेची आठवण करून देत असे. महाभारताच्या कथेचा गाभा हा अतिशय प्राचीन असला पाहिजे याची जाणीव नव्हे, तर खात्री मला महाभारत ग्रंथ संस्कृतमधून वाचल्यामुळे झाली.
महाभारताची कथा कधीतरी प्रत्यक्षात घडली होती. हा भारतीय इतिहासाचा एक भाग आहे, असे भारतीय परंपरा मानीत आली आहे. आधुनिक संशोधक व विद्वान यांच्यानुसार मात्र हा मुद्दा वादग्रस्त आहे. महाभारताचे युद्ध ही खरोखरच एक ऐतिहासिक घटना असल्यास ती नेमक्या कोणत्या कालखंडात घडली? या प्रश्नांची अनेक उत्तरे पौर्वात्य आणि पाश्चात्त्य संशोधकांनी दिलेली आहेत. महाभारत हा ग्रंथ इ.स.पूर्व ५०० च्याही आधी म्हणजे सुमारे अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होता आणि त्यामध्ये सातत्याने भर पडून त्यातील श्लोकसंख्या वाढत गेली हे सर्वच विद्वानांना मान्य आहे.
या पुस्तकाचे लेखन करीत असताना या ग्रंथाची प्राचीनता आणि ग्रंथामध्ये निरनिराळ्या व्यक्तींनी आपापल्या कालखंडांत आपापल्या कुवतीनुसार घातलेली भर हे दोन मुद्दे मला पुस्तकाची मांडणी करण्यासाठी पुरेसे वाटले. इतर मतभेदांच्या मुद्दय़ांना या लेखनात मी जाणीवपूर्वक स्पर्श केलेला नाही. मात्र महाभारताचे कथानक सांगत असताना या कथानकातील मूळ भाग कोणता व मागाहून पडलेली भर कोणती यासंबंधी काही निकष ठरवणे आवश्यक होते.
कृष्णाच्या देवत्वाचे, त्याच्या अलौकिक सामर्थ्यांचे वर्णन, दैवी चमत्कार, राक्षसांची मायावी शक्ती, देवतांनी आणि ऋषी-मुनींनी दिलेले शाप आणि वर, हजारो हत्ती, घोडे, रथ, सर्वसंहारक ब्रह्मास्त्र आणि इतर ‘जादुई’ अस्त्रे अशा प्रकारचा भाग काल्पनिक म्हणून प्रक्षिप्त समजून वेगळा काढणे सोपे होते. ब्राह्मणांचा मोठेपणा, बडेजाव आणि सामथ्र्य सांगणारा भागही माझ्या मते प्रक्षिप्त होता. एकतर महाभारत ही क्षत्रिय घराण्यांची कहाणी आहे. या कहाणीमध्ये क्षत्रियांखालोखाल ‘सूत’ महत्त्वाचे आहेत. या कहाणीत द्रोण-कृप आणि अश्वत्थामा वगळता इतर कोण्या ब्राह्मणाला स्थानच नाही. आणि हे तिघेही आपल्या ब्राह्मण वर्णाची कर्तव्ये सोडून क्षात्रधर्माचे आचरण करताना दिसतात. द्रोण आणि कृप यांच्या जन्मकथाही अशा आहेत की, ते जन्माने खरोखरच ब्राह्मण होते, हे निश्चयाने सांगता येत नाही. व्यास हा धृतराष्ट्र आणि पांडू यांचा जन्मदाता पिता असला तरी महाभारताच्या कथानकात त्याला कोणतेच स्थान नाही. व्यास महर्षी खरोखरच इतका थोर असता तर भीष्माने त्यालाच बोलावून, ‘हास्तिनापूरचे राज्य दुर्योधनाला द्यायचे की युधिष्ठिराला?’ असा प्रश्न विचारून महाभारताचाच निकाल लावला असता!
शक्यता अशी वाटते की, महाभारताची कथा अनेक शतके मौखिक परंपरेने समाजामध्ये प्रसारित होत होती. लेखनकलेचा शोध लागून ती पुरेशी विकसित झाल्यावर ही कथा ग्रंथबद्ध करण्यात आली. महाभारताची पोथी बनवण्याचे काम ब्राह्मणांनी केले. हे काम करीत असताना आपल्या वर्णाचे महत्त्व सांगणारे प्रक्षेप त्यांनी जागोजागी मूळ कथानकात समाविष्ट केले. ब्राह्मणांचे महत्त्व, परशुरामाने कथानकात केलेली ढवळाढवळ, नारद, कण्व, वसिष्ठ, विश्वामित्र यांनी केलेले उपदेश, दिलेले वर आणि शाप हा भाग प्रक्षिप्त मानला पाहिजे असे माझे मत झाले.
माझे इथपर्यंतचे काम त्या मानाने सोपे होते. अडचणीचा भाग असा होता की, महाभारतात जसे कृष्णाच्या देवत्वाचे, त्याने केलेल्या चमत्कारांचे उल्लेख होते, तसेच त्याने केलेल्या कारस्थानांचे, लबाडीचे आणि खोटेपणाचेही होते. यातून सर्वसाधारण निष्कर्ष असा निघत होता की, कौरवांची बाजू मुळात न्यायाची होती. प्रत्यक्ष युद्धामध्ये कौरव योद्धे पांडवांना वरचढ होते. पांडवांनी भीष्म, द्रोण, कर्ण, भूरिश्रवा आणि खुद्द दुर्योधन यांना अधर्माने ठार मारले. पांडवांना असे अधर्माचरण करण्यास कृष्णाने प्रोत्साहन दिले. कुरुकुलाच्या विनाशात कृष्णाचे हितसंबंध गुंतलेले होते. त्यासाठीच त्याने युद्ध होण्याआधी पांडवांची बाजू घेऊन जरासंध व शिशुपाल या आपल्या शत्रूंना कपटाने ठार मारले. हे श्लोक प्रक्षिप्त आहेत की नाहीत हे ठरवण्यासाठी परंपरेचा आधार घेणे चुकीचे- अशास्त्रीय होते. माझे ‘कृष्ण’ या व्यक्तीबद्दलचे वैयक्तिक मत निर्थक होते. अशा वेळी मी प्रक्षिप्त भाग ठरविण्यासाठी महाभारतातील श्लोकांच्याच संगतीचा आधार प्रामुख्याने घेतला आहे.
माझ्या आकलनाप्रमाणे जरासंधाचा वधही कृष्णाने पूर्ण विचारान्ती केलेली पूर्वनियोजित राजकीय हत्या होती. हे कृत्य करताना कृष्णाने स्वत:हून आपला जीव धोक्यात घातला होता. कृष्णाने शिशुपालाचा केलेला वध मात्र पूर्वनियोजित नव्हता. ती राजकारणाची आणि अचानक उद्भवलेल्या परिस्थितीची अपरिहार्यता होती. हा वधही कृष्णाने संपूर्णपणे स्वेच्छेने केला होता, असे म्हणता येत नाही. भीष्माने कृष्णाला हा वध करण्यास उद्युक्त केले होते. कृष्णाने भीष्माचे मनोगत जाणून हे कृत्य वेगाने पार पाडले. असेही म्हणता येईल की, शिशुपालाने अविवेकाने स्वत:चा मृत्यू ओढवून घेतला.
प्रत्यक्ष युद्धाचे वेळी मात्र पांडवांनी खरोखर अधर्माचरण केले, असे म्हणता येत नाही. एक भूरिश्रवा वगळता पांडवांनी कोणाला अधर्माने ठार मारलेले नाही. भूरिश्रव्याला अर्जुनाने ठार मारले, ते सात्यकीचे प्राण वाचवण्यासाठी. कृष्णाने अर्जुनाला हे कृत्य करण्यास नक्कीच उद्युक्त केले होते. अर्थात भूरिश्रवा हा कोणी असा योद्धा नव्हे की, ज्याच्या मृत्युमुळे युद्धाचे पारडे फिरले असते. जसे कौरवांनी अभिमन्यूला मारले, तसे अर्जुनाने भूरिश्रव्याला. असे काही अपवाद वगळता महाभारत युद्धात दोन्ही बाजूंकडून फारसे अधर्माचरण झाले नाही. याला अपवाद अश्वत्थाम्याने केलेल्या हत्याकांडाचा. पण त्याने हे हत्याकांड युद्ध संपल्यावर वैयक्तिक विद्वेषापोटी केले. त्याचा संबंध कौरव-पांडव आणि त्यांच्या क्षात्रधर्माशी लावता येत नाही.
महाभारताचे वाचन करीत असताना आपल्याला काही नवे सापडत आहे; आपली आकलनाची दिशा बदलत जात आहे याची जाणीव होत होती. पण मला जे सापडत होते, त्यामागे काही सूत्र नव्हते. माझी मते, कधी परंपरेसोबत जात होती तर कधी पारंपरिक मतांना झुगारून लावत होती. उदाहरण द्यायचे झाले, तर द्यूताच्या प्रसंगी शकुनीने काही लबाडी, हातचलाखी केली असेल हे मला शक्य वाटत नव्हते. युधिष्ठिराने स्वत:ला आणि द्रौपदीला पणाला लावण्याचे कृत्य केले ते जुगाराच्या बेहोषीत नव्हे तर अधर्माचरण करून कौरवांच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी, असा निष्कर्ष मी काढला होता. तर दुसरीकडे पांडवांची बाजू न्यायाची होती, या परंपरेने मान्य केलेल्या निष्कर्षांशी मी सहमत होतो. कृष्णाचे महाभारताच्या कथानकातील महत्त्वाचे स्थान मला मान्य होते. महाभारताच्या कथानकाचा जो अन्वयार्थ मी लावला होता, तो वाचकांपर्यंत पोचवायचा असेल तर महाभारताची संपूर्ण कथा सांगणे आवश्यक होते.
बहुसंख्य वाचकांना माहीत असलेली, अनेक प्रतिभावंत लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीने फुलवलेली ही कथा मी लिहिली तरी ती वाचणार कोण, ही शंकाही मनातून जात नव्हती. या लिखाणाला मी सुरुवात केली, ती स्वत:च्या समाधानासाठी. माझ्या मनात जी विचारचक्रे फिरत राहिली होती, ती हे विचार शब्दबद्ध करून कागदावर उतरवल्याखेरीज मनातून जाऊ शकत नाहीत, हे लक्षात आल्यावर! हे लिखाण करत असताना माझ्या असे लक्षात आले की, ‘धर्म’ या शब्दाने ज्या संकल्पना आपल्या मनात येत असतात, ‘धर्म’ या शब्दाचा जो अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो, त्याहून काहीसा वेगळा असणारा अर्थ महाभारताच्या लेखकांना आणि महाभारतामधील पात्रांना अभिप्रेत असला पाहिजे. महाभारतकारांचे म्हणणे असे होते की धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाचा वेगवेगळा विचार करणे विपरीत-चुकीचे-असते. धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ परस्परावलंबी आणि परस्परपूरक आहेत. त्यांचा तोल ढळला तर ते केवळ व्यक्तीसाठी नव्हे तर समाजासाठीही घातक ठरते.
महाभारतातील हे प्रतिपादन म्हणजे माझ्यासाठी जणू एक नवा, वेगळा चष्मा होता. तो लावून जेव्हा मी महाभारतातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांकडे पुन्हा पाहू लागलो तेव्हा त्यांचे अधिक रेखीव दर्शन मला होऊ लागले. त्यांची वक्तव्ये आणि त्यांनी केलेली कम्रे यांच्यामधील संगती-विसंगती लक्षात येऊ लागल्या. मी अधिक आत्मविश्वासाने लेखन करू लागलो.
महाभारतातील संघर्ष हा प्रामुख्याने जमिनीच्या मालकीहक्कावरून निर्माण झालेला संघर्ष आहे. तो निर्माण होण्यास जरी परिस्थिती कारणीभूत असली तरी तो न मिटवता कडेलोटाच्या प्राणांतिक वैरापर्यंत नेण्याचे काम सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या व्यक्तींनी केले आहे. धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाचे सेवन उचित प्रमाणात केले तर माणूस सुखी होतो, असे महाभारतकार सांगतात. महाभारताच्या कथानकात मात्र निर्णायक वेळेला सत्तास्थानी असलेल्या व्यक्तींना या तिन्ही पुरुषार्थाचा समतोल राखता आला नाही असेच म्हणावे लागते. अनेक वेळा अर्थ आणि काम मिळून धर्मावर मात करतात तर कधी धर्म आणि काम एकत्र येऊन जीवन निर्थक करतात. धर्म आणि अर्थ यांनी कामाच्या केलेल्या पराभवाची उदाहरणे विरळ असली तरी तीही समाजासाठी घातकच ठरतात.
मला महाभारत वाचून जे जाणवले, समजले असे वाटले ते आता वाचकांच्या हातात देत आहे. या वेगळ्या प्रयोगाचे ते स्वागत करतील, अशी आशा करतो.