जसा गोगलगायीला देह लपविण्यासाठी एक शंख असतो; तसं आपलं अवतारी विमान उतरण्यासाठी एक गाव अनिवार्य असतं. या गावात आपण लहानाचे मोठे होतो. पायांना रस्ते फुटतात. जिभेला भाषा लगडते. या आपल्या गावाबद्दल कायम एक हळवा कोपरा मनात असतो. पोटापाण्यासाठी जगात कुठल्याही गावी राहावं लागलं तरी मनात रुतून बसलेला गाव पिच्छा सोडत नाही. घर, अंगण, माडी, गल्ली, नदी, शेत, शाळा, देऊळ, माळ, बाजार, वेस, वड-पिंपळ असे गावाच्या अंगावरचे न झाकता येणारे तीळ असतात. मोठेपणी दक्षिण ध्रुवावर जाऊन आलात तरी लहानपणी वेशीवरच्या मारोती पारावर पाय हलवत बसण्याचं अप्रूप निराळंच. विल्यम्स ताईसोबत अवकाशात राहण्याची संधी मिळाली तरी लहानपणी माळावरून सर्वप्रथम पाहिलेला गावाचा ‘टॉप व्हीव’ अद्भूतच असणार. तोरणा-मरणाला एकत्र येणाऱ्या गावातले पोट्टेसोट्टे म्हणजे गावाचं चैतन्य. ही पोरं दंगामस्तीने गल्ली घुसळून काढतात. पक्ष्यांचा किलबिलाट पोरांच्या गलक्यात बेमालूम मिसळून जातो तेव्हा संध्याकाळही थबकते. म्हणून नाटकाचा पडदा सरकल्यासारखा गावात हळूहळू अंधार होतो.

या स्वत:च्या गावाशिवाय पोरासोरांना दुसरं एक गाव प्राणप्रिय असतं – ते म्हणजे मामाचं गाव! पूर्वी पंचक्रोशीतच लेक द्यायचे आणि सूनही जवळपासच्याच गावातली असायची. त्यामुळे मामाचा गाव टप्प्यात असे. पुढं दळणवळणाची सोय झाली तसे मामाचे गाव भौगोलिकदृष्ट्या दूरही गेले. पण भावनिक अंगाने समीपच राहिले. मामाचा गाव आवडण्यासाठी ते गाव मोठं पर्यटन केंद्र असणे किंवा गावाचं ऐतिहासिक महत्त्व असणे, असली भौतिक कारणं नव्हती. तर मुळात मामा-मामी, मावशी, आजी-आजोबा हे खरे आकर्षण केंद्र होते. या आकर्षण केंद्रामुळे मामाचं गाव आपोआपच दरवर्षीचं हवंहवंसं पर्यटन केंद्र होत असे. गाव म्हणून पंढरपूर कसं आहे हा निकष गौण ठरतो. विठ्ठलाचं गाव म्हणूनच पंढरपूरचा महिमा गायला जातो. म्हणून गाव कसंही असो मामाचं गाव म्हटलं की जीव की प्राणच असतं.

एकदाची वार्षिक परीक्षा संपल्यावर कधी एकदा मामाचा गाव गाठतो असे होई. परीक्षेला एखादा प्रश्न चुकला तर चालेल, पण मामाच्या गावाची पहिली गाडी चुकत नसे. मामा आणि मावशी यांचं भावनिकदृष्ट्या मोठं मोल आहे. ‘माय मरो, पण मावशी जगो’ किंवा ‘मामा असता पाठीशी तर जग सगळं देठाशी’, ‘तुझ्या मामाचा माल आहे का बे’, ‘मामाची पेंडय का’ अशा बोलबाल्यातून मामाचं महत्त्व अधोरेखित होतं. मामा हे विसाव्याचं तसं विश्वासाचं ठिकाण! लहानपणी एकदा रेल्वेतून आम्ही प्रवास करीत होतो. आई-वडील, बहिणीसोबत कुटुंबाचा प्रवास. आरक्षण वैगरे अशी काही पद्धत नव्हती. तरी मला खिडकीतच बसायला हवे असे. गाडीत गर्दी होती. कशी तरी आम्हाला जागा मिळाली. वडील मात्र उभेच होते. त्यातच खिडकीत बसण्यासाठी माझी बालसुलभ भुणभुण सुरू होती. खिडकीत एक दाढीवाले मुस्लीम चाचा बसले होते. त्यांना माझी भुणभुण कळाली. त्यांनी त्यांच्याजवळ मला बसवून घेतले. अनोळखी दाढीवाल्या माणसाबद्दल वाटणाऱ्या भीतीपेक्षा खिडकीचा मोह वरचढ ठरल्यामुळे मीही पटकन बसलो. पळती झाडी पाहण्यात गुंगून गेलो. तेवढ्यात संत्री गोळ्या विकायला आल्या. दाढीवाल्या चाच्यांनी संत्री गोळ्या घेतल्या. एक संत्री गोळी मला देऊ लागले. खरं तर संत्री गोळी खाण्याची माझी तीव्र इच्छा होती, पण अनोळखी माणसांकडून खायला काही घेणं शक्य नव्हतं. ते गृहस्थ मात्र प्रेमळ आग्रह करीत होते. त्यांच्या मेहंदीमुळे लालसर झालेल्या दाढीवरून मऊ मुलायम शब्द घरंगळले, ‘‘लेव बेटा, शरमाना नहीं, लेव.’’ माझी द्विधा अवस्था झाली. शेवटी मी आईकडे आज्ञार्थी बघू लागलो. आई म्हणाली, ‘‘घे घे. मामायेत.’’ ते मामा आहेत असं आईने म्हणताच मी संत्री गोळी घेतली. क्षणात गट्टम् केली. जीभ गोऽऽड आजोळात भिजून गेली. इथे मामा असण्याचा विश्वास उजागर होतो. मामा हे नातं वडीलधारं असलं तरी मित्रासारखं जोडणारं आहे. सहजपणे ‘अरे तुरे’ करायला परवानगी देणारं आहे. महाभारतात अर्जुनाला तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कृष्णाची दुसरी बाजू दही-दूध-लोणी चोरणारा, गोपींची वाट अडवणारा, गायी चारताना बासरी वाजवणारा अशी मोहक आणि संवादी आहे. बाकी सगळ्या नात्यात मामा हे नातं आदराच्या अतिरेकात न गुरफटता आपुलकीनं जवळ घेणारं असतं. कृष्णाचं पात्र तमाशाच्या बतावणीतही हजर असतं तसा मामा कुठंही हजर असतो. मामाच्या गावात स्टॅण्डवर बस उभी राहते. आपण अधाशीपणे बाहेर पाहतो तर तेवढ्याच आतुरतेने वाट पाहणारा मामा उभा असतो. बरेचदा तर उतरल्याबरोबर नवनाथ रसवंतीचा बर्फ घातलेला रस पिऊन ‘मामाचा गाव’ मोहिमेची सुरुवात होई. एक हात मामाच्या हातात नि दुसऱ्या हातानी रसामुळे आलेल्या पांढऱ्या मिशा पुसण्यातलं शहाणपण और होतं.

सुट्ट्या आणि मामाचं गाव याचं अतूट नातं होतं. एखाद्या विजेत्याने पराभूताचे राज्य ताब्यात घ्यावे तशी जमलेली भाचरं आजोळ ताब्यात घेत. खाणं-पिणं-दंगा-मस्ती असा ‘कॉम्बो पॅक’ असे. धपाटे, चिवडा, खारोड्या, पापड्या, खिचडी-सार, पिठलं-भात, श्रीखंड-लोणी, रस-पोळी, पन्हं-शरबत अशी दिवसभर चंगळ असे. याशिवाय कधी परिस्थितीमुळे चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्याही चवदार असत. पदार्थांच्या भोवती जाणवणारी स्नेहाची स्निग्धता अद्भूत होती. विशेष म्हणजे मामीसुद्धा पदर खोचून अन्नपूर्णेच्या भूमिकेत असे. चरून चरून थकलेली भाचरं टोळधाडीसारखी आमराईत शिरायची तेव्हा झाडंही पिकलेले पाड देऊन लाड करीत. पोहणं येणारे विहिरीत धडाधड उड्या मारत तेव्हा विहिरीतील पाणी ढवळून निघे. पोहणं न येणाऱ्यांच्या पाठीला भोपळा बांधून पाण्यात सोडलं जाई. नाका-तोंडात पाणी गेल्याशिवाय तरंगता येत नाही, हा पाठ पक्का होई. नदीवरचा धिंगाणा वेगळाच. नदीच्या कोरड्या पात्रात खड्डा केला की नितळ पाणी ओंजळीत येई. याला चलमा किंवा झिरा म्हणत. (आता वाळू उपसून उपसून आपण नदीच मारून टाकलीय) कधी पाणी कमी पडलं तर आडाच्या शेंदलेल्या पाण्यानं भाचरं अंगणातला हौद पाहता पाहता भरून टाकत. रात्री गच्चीवरच्या गोधडीवर गोष्टी ऐकताना भाचरं झोपी जात तेव्हा चंद्र एकटाच जागा असे. नजरेतून, शब्दातून आणि कृतीतून पाझरणाऱ्या स्नेहामुळे, आपुलकीमुळे मामाच्या गावाची ओढ संपायची नाही.

गेल्या वीसेक वर्षांत आमूलाग्र बदल झाले. विकासाच्या नावाखाली झगमगाट वाढला. गावात सावली देणारे वृक्ष उभे असत तिथे आता टिनपाट तात्या-भाऊ-नानाचे फ्लेक्स झळकू लागले. या फ्लेक्सची ना सावली पडते, ना त्यावर पक्षी बसतात. चकचकीत गट्टूने पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरू दिलं नाही. महामारी यावी तसं गावात राजकारण घुसलं. कर्ज माफ करताना सरकारनं शेतकऱ्यालाच साफ केलं. जातीचा गुप्त सुरा सोबत ठेवूनच प्रत्येक जण वावरू लागला. प्रत्येकाने संशयाचा चष्मा डोळ्यावर लावलेला. गावाला बाजूला टाकून एक्स्प्रेस हायवे सुसाट निघून गेले. सातबाऱ्यावर शेती आणि गावात वाड्यांचे सांगाडे राहिले. तालेवार असणारा आजचा मामा बँकेचे हप्ते भरताना कातावला आहे. सुगरण मामीसुद्धा गरज म्हणून धापा टाकत नोकरी-व्यवसाय करतेय. दूध दुभत्याने स्निग्ध झालेल्या घरात आता दुधाची बॅग चहासाठी येते. पूर्वी समृद्ध असणारा मामाचा गाव आज श्रीमंत झालाही असेल, पण ते बाळसं नव्हे, सूज आहे. ‘आजोळ’ नावाची कल्पनाच धोक्यात आलीय. अनेक कारणांनी नात्यात आलेलं कोरडेपण हे एक मोठं कारण आहे. आपल्या कुटुंबाशिवाय दुसरं कुणीच नसतं. आभासी दुनियेत रमताना आपण एकटे पडत चाललोय. भौतिक सुखाच्या फरपटीत नात्यातली ओढ संपत चाललीय का? आज कुटुंबात साधारणपणे एकच मूल असतं. अशावेळी मुलांना मामा-मावशी असेल का? अशावेळी भविष्यात आजोळ, मामाचा गाव अशा कल्पनाच बाद ठरतात. अंगत-पंगत म्हणजे नुस्तं पोट भरणं नव्हतं. त्यात एक समूहभाव होता. एक केळं वाटून खाण्यात शेअरिंग होतं. मामाचा गाव खेड्यातच असतो असं नाही. शहरातही मामाचा गाव असतोच की! खरं तर प्रत्येक गाव हा कुणाच्या तरी मामाचाच गाव असतो. या गावाच्या मजेचे तपशील बदलतील, पण मज्जा मात्र असणारच. जगण्याच्या गोंगाटात आपल्याला पोटासाठी एक गाव निवडावा लागतो. मामाचा हरवलेला गाव शोधताना आज मामाला मामेपण किती झेपतंय आणि भाचरांना तरी आजोळची शिकरण-पोळी खायला वेळ आहे का? याचा विचार करावाच लागेल. लगेच उद्याच मामाचा गाव अस्तंगत होणार नाही, पण या जगरहाटीत मामाचा गाव कधी बुडला तरी कवी ग. ह. पाटील यांच्या ओळी कुठे ना कुठे जीवाश्मासारख्या जिवंत राहतील…

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो.

dasoovaidya@gmail.com