भा ऊ, स्मार्ट सिटी म्हंजे रे काय?
– का रे? तुझ्या मनात हा प्रश्न का बरे उद्.. उद्.. उद्भवला?
– अरे, आपल्या आईने बाबांकडे हट्ट धरला होता, की या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आपण महाबळेश्वर किंवा माथेरान अशा प्रकारच्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाकरिता जाऊ.
– कित्ती मौज बरे! मग बाबांनी काय बरे उत्तर दिले?
– ते तिला म्हणाले की, ‘तिकडे नको. मी तुला स्मार्ट सिटी दाखवतो.’ तेव्हा आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर आला व ती त्यांना म्हणाली की, ‘म्हंजे माझ्या गोवऱ्या मसणात गेल्या तरी तुम्ही मला कुठे नेणार नाही!’ मसणात म्हणजे काय रे भाऊ ?
– थांब! त्यापेक्षा मी तुला स्मार्ट सिटी म्हंजे काय ते समजावून सांगतो! अरे, आपल्या मराठी भाषेमध्ये स्मार्ट सिटीला ‘सुंदर नगर’ असे म्हणतात.
– म्हंजे आपल्या इंदिरा नगरच्या बाजूला आहे ते सुंदर नगर का रे भाऊ ?
– छे छे! कसे बरे तुला समजावून सांगावयाचे? अरे, सुंदर नगर ही एक प्रकारची झोपडपट्टी आहे!
– झोपडपट्टी म्हंजे काय रे भाऊ ?
– अरे, झोपडपट्टी म्हंजे एक प्रकारची सन दोन हजार पंधरापूर्वीची गलि.. गलि.. गलिच्छ वस्ती- की जिथे माणसे दाटीवाटीने व लहान लहान झोपडय़ांमध्ये राहतात!
– म्हंजे आपले खेडेगाव का रे भाऊ ?
– नव्हे नव्हे! अरे, आपले पूज्य बापूजी म्हणाले होते की, खेडेगावांनी भारत देश बनला आहे. परंतु झोपडपट्टीने मोठमोठी मोठमोठी शहरे बनतात!
– हं हं! म्हंजे स्मार्ट सिटीमध्ये शहरे नसतात. कारण की- तिथे झोपडपट्टी नसते. हो ना रे भाऊ ?
– आता काय बरे करावे? मी तर बुचकळ्यातच पडलो आहे! अरे, स्मार्ट सिटी म्हंजे एक प्रकारचे आधुनिक शहर असते!
– हं हं! म्हंजे आपले पुणे शहर!
– नव्हे नव्हे! पुणे हे अतिस्मार्ट शहर आहे! आता तुला कसे बरे सांगावे? अरे, स्मार्ट सिटी म्हंजे एक प्रकारचे आधुनिक शहर असते.
– आधुनिक म्हंजे रे काय भाऊ ?
– अरे, आधुनिक म्हंजे जेथे उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा असतात ते शहर होय.
– म्हंजे आपले बृहन्मुंबई का रे भाऊ ?
– मी तर तुझ्यापुढे हातच टेकले बुवा! अरे, उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा म्हंजे ज्या वापरल्या असता लोकांचे जीवनमान सुसह्य व सुखकर होते.. त्यांचा प्रवास सुखाचा होतो.
– हं हं हं! म्हंजे स्पेशल पर्पज व्हेईकल!
– छे छे! आता बरे हद्दच झाली तुझ्यापुढे! अरे, ते नागरिकांनी प्रवास करावयाचे वाहन नसून, ते केंद्र सरकारच्या प्रवासाचे वाहन आहे व त्यास राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.
– राज ठाकरे म्हंजे काय रे भाऊ?
– छे बुवा, तू तर फारच प्रश्न विचारतोस! अरे, स्मार्ट सिटी म्हंजे एक प्रकारचे असे शहर असते, की जे वायफाय असते.
– म्हंजे शंभर कोटी रुपयांतून सर्व नागरिकांस मोफत डेटा- प्याक मिळणार..! अरेरे! म्हंजे स्मार्ट सिटीमध्ये फोर-जी गर्ल नसणार का रे भाऊ ! अरेरे अरेरे!!
– अरे, नव्हे! वायफायमुळे नागरिकांस माहितीचा महामार्ग उपलब्ध होणार. त्यांच्या भ्रमणध्वनी यंत्रावर त्यांस माहिती उपलब्ध होणार.
– म्हंजे कोणत्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, हेही कळणार का रे भाऊ ?
– छे छे! कसे बरे तुला सांगावे? अरे, स्मार्ट सिटी म्हंजे एक प्रकारचे असे शहर असते, की जिथे रस्त्यांवर व महामार्गावर खड्डे नसतात.
– म्हंजे स्मार्ट सिटीमध्ये कंत्राटदार नसतात का रे भाऊ?
– छे बुवा! आता माझ्या मस्तकाची सहस्र शकले होऊन माझ्याच पायाशी पडतील असे मला वाटू लागले आहे! मला असे विविध प्रश्न विचारण्यापेक्षा तू पुण्यास पालिका सभेस का बरे जात नाहीस?
– पालिका सभा म्हंजे काय रे भाऊ ?
– अरे, पालिका सभा म्हणजे जेथे स्मार्ट सिटीबाबत सर्वाना माहिती असते. तू सक्काळ सक्काळी उठून वृत्तपत्रांतून त्या सभांचे इत्थंभूत वृत्तान्त का बरे वाचत नाहीस; ज्या योगे तुला स्मार्ट सिटी म्हंजे काय ते समजेल.
– परंतु भाऊ, मी सक्काळ सक्काळी उठून स्मार्ट सिटीबाबतचे इथ्.. इथ्. इथ्थंभूत वृत्तान्त वाचले आहेत.
– मग सांग बरे, तुला सक्काळ सक्काळी वाचून स्मार्ट सिटीबद्दल काय समजले?
– भाऊ, मला स्मार्ट सिटीबद्दल एवढेच समजले आहे, की स्मार्ट सिटी म्हणजे एक अगडबंब हत्ती आहे व त्याकडे पाहणारांच्या हाती पांढरी काठी आहे!
– आँ? हत्ती? पांढरी काठी? म्हंजे रे काय?
– अरे, ते महत्त्वाचे नाही! हत्ती शंभर कोटींचा आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. समजले का तुला?
– छे बुवा! मला तर काहीच समजेनासे झाले आहे. खरेच, स्मार्ट सिटी म्हंजे असते तरी काय रे भाऊ?
अप्पा बळवंत – balwantappa@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About smart city