मोईन काबरा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इजिप्त म्हणजे फक्त पिरॅमिड्स नाही. इजिप्तमध्ये अनुभवण्यासारखे बरेच काही आहे. इजिप्तला जाऊन फक्त पिरॅमिड बघून परतणे म्हणजे डिशभर खमंग चिवडय़ातून फक्त एक शेंगदाणा उचलून तोंडात टाकल्यासारखे आहे.’ हे सांगणाऱ्या लेखक रवी वाळेकर यांच्या ‘इजिप्सी’ पुस्तकात देशाटनाचे कुतूहल शमवण्यासह या भागाचा रंजक प्रवास वाचकांना उलगडून दाखवण्यात आला आहे. रवी वाळेकरांचं हे पुस्तक इजिप्तला जायची ओढ अधिक तीव्र करतं.

हा प्रवासग्रंथ कुठेही कंटाळवाणा होत नाही. त्याला कारण म्हणजे, लेखकाची भन्नाट लेखनशैली. पुस्तकात इजिप्तच्या प्रसिद्ध ठिकाणांची माहिती तर आहेच, पण काही अनवट ठिकाणांची माहितीही विस्तृतपणे दिलेली आहे. लेखकाने त्या त्या ठिकाणांची माहिती सांगताना त्यांना ते ठिकाण कस भावलं, त्यातून त्यांना दिसलेलं इजिप्त आणि भारतीय संस्कृतीमधलं साम्यही नि:संकोचपणे स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर त्यातून तयार झालेली त्यांची स्वत:ची अशी मतंही मांडली आहेत- तीही त्यांच्या खुमासदार शैलीत. त्यामुळे हे प्रवासवर्णन पठडीबाज लेखनापेक्षा वेगळं ठरतं.
मराठी भाषा कशी वळवता येते हे लेखकांने अनेक ठिकाणी मारलेल्या मिश्कील ठोशेबाज शब्दमाळांमुळे समजतं. त्यातून ते अनेकदा खळखळून हसवतात, तर कधी अंतर्मुख करून विचार करायलासुद्धा भाग पाडतात. लेखकाचा मस्तमौला/ मिश्कील स्वभाव त्यांच्या लिखाणात झळकतो. काही ठिकाणांची वर्णनं वाचून तर लेखकाच्या निरीक्षणाची तारीफ करावीशी वाटते, त्यामागचा त्यांचा सखोल अभ्यास जाणवून कौतुकही वाटतं.
एका जिप्सीने केलेली आणि पुस्तकातून आपल्याला घडवलेली इजिप्त देशाची गूढ, रम्य सफर, अतिभव्य पिरॅमिडस, ऐतिहासिक अलेक्झांड्रिया शहर, सुप्रसिद्ध सुएझ कालवा, गूढ स्फिंक्स या सगळय़ा अनाकलनीय गोष्टींचा उत्कंठावर्धक प्रवास वाचकांसाठी घडवून आणणारं हे पुस्तक आहे. जे फक्त वाचावं आणि वाचतच जावं असं आहे.

लेखक तेथील सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक बाबी यांवरही प्रसंगानुरूप भाष्य करतात. त्यामुळे इजिप्त, तेथील ऐतिहासिक ठिकाणं, तेथील लोक, त्यांची त्या ठिकाणांकडे पाहण्याची दृष्टी, त्यांची संस्कृती याबद्दलची माहितीही आपल्याला हे पुस्तक देतं. हजारो वर्षांपूर्वीचे पिरॅमिड कुणी बांधले असतील, त्यांच्या आतली रचना, त्या वेळी प्रगत तंत्रज्ञान नसताना हे कसं शक्य झालं असेल, तिथल्या राजांचे / महत्त्वांच्या लोकांचे मृतदेह म्हणजेच ममी एका विशिष्ट तऱ्हेच्या पेटीत जतन का कराव्या वाटल्या असतील, ममीबरोबर सोनं-चांदी आणि हजारो वस्तू का ठेवल्या जात असतील, इजिप्शियन लोकांच्या चित्रविचित्र देव-देवता कशा होत्या, त्यांची हायरोग्लिफ नावाची अत्यंत क्लिष्ट अशी चित्रलिपी काय सांगू पाहत होती, आजवर तिथे होऊन गेलेले तीनशे फेरो म्हणजे कोण होते, त्यांचं महत्त्व काय, तुतानखामून कोण होता, रामसेस या फेरोचे असंख्य पुतळे का बांधले गेले, या फेरोचं काम काय होतं, नेफेर्तिती, हॅटशेपसूत आणि अनेक राण्या कशा होत्या, त्यांची वैशिष्टय़ं कोणती अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘इजिप्सी’ वाचताना मिळतात. त्यामुळे वाचणाऱ्याला इजिप्त त्रिमितीतून पाहिल्याचा भास होतो, यात शंका नाही. हे पुस्तक वाचून जो वाचक इजिप्तला भेट द्यायला जाईल, त्याला तिथे ‘गाईड’ घेण्याची गरज भासणार नाही, एवढय़ा चौफेर माहितीने भरलेलं हे पुस्तक आहे.

लेखकाने प्रवास करता करता इजिप्तला एक पूर्ण फेरी मारली आहे. कोणतीही आखणी न करता सलग एक महिना त्यांनी इजिप्तची सफर केली. दुसऱ्या दिवशी कुठे जायचे, हे लेखक आदल्या रात्री ठरवायचे. राजधानी असलेल्या कैरो शहरापासून उत्तरेकडे अलेक्झांड्रिया शहरात, तिथून पूर्वकडे पोर्ट सैद येथे, नंतर सुएझ, तिथून दक्षिणेत आस्वान नामक ठिकाणी, अगदी इजिप्तचे शेवटचे टोक असलेल्या अबू सिम्बेल इथपर्यंत.. मग परत वरती येत लक्सोर येथे आणि तिथून परत कैरो! असा अप्रतिम प्रवास लेखकाने केला आणि तेवढय़ाच भन्नाट शब्दांत त्यांनी तो पुस्तकात मांडलेला आहे. योजनाबद्ध प्रवास नसल्याने, सक्कारा, बाल्टीम, पोर्ट फुआदसारख्या नव्या गावांमध्ये त्यांचे मुक्काम घडत गेले. प्रवासात माणसे जोडली गेली. फक्त स्थानिकच नव्हे तर अगदी पोलंड, घानासारख्या देशातीलही नवे मित्र इजिप्तमध्ये लेखकाला मिळाले आणि त्यांना विश्वबंधुत्वाचा साक्षात्कार झाला- जो ‘इजिप्सी’च्या वाचनानंतर वाचकालाही होतो.

इजिप्सीमध्ये सर्व काही आहे. अचंबित करणारी माहिती तर आहेच शिवाय रोमांच, भटकंती, आपुलकी, रहस्य, प्रेम, माणुसकी इत्यादी मानवी भावनाही या पुस्तकात शब्दोशब्दी भेटतात. म्हणून हे पुस्तक एकदा हाती घेतल्यावर खाली ठेववत नाही.लेखक म्हणतात, ‘ज्यांना ‘विश्वचि माझे घर’ असं वाटतं, ज्यांना जगभराची सैर करावी वाटते, ज्यांना कुतूहलाचा ध्यास आणि ज्ञानाची आस आहे, ज्यांना अद्भुताची ओढ आणि इतिहासाचं प्रेम आहे, ज्यांना मानवी कर्तृत्वाचा अभिमान आणि उत्तुंगतेचा शोध आहे, अशा सगळय़ांनी इजिप्सी वाचलंच पाहिजे.’ आणि यात जराही अतिशयोक्ती नाही.

‘इजिप्सी’, – रवी वाळेकर, मनोविकास प्रकाशन,
पाने- ६२२, किंमत- ७५०

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exciting reading journey egypt pyramids ravi walekar egyptian book amy